snails: गोगलगायींचे हवे एकात्मिक अन् सामूहिक नियंत्रण

गोगलगाय (Snails) मृदुकाय, अपृष्ठवंशीय, उदरपाद वर्गातील प्राणी आहे. तिच्या ३५ हजारांपेक्षा अधिक जातींची नोंद करण्यात आली आहे. तिच्या शरीराचे विभाजन डोके, शंख व पाय या तीन विभागांत होते.
Snails
SnailsAgrowon

डॉ. विनायक शिंदे-पाटील, रणजित पाटील

गोगलगायी (Snails) जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात. अनुकूल वातावरण आणि खाद्याच्या अमाप उपलब्धतेमुळे त्यांची वाढ झपाट्याने होत असल्याने शेतकऱ्यांपुढे त्यांच्या रूपाने नवे संकट उभे ठाकले आहे. ही अकीटकीय कीड बहुविध पिकांना उपद्रव करत असल्यामुळे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे झाले आहे.

गोगलगायीची ओळखः

गोगलगाय (Snails) मृदुकाय, अपृष्ठवंशीय, उदरपाद वर्गातील प्राणी आहे. तिच्या ३५ हजारांपेक्षा अधिक जातींची नोंद करण्यात आली आहे. तिच्या शरीराचे विभाजन डोके, शंख व पाय या तीन विभागांत होते. बहुतांशी गोगलगायी गर्द, करड्या, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. काही जातींमध्ये शरीरावर कवच असते. यालाच ‘शंखी’ असेही म्हणतात. या गोगलगायी ‘जायंट स्नेल’ नावाने परिचित असून, शास्त्रीय नाव ‘अचेटीना फुलिका’ आहे. त्या विषारीही असू शकतात. उभयलिंगी असल्या तरी स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी इतरांशी मीलन करावे लागते.

जीवनक्रमः

प्रौढ शंखीची लांबी १५ ते १७ सें.मी. असते. जीवनक्रम साधारणत: तीन वर्षांचा असून, या कालावधीत मादी एक हजार अंडी घालते. प्रत्येक मादी शंखी पिकाच्या खोडाशेजारील मुळाजवळ किंवा बांधाला ३ ते ५ सेंमी. खोलीचे छिद्र करते. त्याद्वारे माती भुसभुशीत बनवून तीन ते चार दिवसांत १०० ते ४०० अंडी घालते. मिलनासाठी योग्य साथीदाराची निवड करून एकमेकांशी सहा ते आठ दिवस मिलन करतात. सर्वसाधारण १७ दिवसांपर्यंत अंड्यातून पिले बाहेर येतात. त्यांची वाढ पूर्ण होण्यास ८ महिने ते १ वर्षाचा कालावधी लागतो. या काळात पिले पिकांचे अतोनात नुकसान करतात. त्यांची कार्यक्षमता रात्रीच्या वेळी अधिक असून, दिवसा सावलीत पानांखाली किंवा ओल्या जागी आढळतात.

प्रसार

किडीचा प्रसार शेतात वापरण्यात येणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर ट्रॉली, प्लॅस्टिक ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळू, कलम, रोप, बेणे तसेच अन्य निविष्ठांद्वारे होतो. गोगलगाय जमिनीखालील रहिवासी आहेत, खोड किंवा जंतूंनी तयार केलेल्या भेगा आणि बोगदे वापरून त्या पसरतात. पावसाळ्यात ढगाळ वातावरणात कमी प्रकाश, जास्त पाऊस म्हणजे जास्त आर्द्रता, कमी तापमान (० ते ३२ अंश सेल्सिअस) या किडीला पोषक आहे. दव पडलेल्या रात्री किंवा पावसानंतर संक्रमण जास्त होते. बहुतेक प्रजाती थोडी थंडी सहन करू शकतात आणि वसंत ऋतूत पुन्हा सक्रिय होतात. शंखी गोगलगायी (Snails) चार ते पाच महिने अन्नपाण्याशिवाय जगू शकतात.

नुकसानीचा प्रकार

गोगलगाय (Snails) विविध ५०० वनस्पतींवर उपजीविका करते. जमिनीवर पडलेली पिवळी पाने, फुले, फळे, जनावरांचे शेण, शेणखत, कागदी पुठ्ठा तसेच कुजलेल्या कचऱ्यावरही जीवनक्रम व्यतीत करतात. त्या अनियमितपणे खातात आणि पानांत मोठे छिद्र सोडतात. नुकसानीचा माग त्यांनी पानांवर आणि जमिनीच्या पृष्ठभागावर मागे सोडलेल्या रुपेरी चिकट द्रावामुळे घेता येतो. त्यांचे लक्ष खास करून कोवळ्या रोपांवर असते. कोवळ्या रोपांना पूर्ण खात असल्याने रोपवाटिकेचे खूप मोठे नुकसान होते.

