नगदी पिकांतून अर्थकारणाला बळकटी

घाडवेल (जि. जळगाव) येथील देवेंद्र खेमराज पाटील यांनी काटेकोर आर्थिक नियोजन आणि काटकसर यातून खर्चात बचत साधली आहे. पाणी क्षारयुक्त असतानाही आपल्या कृषी ज्ञानाचा उपयोग करत नगदी पिकांसह हंगामी पिके यशस्वीपणे घेत आहेत. गुणवत्ता आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाला काटकसरीची साथ दिल्यामुळे अर्थकारणाला बळकटी मिळाली आहे.
नगदी पिकांतून अर्थकारणाला बळकटी
Devendra PatilAgrowon

जळगाव जिल्ह्यातील घाडवेल (ता. चोपडा) हे गाव तापी नदीकाठी आहे. येथील देवेंद्र खेमराज पाटील हे कृषी पदवीधर असून, वडिलोपार्जित ६० एकर शेती आहे. शेतीकामासाठी तीन सालगडी असतात. दोन बैलजोड्या, एक गाय, एक म्हैस असा बारदाना आहे. सहा कूपनलिका असून, ५० एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. वडील खेमराज हे खरिपात मूग, देशी कापूस व रब्बीत दादर ज्वारी घ्यायचे. पुढे देवेंद्र यांनी नोकरी संधी असतानाही आपल्या शेतीमध्येच रस घेतला. मागील २२ वर्षांपासून पीक पद्धतीत हळूहळू बदल केले.

पूर्वीच्या मूग या प्रमुख पिकाऐवजी सुधारित, संकरित कापूस वाणांची लागवड सुरू केली. २००६ पासून बीटी कापूस वाण लागवड होते. कपाशीनंतर रिकाम्या झालेल्या क्षेत्रामध्ये डिसेंबरमध्ये रब्बी पेरणी करतात. त्यात गहू, हरभरा आणि दादर ज्वारी (रब्बी ज्वारी) यांचे बीजोत्पादन घेण्यावर भर असतो. त्यामुळे अधिक उत्पन्न, हमी दर मिळतो. कापूस पैदासकार डॉ. संजीव पाटील, पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रातील महेश महाजन, चोपडा (जि. जळगाव) येथील कापूस पिकासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था विठ्ठल ॲफ्रो यांचे मार्गदर्शन मिळते.

वित्तीय विकास व शेतीमध्ये सुधारणा

-नगदी पिके घेत असले तरी उत्पादन खर्च कमी करण्यावर भर. यातील कापूस वगळता हरभरा व ज्वारीला तुलनेने फवारणी, खतांचा खर्च नाही.

-दादर ज्वारी, हरभऱ्यासही जमीन काळी कसदार असल्याने कमी पाणी लागते.

-कापूस पिकाची लागवड गादीवाफा पद्धतीने करतात. यामुळे काळ्या कसदार जमिनीत अतिपावसात पिकाची हानी टाळता येते.

-पीक फेरपालटीवर भर आहे. यातच बहुपीक पद्धतीने एका पिकात नुकसान झाल्यास इतर पिकांत त्या नुकसानीची भर निघते.

-मोठा ट्रॅक्टर व त्याची अवजारे आहेत. याद्वारे पेरणीचे कामही उरकतात. यामुळे पेरणीसंबंधी मजुरीचा खर्च कमी करण्यात येतो.

-टप्प्याटप्प्याने कूपनलिका खोदत बागायतीखालील क्षेत्रात वर्षागणिक वाढ केली.

Devendra Patil
सरकारच्या हस्तक्षेपामुळेच कांद्याचा वांदा

काटकसरीवर कटाक्ष

-वडील खेमराज यांनी काटकसरीतून शेतीचा व्याप वाढविला, प्रगती केली. हरभरा, दादर ज्वारी अशा पिकांतून समृद्धी आली. त्यांचाच वसा देवेंद्र जपत आहेत. कुटुंबात आई छबाबाई, वडील खेमराज, पत्नी नमिताबाई, दोन मुले प्रज्वल व प्रतीक असे सदस्य आहेत.

-सर्व कृषी उत्पन्नांचा ताळेबंद मांडला जातो. त्यावरच पुढील वर्षीच्या पिकांबाबत अंदाजपत्रक तयार करतात. आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न असतो.

-बाकी काटकसर असली तरी मुलांच्या शिक्षणासंबंधी जागरूक आहेत. दर्जेदार शिक्षणसंस्था आणि गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण यात तडजोड केली नाही.

-आलेल्या नफ्यातून काही भाग हा शेती सुधारणा, सिंचन स्रोतांचे बळकटीकरण, यंत्रणांची देखभाल व दुरुस्ती, उत्पादनक्षम बाबींमध्ये गुंतवणुकीवर भर असतो.

