समजाऊन घ्या भू सूक्ष्म जीवशास्त्र...

अति रसायनांच्या वापरामुळे जमिनी खराब झाल्या म्हणजे नेमके काय झाले ? त्या मूळ सुपीक स्थितीमध्ये आणण्यासाठी शेती करण्याच्या पद्धतीत नेमका काय फरक करणे गरजेचे आहे ? यांचे पूर्ण वैज्ञानिक उत्तर आजही शेतकऱ्यांपुढे मांडले जात नाही. त्यादृष्टीने आपल्या सर्वांना नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
Geo-microbiology
Geo-microbiologyAgrowon

मी गेली सतरा वर्षे संवर्धित शेती हे तंत्र राबवत आहे. काही शेतकरी २ ते ८ वर्षांपासून करणारे आहेत. टोकण करणे, विसकटणे, पेरणी यंत्राने पेरणी करणे असे अनेक पर्याय आपण हाताळू शकतो. पंजाबात शेतातील भात कापणीनंतर (Paddy Harvesting) काडामध्ये पेरणी (Sowing) करणे अगर काड जाळून (Stubble Burning) पेरणी करणे असे पर्याय हाताळले जातात. आपल्याकडे नगण्य प्रमाणात खरीप पिकांची (Kahrif Crop) कापणी यंत्राने केली जाते. धान्ये, कडधान्यांच्या काडाला वैरणमूल्य असल्याने जमिनीवर त्यांचे आच्छादन करणारा शेतकरी अपवादासाठी शोधावा लागेल. मग आपल्याला पंजाबसारख्या यंत्राची गरज नाही. आपल्याकडील बैल अगर ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने काम करणे शक्य आहे. थोडा त्रास घ्यावा लागले इतकेच. हे तंत्र भात, गहू फेरपाटलात वापरले गेले. याचा अर्थ फक्त अशा फेरपालटातच ते उपयोगी आहे असे नाही. कोणत्याही पिकात, कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात याचा वापर करणे सहज शक्य आहे.

हरित क्रांतीत आपण सेंद्रियकडून रासायनिक शेतीकडे आलो. अन्नधान्य टंचाईचा प्रश्न सुटला. परंतु सुधारित शेतीतून नवीन काय प्रश्न उभे राहू शकतात याची कल्पना त्या वेळी येणे शक्य नव्हते. पुढे १५ ते २० वर्षांनंतर हरित क्रांती बदनाम झाली. त्या वेळी नेमके असे का झाले ? याचे पूर्ण वैज्ञानिक उत्तर कोणाला देता आले नाही. त्यावर नवीन नवीन मार्ग शेतकऱ्यांपुढे आणले गेले, परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांना असे सांगितले जाऊ लागले की, हरित क्रांती काळात जी वेगवेगळी रसायने आपण वापरली ती विषारी होती. त्यामुळे जमिनी खराब झाल्या. रसायनांचा वापर बंद करून सेंद्रिय शेती केली पाहिजे. हे घड्याळाचे काटे उलटे फिरविण्यासारखे आहे. आज काही विचारवंत असे विचार मांडतात की, दुसरे महायुद्ध संपल्याने आता दारूगोळा तयार करण्याच्या कारखान्यातील रसायनांचा वापर कोठे करावयाचा? कारखाने तर बंद करता येत नव्हते. त्यांचा शेतीत वापर करण्याची तंत्रे विकसित केली गेली. या विषारी रसायनामुळे जमिनी खराब झाल्या. जमिनी खराब झाल्या म्हणजे नेमके काय झाले ? त्या मूळ पदावर आणण्यासाठी शेती करण्याच्या पद्धतीत नेमका काय फरक करणे गरजेचे आहे, यांचे पूर्ण वैज्ञानिक उत्तर आजही शेतकऱ्यांपुढे मांडले जात नाही.