एकात्मिक नियंत्रणः

अ) प्रतिबंधात्मक उपायः

-गोगलगायींचे वास्तव्य मुख्यत: बांधावरील गवतावर असल्याने शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत.

-पालापाचोळा, तण काढून शेत नेहमी स्वच्छ ठेवावे.

-आडवी-उभी नांगरट करून सुप्तावस्थेतील गोगलगायींना जमिनीच्या पृष्ठभागावर आणावे. म्हणजे त्या सूर्याच्या उष्णतेने मरतील वा पक्षी त्यांचे भक्षण करतील.

-उच्च किंवा मध्यम प्रतिकारक वाण निवडावे.

-जड जमिनीत लागवड करणे टाळावे. कारण अशा जमिनी गोगलगायींना अधिक पसंत असतात.

-लवकर लागवड करावी किंवा लवकर तयार होणारे वाण लावावे. शक्य तितक्या लवकर

काढणी करावी.

-पिकाभोवती कुंपण किंवा जाळी लावावी.

-प्राणघातक नसणारे सापळे उदा. जुने ओले केलेले गोणपाट आणि लाकडी फळ्या लावाव्यात.

-सकाळच्या वेळी जास्त पाणी देणे टाळावे.

-फळझाडाच्या खोडाला १० टक्के बोर्डो पेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत.

ब) मशागतीय उपाय

-संध्याकाळी व सूर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात. त्यानंतर जमिनीत खड्ड्यात पुरून टाकाव्यात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात.

-अंडी खोडाशेजारील मुळाजवळ किंवा बांधाला तसेच गवताच्या ढिगाखाली १०० ते २०० च्या पुंजक्याने घातलेली असतात. ती पांढरट, पिवळसर रंगाची

साबुदाण्याच्या आकाराची असतात. ती हाताने गोळा करून नष्ट करावीत.

-शेतात ठरावीक अंतरावर उचलता येण्यासारखे गवताचे ढीग किंवा गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी अंथरावेत. त्यावर गोगलगायी आकर्षित होतात. सकाळी सूर्योदयानंतर पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी जमा करून नष्ट कराव्यात.

-शेतातील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूची किंवा चुन्याची भुकटी किंवा कॉफीची पूड यांचा ४ इंच लांबीचा पट्टा किंवा राखेचा सुमारे दोन मीटर लांबीचा पट्टा बांधाच्या शेजारी पसरून टाकावा. पाऊस असल्यास किंवा जमीन ओली असल्यास हा उपाय फारसा प्रभावी ठरत नाही.

क) जैविक उपाय

-गोगलगायींच्या नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन करावे. उदा. कोंबडी, बदक, घुबड.

ड) रासायनिक उपाय -

-लहान शंखी गोगलगायी मिठाची फवारणी किंवा कॅल्शिअम क्लोराइडचाही बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो.

-मेटाल्डिहाइड ५ टक्के पावडरची पिकावर धुरळणी करावी.

-शंखी गोगलगायी प्रामुख्याने पपई व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. त्यामुळे मेटाल्डिहाइडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात.

-सेंद्रिय शेतीत नियंत्रणासाठी फेरिक फॉस्फेटवर आधारित गोळ्यांच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे.

सामूहिक उपाय सर्वांत महत्त्वाचे

गोगलगायींची भिन्नता आणि जीवनचक्रामुळे केवळ रासायनिक नियंत्रणाद्वारे गोगलगायी नियंत्रणात येत नाहीत. उपद्रव टाळण्यासाठी सामूहिकरीत्या व एकात्मिक पद्धतीने निर्मूलन करणे हाच सर्वांत प्रभावी मार्ग आहे.

गोगलगायीवर संशोधन

चांदूर बाजार (जिल्हा-अमरावती) तालुक्यातील संत्रा, केळी, कापूस आदी पिकांमध्ये दरवर्षी शंखी गोगलगायींचा मोठ्या प्रामाणावर प्रादुर्भाव होतो. वेचून त्यांचे नियंत्रण करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन येथील प्रतीक देशमुख यांनी रसायनशास्त्र विषयातील ज्ञानाचा उपयोग करीत काही रसायने विशिष्ट पद्धतीने एकत्र करून आमांश विषनिर्मिती केली आहे.

हे विष शंखी गोगलगायीला चाळीस फुटांवरून आकर्षित करते व नियंत्रित करते. पर्यावरणातील अन्य घटकांवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नसल्याचे आढळले आहे. अर्थात, त्यावर अधिक संशोधन सुरू असून ते ‘पेटंट’ नोंदणीच्या प्रक्रियेतही आहे.

- डॉ. विनायक शिंदे पाटील, ७०७१७७७७६७

रणजित पाटील, ७८७५०२४८२३

(डॉ. शिंदे-पाटील हे उद्यानविद्या विभाग, डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे,

कोल्हापूर येथे सहायक प्राध्यापक, तर श्री. पाटील याच महाविद्यालयात कीटकशास्त्र विभागात

सहायक प्राध्यापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com