Silk Farming : शेतकरी नियोजन ः रेशीम शेती

शिवानंद कंठाळे यांची बोरी ते कौसडी रस्त्यालगत गावखरी हलक्या ते मध्यम प्रकारची अडीच एकर शेती आहे. अन्य नातेवाइकांची तीन एकर शेती करार पद्धतीने करत आहेत.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

शिवानंद कंठाळे यांची बोरी ते कौसडी रस्त्यालगत गावखरी हलक्या ते मध्यम प्रकारची अडीच एकर शेती (Farm) आहे. अन्य नातेवाइकांची तीन एकर शेती करार (Contract Farming) पद्धतीने करत आहेत. सामाजिक माध्यमातून रेशीम शेतीची (Silk Farming) माहिती मिळाल्यानंतर त्यांनी परभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता. पूर्णा) आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील काही अनुभवी रेशीम उत्पादकांच्या (Silk Producer) भेटी घेतल्या.

Silk Farming
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

त्याविषयी माहिती देताना शिवानंद कंठाळे म्हणाले, की मी वस्सा (ता. जिंतूर) येथील विविध कार्यकारी पतसंस्थेमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे. नोकरीची जबाबदारी सांभाळतानाच उर्वरित वेळेमध्ये व कुटुंबीयांना सहजपणे करण्यायोग्य शेतीपूरक व्यवसायाच्या शोधात होतो. त्यातून रेशीमशेतीकडे वळलो. सुट्टीव्यतिरिक्त अन्य वेळी वडील नारायणराव आणि बंधू मोहन यांची मोठी मदत होते.

रेशीम शेतीतून शाश्‍वत उत्पन्न...
२०१७ मध्ये एक एकर क्षेत्रावर तुतीच्या ‘व्ही-१’ जातीची लागवड केली. २०१८ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेमध्ये रेशीम शेतीचे प्रशिक्षण पूर्ण केले. तेथील प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांच्याकडून प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती मिळाली.

बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील रेशीम उत्पादक राधेश्याम खुडे यांनीही शेतावर मार्गदर्शन केले. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये जालना जिल्ह्यातील चॉकी सेंटरवरून १५० बाल्य कीटक (चॉकी) खरेदी केले. कमी अनुभवामुळे व्यवस्थापनात राहिलेल्या त्रुटींमुळे पहिल्या बॅचपासून कोष उत्पादन मिळाले नाही.

मात्र खचून न जाता व्यवस्थापनात सुधारणा करत उत्साहाने दुसरी बॅच घेतली. आता बारकावे माहीत झाले आहे. वर्षभरात रेशीम कोष उत्पादनाच्या चार बॅच घेत आहे. रेशीम कीटकाच्या बायव्होल्टाइन जातीच्या १०० ते १५० अंडिपुंजाच्या प्रत्येक बॅचपासून ९० ते १२५ किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते. वर्षाला सरासरी ३५० ते ४०० किलो कोष उत्पादन मिळते. प्रत्येक बॅचसाठी सरासरी १० हजार रुपये खर्च येतो.

माफक खर्चातील संगोपनगृह...
शेतातील उंच जागी २४ बाय ५० फूट आकाराचे तसेच १५ फूट उंचीचे रेशीम कीटक संगोपनगृह उभारले आहे. छतासाठी सिमेंट पत्र्याचा वापर केला आहे. संगोपनगृहाभोवती जमिनीवर चारही बाजूने सिमेंट पत्रे लावले असून, त्यावर शेडनेट लावले आहे. लोखंडी पट्ट्या, नायलॉन जाळी आणि साड्यांच्या साह्याने रॅक तयार केले आहेत. त्यामुळे तुलनेने कमी खर्चात संगोपनगृह तयार केले. आवश्यक तापमानासाठी उन्हाळ्यात कुलर, फॉगरचा वापर करतात. हिवाळ्यात तागाच्या पिशव्या लावतो.

Silk Farming
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

काटेकोर व्यवस्थापन...
-कोष काढणी आणि विक्री झाल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या बाबींवर विशेष भर देतो.
-बाल्य अवस्थेत रेशीम कीटकांची विशेष काळजी घ्यावी लागते.
-पुढील बॅचसाठी रेशीम कीटकांना पुरेशा प्रमाणात खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी तुती बागेचे काटेकोर व्यवस्थापन करतो. त्यासाठी कोष काढणी सुरू झाली की तुतीची छाटणी केली जाते. त्यानंतर सऱ्यामध्ये नांगरणी, वखरणी केली जाते. खत मात्रा देऊन पाणी दिले जाते. छाटणीनंतर दीड महिन्यात कीटकांना देण्यायोग्य तुतीची पाने तयार होतात.

- दरम्यानच्या काळात बाल्य कीटकांची मागणी चॉकी सेंटरकडे नोंदवली जाते.
-ठरलेल्या दिवशी बाल्यकीटक प्राप्त झाल्यानंतर रेशीम कोष उत्पादनासाठी पुढील बॅच सुरू करतो.
- दोन बॅचमध्ये ६० दिवस अंतर ठेवले जाते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी राहून दर्जेदार कोष उत्पादन मिळते.

गेल्या महिनाभरातील कामे...

यंदा सप्टेंबर महिन्यातील १२५ अंडीपुंजाच्या बॅचपासून ९५ किलो कोष उत्पादन मिळाले. त्यानंतर १५ सप्टेंबरनंतर तुतीमध्ये छाटणी, मशागत अशी कामे केली. त्यानंतर डीएपी आणि युरिया या खतांची प्रत्येकी एक पिशवी (५० किलो) अशी मात्रा दिली. ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने तुतीच्या पानावर परिणाम झाला.

नोव्हेंबरमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली. त्यामुळे पानांचा दर्जा सुधारला. मात्र या काळात वेळ झाल्याने बॅच घेण्यास उशीर झाला. १५ नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चॉकी सेंटरमध्ये १०० चॉकीची मागणी नोंदवली. गेल्या आठवड्यात संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण करून घेतले. शुक्रवारी (ता. २) चॉकी बाल्य कीटक प्राप्त झाले असून, बॅच सुरू झाली आहे.

Silk Farming
Silk Industry : रेशीम उद्योग काळाची गरज ः डॉ. चंद्रकांत लटपटे

पुढील नियोजन...
बाल्य कीटकांना तिसऱ्या आणि चौथ्या मोल्ट संपेपर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ सहा ते सात फिडिंग देणार आहे. या बॅचपासून ८० ते ९० किलो कोष उत्पादन मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी खाद्य व्यवस्थापन काटेकोरपणे करत आहे.
आवश्यकतेनुसार रोगप्रतिकारक औषधांचा वापर करावा लागेल. संगोपनगृहाची स्वच्छतेवर भर आहे. २५ डिसेंबरपर्यंत कोष उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

शिवानंद कंठाळे ः७७६७९७४२८८, ९५५२२८३५३५
(शब्दांकन ः माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com