मूळ प्रश्नांचा विचार आवश्यक ः

सर्वप्रथम सेंद्रिय खताची कमतरता हा विषय पुढे आला. शेणखत आणि कंपोस्ट या पारंपरिक खतातून ही गरज भागविणे केवळ अशक्य असतानाही अजून त्याची शिफारस चालू आहे. त्याला सोपे, सुलभ व स्वस्त पर्याय शेतकऱ्यांपुढे आणले पाहिजेत, असे अजिबात अजूनही लोकांना वाटत नाही. प्रश्न फक्त सेंद्रिय कर्बाचा नाही तर या व्यतिरिक्त अनेक विकृती जमिनीमध्ये निर्माण झाल्या आहेत. सामू कसा दुरुस्त करावयाचा, क्षारता कशी कमी करावयाची, निचराशक्ती योग्य पातळीवर कशी राखायची, जमिनीत पीक वाढीसंबंधित जिवाणू हवेच्या सान्निध्यात वाढणारे आहेत. त्यांना गरजेइतका हवेचा पुरवठा कसा करावयाचा? पीकवाढीसाठी जशी काही अन्नद्रव्यांची गरज असते तसेच काही संजीवकांचीही गरज असते. ही संजीवके बाजारातून आणावयाची की आपल्या जमिनीत वाढणाऱ्या पिकाच्या मुळांपाशीच तयार करण्याचे तंत्र विकसित करावयाचे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे केवळे संवर्धित शेतीत फुकटात सुटू शकतात. असे असूनही या तंत्राचा प्रसार म्हणावा तितका वेगाने होऊ शकला नाही, हे मान्य करावेच लागेल.

यामागील काही कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता बऱ्याच नवीन गोष्टी माहिती झाल्या. एखाद्याने विना नांगरणीचे तंत्र

अवलंबण्याचे ठरविल्यास त्याच्या घरातील ज्येष्ठ मंडळींच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागते. त्यांच्याकडून त्याने ऐकले नाही तर वरिष्ठ पै पाहुण्यांकडून दबाव आणला जातो. शेत रिकामे झाल्यानंतर ट्रॅक्टरवाले नांगरणीसाठी मागे लागतात. संवर्धित शेतीच्या रानात पाने, पालापाचोळा, काडीकचरा, तण काही प्रमाणात दिसतात. सामान्यपणे जमीन स्वच्छ तणमुक्त असली पाहिजे या विचारांचा पगडा शेतकऱ्यांत इतका पक्का आहे की, अशा शेतकऱ्याला वेडा ठरविले जाते.

नांगरणी आणि पूर्व मशागतीचा पगडा शेतकऱ्यावर इतका प्रचंड आहे की, बहुतेकांचा चांगली पूर्वमशागत केल्याशिवाय पीक येणेच शक्य नाही अशी पक्की कल्पना असते. फक्त नांगरून भुसभुशीत केलेल्या जमिनीतच पिकाची मुळे व्यवस्थित वाढू शकतील. विना नांगरणीत मुळाची वाढ होऊच शकणार नाही, असा अनेकांचा विश्वास असतो. सेंद्रिय खताबाबत असेच अनेक गैरसमज आहेत. जमिनीला सर्वांत उत्तम खत म्हणजे आपण पाळलेल्या चारपायाच्या जनावराने चारा खाऊन दिलेल्या शेणापासून तयार झालेले खत. वनस्पतीच्या इतर भागापासून खत होऊच शकणार नाही, अशी पक्की समजूत. मुळात पशुपालन करणे अवघड बनत चालले आहे. वैरण कापणे, गोठ्याकडे नेणे, शेण गोळा करून त्याचे खत करणे, हे खत वाहनात भरून परत शेतामध्ये नेऊन मिसळणे या कामाला मजूर टंचाईमुळे खूप मर्यादा पडतात. धान्ये, कडधान्याच्या काडातून वैरण आणि खत तयार होते. ते धान्य व कडधान्याच्या शेतीला कधीच भेटत नाहीत. हे सगळे फळबाग, भाजीपाला, ऊस अशी पिके फस्त करतात. या झाल्या काही सामाजिक अडचणी.