पिकांच्या गुणवत्तेसाठी यावर असतो भर

- प्रत्येक पिकांचे आपल्या भागात चांगले उत्पादन देणारे, गुणवत्तापूर्ण वाणांची निवड केली जाते.

- शेणखत, मेंढी खत यावर अधिक भर.

-हरभरा पिकात दादर ज्वारी पेरल्यामुळे पक्ष्यांसाठी नैसर्गिक थांबे तयार होतात. कीडनियंत्रण नैसर्गिकरीत्या होते.

-कापूस पिकाला फक्त एकदाच रासायनिक खतांचा बेसल डोस दिल्यानंतर पुढे ठिबकद्वारे व फवारणीतून विद्राव्य खतांचा वापर करतात. ही खते महाग वाटली तरी कमी प्रमाणात लागत

असल्यामुळे प्रति वर्ष किमान अडीच लाख रुपयांची बचत होत असल्याचा देवेंद्र यांचा दावा आहे.

-कापूस पिकातही पक्षिथांबे उभारले जातात. गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे एकरी पाच लावतात. रसशोषक किडींसाठी पिवळे चिकट सापळे एकरी चार लावतात. अशा उपाययोजनांमुळे फवारणी वाचतात. खर्चात ३० टक्क्यांपर्यंत बचत होते.

-कृषी पदवीधर असल्याने मित्र कीटकांची माहिती आहे. फवारणी करताना त्यांच्या संवर्धनासाठी योग्य काळजी घेतात.

- सुपीकता टिकवण्यासाठी एकाच क्षेत्रात वारंवार कापूस पीक घेण्याऐवजी फेरपालट केली जाते.

-कापूस पिकालाही उगवणीसाठी सुरुवातीला दोन-तीन सिंचन करतात. पुढे नंतर एकदाच सिंचन करावे लागते.

- कपाशीचे फरदड घेण्याऐवजी डिसेंबरच्या सुरवातीला संबंधित क्षेत्र रिकामे करून दादर ज्वारी व अन्य रब्बी पिके घेतात. यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र रोखले जाते.

-पिकांचे सर्व अवशेष शेतातच गाडतात. खोल नांगरणी करण्यावर भर.

- ऊस तोडणीनंतर पाचट न जाळता, शेतातच आच्छादन केल्यामुळे खोडवा उसाला लाभ होतो.

- अधिक ज्ञानासाठी कृषी विज्ञान केंद्र, खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी, बाजारपेठेतील मंडळी व अभ्यासू शेतकऱ्यांच्या संपर्कात राहतात. त्यामुळे कृषी क्षेत्रातील सुधारणा, बदल आणि बाजारातील अपडेटही कळत राहतात.

- सोडिअम क्षारयुक्त पाणी असल्यामुळे जमिनीचा पीएचही अधिक (८ ते ८.५) आहे. यामुळे अधिक काळजी उत्पादन कमी जास्त होत असते. जिप्समचा एकरी एक ते दोन टन या प्रमाणे वापर करावा लागतो.

कापसाची जागेवर विक्री, दादर ज्वारीबाबत करार

-कापसाची थेट जागेवर विक्री करतात. त्यासाठी बाजारातील मागणी, दरांतील चढ-उतार, पुरवठा याची माहिती विविध माध्यमांतून घेतात. यानंतर कापूस विक्रीचा निर्णय घेतात.

-दादर ज्वारी विक्रीसंबंधी कंपन्यांशी किंवा बियाणे उत्पादक संस्थांशी करार करतात. बीजोत्पादन करीत असल्याने दरांची हमी मिळते. ज्वारीच्या चाऱ्याला प्रतिशेकडा तीन हजार रुपये असा चांगला दर गेल्या तीन वर्षापासून मिळाला. एकरी चार ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न चाऱ्यातूनच मिळते. कोरडवाहू मका कडब्याला साधारण एक हजार रुपये प्रति शेकडा असा दर मिळतो.

Devendra Patil
शेती निविष्ठांच्या किमती भडकल्या

खर्च कमी करण्याचे नियोजन

कापूस वगळता मका, हरभरा, गहू, दादर ज्वारीची पेरणी ट्रॅक्टरने बीबीएफ यंत्राद्वारे करतात.

तणनियंत्रणासाठी तणाशकांचा उपयोग करतात.

आंतरमशागतीसाठी शक्य तिथे ट्रॅक्टरचा वापर. यामुळे मजुरीसह इतर खर्चात ३० टक्के बचत होते व वेळ वाचतो.

देवेंद्र पाटील - ७०२०९३२७५७, ७३५०९९४८१५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com