घर बसून हवामान बघा आणि मगच शेतात जा

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं, शेती फायदेशीर व्हावी यासाठी भारतीय हवामान विभाग आता शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
IMD
IMDAgrowon

शेतकऱ्यांचं उत्पन्न (Farmer Income) दुप्पट व्हावं, शेती फायदेशीर व्हावी यासाठी भारतीय हवामान विभाग (INDIA METEOROLOGICAL DEPARTMENT) आता शेतकऱ्यांना मदत करणार आहे. हवामान विभाग सध्या एका योजनेवर काम करतयं. यात शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत एसएमएसद्वारे (SMS) हवामानाचा अंदाज देण्यात येणार आहे.

हवामान विभागाची ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. यासाठी एक हेल्प लाइन नंबर दिला जाईल. या हेल्पलाईन नंबरवर मिस्डकॉल दिल्यावर तुम्हाला तुमच्या भाषेतला एक मॅसेज येईल. देशाच्या कुठल्या कोपऱ्यात बसलेला शेतकरी त्याच्यासाठी त्याच्या गावासाठी किंवा गटासाठी ही सेवा वापरू शकतो.

यात शेतकऱ्यांना कोणती माहिती मिळेल. तर पुढील पाच दिवस पाऊस कसा असेल, तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग ही माहिती तुम्हाला मॅसेजवर मिळेल. प्रादेशिक स्तरावर हवामानासंबंधित माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांना खतं आणि इतर निविष्ठांचा वापर, सिंचन आदीं संबंधी निर्णय घेण सोपं जाईल. हवामान विभागाची एक समर्पित टीम शेतकऱ्यांच्या या योजनेवर काम करते आहे.

योजना चांगली असली तरी अंमलात यायला किती वेळ लागेल हे माहित नाही. मग शेतकऱ्यांसाठी दुसरी कोणती यंत्रणा आहे का ज्याचा वापर करून शेतकरी हवामानाचा अंदाज घेऊ शकतात

हवामान विभागाचं मेघदूत हे एक अँप आहे. मेघदूत ॲपमध्ये तापमान, पाऊस आणि पीक सल्ल्याची माहिती दिली जाते. या ॲपच्या माध्यमातून मागील 10 दिवसांची आणि पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नियोजन करण्यास मोलाची मदत होते.

पुढील एक-दोन दिवसात पाऊस पडणार असेल, तर शेतकरी पिकाला पाणी देणे आणि औषध फवारणी करणे टाळू शकतात. सध्या हवामान विभागाकडून देशातील 2.8 करोडहून जास्त शेतकऱ्यांना पीक- कृषी - हवामानविषयक सल्ला दिला जातो. हे सल्ले एसएमएस, इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स, इफको किसान संचार लिमिटेड, रिलायन्स फाऊंडेशन आणि महिंद्रा समृद्धी यांसारख्या विविध माध्यमांतून विविध भाषांमध्ये देण्यात येतो.

पण जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला त्याच्याच भाषेत सल्लामिळेल, तेव्हा त्याला शेतीच्या दैनंदिन कामाशी संबंधित निर्णय घ्यायला नक्कीच मदत होईल. देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात अगदी बांधावर उभं राहून ही शेतकऱ्यांना माहिती मिळेल. शेतकर्‍यांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे. मात्र, हवामान विभागाचा अंदाज अचूक असणं देखील गरजेचं आहे. नाहीतर सेवा असूनही अंदाज चुकीचा ठरला तर शेतकऱ्यांचा खोळंबा अशी अवस्था होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com