भू सूक्ष्म जीवशास्त्राचा अभ्यास ः

भू सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास केल्यास शेणखत हे सर्वात हलक्या दर्जाचे खत ठरते. जनावरे रवंथ करण्यामध्ये वैरण खूप चावून चावून बारीक करतात. यामुळेच त्यातील गरजेची अन्नद्रव्ये मोकळी होऊन जनावरांचे शरीरपोषण होते. परंतु या बारीक आकारामुळे ते जलद कुजते. आपल्याला नवीन शास्त्राप्रमाणे जागेलाच व प्रदीर्घ काळ कुजविणे गरजेचे असल्याने शेण हा पदार्थ आपल्या काही कामाचा नाही. हा सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यास अंधारात राहिल्याने चांगले कुजवलेले खत मिसळण्याची शिफारस आजही केली जाते. शेणखतावर शेतकरी समाजाची इतकी प्रचंड भक्ती आहे की,त्यापासून त्यांना बाजूला करणे खूप अवघड काम आहे. एका उच्चशिक्षित हौशी शेतकऱ्यांच्या गटाने नुकतेच माझे एक पुस्तक सामुदायिक पारायणासाठी निवडले. ३ ते ४ भाग वाचल्यानंतर पुढील वाचन श्रोत्यांच्या आग्रहाखातर बंद करावे लागले. त्यातील अनेक विधाने प्रचलित विचारसरणीच्या पूर्णपणे परस्परविरुद्ध दिशेची होती. प्रामुख्याने विरोध हा तणनाशक आणि त्यातल्या त्यात ग्लायफोसेटच्या वापराला असावा. मागील २ वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका कंपनी विरुद्ध या तणनाशकाबाबत एक खटला खेळला गेला. त्यात खालच्या न्यायालयात कंपनी हरली. त्यांना जबर दंड लावला गेला. वरच्या कोर्टात ही कंपनी खटला जिंकला. आज अमेरिकेत सर्वत्र हे तणनाशक खुल्या बाजारात उपलब्ध आहे आणि वापरही चालू आहे. लोकांच्या मनात तणनाशकाच्या वापराबाबत संभ्रमता निर्माण झाली.

संवर्धित शेतीची संकल्पना चालू होण्यात जगात दोन शोध कारणीभूत ठरल्याचा उल्लेख आहे. मशागत न करता पेरणी करणारी यंत्रे आणि तणनाशकांचा शोध. केवळ ग्लायफोसेट सारखे तणनाशक उपलब्ध झाल्याने आमच्याकडे संवर्धित शेती सुरू होऊ शकली. ऊसशेतीस फेरपालटसाठी सतत उगवून येणारे उसाच्या जमिनीखालील अवशेष फक्त ग्लायफोसेटमुळे जसे वाढले त्याच अवस्थेत मारता येतात. पुढे त्यांचे ४ ते ६ महिन्यात हळूहळू सेंद्रिय खत होते. अपघाताने लागलेल्या या शोधामुळे केवळ एकाच वर्षात अगदी फुकटात जमिनी ३० ते ४० वर्षांपूर्वी प्रमाणे सुपीक झाल्या. जमिनी आता उत्तम उत्पादन देऊ लागल्या, याचा सरळ अर्थ जमिनीच्या सुपिकतेला कोणतीही बाधा पोचलेली नाही. माझ्या गुळाची गोडी दरवर्षी वाढत गेली. त्याला एक स्वतंत्र चव स्वाद सुगंध आला. तांदळाचा गेलेला वास परत आला. हे सर्व जमिनीची सुपीकता सुधारल्यानेच घडले, असे मला वाटते.

ग्लायफोसेटसह सर्वच रसायनांचे शेषभाग जमिनीत विघटन होऊन नष्ट पावतात. त्याची सविस्तर माहिती ‘प्रिन्सिपल्स ऑफ विड सायन्स’ या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक केवळ रासायनिक तणनाशकाचे वापरावरच लिहिले आहे. १९८० च्या सुमारास या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. ज्या वेळी तणनाशकाच्या वाईट परिणामावर चर्चाही सुरू झाली नव्हती. सूक्ष्मजीवशास्त्राचे पुस्तकात याला ‘बायो डिग्रेडेशन ऑफ पेस्टिसाईट’ अगर रसायनांचे जैविक विघटन असे म्हटले आहे. हे रसायनांचे जैविक विघटन आहे. या रसायनांचे शेषभाग विघटन करण्याचे काम सेंद्रिय पदार्थ कुजत असता तयार होणाऱ्या उपपदार्थामुळे होते. आपण फक्त रसायनांचा वापर शिकविला. त्यांचे शेषभाग नष्ट करणारे तंत्र शेतकऱ्यांना शिकविलेच नाही. आजही आपण चांगले कुजलेल्या शेण खताभोवतीच अडकून पडलो आहोत. रसायनांचा गरजेइतका वापर करा, अतिरेक करू नका असे सांगत असताना अतिरेक करण्याची वेळ शेतकऱ्यावर का येते ? ती येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे ? हे ही शिकविणे गरजेचे आहे. याऐवजी रसायनाबाबत भीतीचे वातावरण निर्माण करून आम्ही काय मिळवीत आहोत ? याचा सखोल शास्त्रीय अभ्यास महत्त्वाचा आहे.

-------------------------------------

संपर्क ः प्र.र.चिपळूणकर, ८२७५४५००८८ ( लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com