सोयाबीनच्या नव्या; सहा वाणांचे संशोधन

भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या आढावा बैठकीत मान्यता
सोयाबीनच्या नव्या; सहा वाणांचे संशोधन
SoybeanAgrowon

नागपूर ः इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या पार पडलेल्या ५२ व्या वार्षिक बैठकीत उत्तरी पर्वतीय (हिमालय पर्वतमाला), उत्तरी मैदानी तसेच मध्य क्षेत्राकरीता सोयाबीनच्या नव्या सहा वाणांची शिफारस करण्यात आली. त्यामध्ये अधिक उत्पादनक्षम तसेच येलो मोझॅक प्रतिकारक वाणाचा देखील समावेश असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

तेलबियावर्गीय सोयाबीन पिकाचे केंद्रबिंदू असलेल्या मध्य प्रदेशातील मालवा परिसरात ही बैठक पार पडली. देशभरातील सुमारे १५० सोयाबीन संशोधक व तज्ज्ञांची या बैठकीला उपस्थिती होती. या वेळी नव्या सहा वाणांची शिफारस करण्यात आली. त्यामध्ये उत्तरी पर्वतीय क्षेत्राकरीता वीएलएस-९९, उत्तरी मैदानी क्षेत्राकरिता एनआरसी १४९ तसेच मध्य क्षेत्राकरिता चार वाणांचा समावेश आहे.

मध्य क्षेत्राकरिता असलेल्या वाणांमध्ये एनआरसी-१५२, एनआरसी-१५०, जेएस-२१-७२ तसेच हिम्सो-१६८९ हे वाण असल्याची माहिती देण्यात आली. एनआरसी-१४९ हे वाण येलो मोझॅक, राइजोक्‍टोनिया एरियल ब्लाइट सोबत गर्डल बीटल व पर्णभक्षी किडींना प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एनआरसी-१५० हे वाण अवघ्या ९१ दिवसांत परिपक्‍व होते. सोयाबीनमध्ये विशिष्ट गंध येतो, हे वाण असा गंध येण्यासाठी जबाबदार असलेल्या लाइपोक्‍सीजिनेज-२ एंजाईम मुक्‍त असल्याचे सांगण्यात आले. एनआरसी-१५२ हे वाण ९० दिवसांपेक्षा कमी कालावधीत परिपक्‍व होते, असा दावा संस्थेने केला आहे. खाद्यान्न म्हणून उपयुक्‍त आणि अपौष्टिक क्‍लुनिटस, ट्रिप्सिंग इनहिबिटर आणि लाइपोक्‍सीजनेस एसिड-२ पासून देखील हे वाण मुक्‍त असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ जबलपूरद्वारा एक सोयाबीन वाण विकसित करण्यात आले असून हे वाण येलो मोझॅक, चारकोल रोट, बॅक्‍टेरियल पस्ट्यूल तसेच लीफ स्पॉट रोगांना प्रतिकारक असल्याची माहिती देण्यात आली. संस्थेच्या संचालिका डॉ. नीता खांडेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की देशभरात प्रत्येकी एक एकर क्षेत्र याप्रमाणे १८०० प्रथम रेषीय प्रात्याक्षीक घेण्यात आली.

या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आधुनिक व्यवस्थापन पद्धती पोहोचविण्यात यश आले आहे. त्यासोबचत सोयाबीन प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी याकरिता देखील संस्था प्रयत्न करीत आहे. बैठकीच्या समारोपीय सत्रात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक संचालक (तेलवर्गीय पिके) डॉ. संजीव गुप्ता यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले, नव्या वाणांसोबतच उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञानही शेतकऱ्यांपर्यंत पोचणे काळाची गरज आहे. त्याकरिता संशोधक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.

या वेळी सोयाबीन संशोधन व विकास क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे डॉ. सुनील दत्त बिलोरे, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणेचे डॉ. फिलिप वर्गिस, आनंद कृषी महाविद्यालय गुजरातचे डॉ. जी. जे. पटेल, सीहोर कृषी महाविद्यालयाचे डॉ. रामगिरी यांना सन्मानित करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com