Sugarcane : ऊस पक्वता काळाचा अभ्यास महत्त्वाचा....

पक्वता म्हणजे उसाची शाकीय वाढ मंदावते. पानात तयार झालेल्या साखरेपेक्षा वाढीसाठी कमी साखर वापरली जाते. शिल्लक साखर पेरात साठविली जाते. यामुळे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर नंतरची ऊस वाढ ही उत्पादन वाढण्याच्या दृष्टिने नगण्य असते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पीकवाढीच्या टप्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon

सामान्यपणे शेतकऱ्यांना असे वाटत असते की, उसाची (Sugarcane Cultivation) केव्हाही लावण केली आणि त्याला १२ महिने पूर्ण झाले की, त्याला पक्वता (Sugarcane Maturity Period) येईल. ऊस लावण जानेवारी, फेब्रुवारीत केली आणि पुढील जानेवारी - फेब्रुवारीत त्याची तोडणी झाली तर त्याच्या वाढीला बारा महिने मिळाले. त्यामुळे समाधानकारक उत्पादन (Sugarcane Production) मिळेल. वास्तवात असे होत नाही. समजा आडसाली लावण केली तर त्याचा पक्वता काळ पहिल्या ऑगस्टमध्ये चालू होत नाही. दुसऱ्या ऑगस्टमध्ये चालू होऊन त्याला वाढीचा ११ते १२ महिन्यांचा कालावधी मिळतो. पूर्व हंगामी सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये लावण केली तर त्याला १० ते ११ महिन्यांचा आणि फेब्रुवारीत लावण केल्यास ६ ते ७ महिन्यांचा काळ मिळतो. या वाढीच्या कालावधीवर उत्पादनाची मर्यादा ठरत असते.

१) ऊस पक्वता सुरू होण्याचा काळ हा निसर्गाने ठरवून दिला आहे. त्याचा तुम्ही लावण केलेल्या तारखेशी संबंध नाही. पक्वता काळास १५ ऑगस्टच्या दरम्यान सुरवात होते. पुढे नोव्हेंबरपर्यंत बऱ्यापैकी पक्वता येऊन हंगामाला सुरवात होते. पक्वता म्हणजे उसाची शाकीय वाढ मंदावते. पानात तयार झालेल्या साखरेपेक्षा वाढीसाठी कमी साखर वापरली जाते. शिल्लक साखर पेरात साठविली जाते. यामुळे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर नंतरची ऊस वाढ ही उत्पादन वाढीच्यादृष्टिने नगण्य असते.

Sugarcane
Sugarcane Pyrilla किडीचे व्यवस्थापन कसे कराल? | Sugarcane Pyrilla| Agrowon | ॲग्रोवन

२) शेतकऱ्यांना असे वाटत असते की, फेब्रुवारी ते फेब्रुवारी १२ महिन्यांचा ऊस तुटला म्हणजे वाढीसाठी १२ महिने मिळाले. अलीकडे बांधलेल्या हमीभावामुळे दर बऱ्यापैकी मिळत राहिल्याने शेतकरी मार्च किंवा एप्रिल आला तरी लावणी सुरू ठेवतात. अशा उसाला उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही.

३) मला नेहमी शेतकऱ्यांकडून विचारणा होते की, जुलै- ऑगस्ट आला, तरी आता उत्पादन वाढीसाठी खताचा काय हप्ता देऊ ?. पक्वतेचा विचार केल्यास हे अत्यंत चुकीचे आहे. लवकर पक्व होणाऱ्या जातीचा पक्वता काळ लवकर आणि उशिरा तयार होणाऱ्या जातीची शाकीय वाढ बंद होऊन पक्वता काळ थोडा उशिरा सुरू होतो. या नियमाला अनुसरून लवकर पक्व होणाऱ्या जातीसाठी खताचे हप्ते मे पूर्वी आणि उशिरा पक्व होणाऱ्या जातीसाठी खताचे हप्ते मे अखेर पूर्ण करावेत. परंतु उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी उशिरापर्यंत खताचे हप्ते देतात. यातून नैसर्गिक पक्वता काळ चालू होण्यात अडचणी निर्माण होतात. हा अतिरिक्त खत हप्ता साखर उताऱ्यासाठी नुकसानकारक ठरतो. यातून खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा गैरवापर सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.

Sugarcane
Sugarcane : महाराष्ट्र, कर्नाटकात यंदा ऊस क्षेत्रात सात टक्क्यांनी वाढ

४) साखर उतारा जास्तीत जास्त कसा मिळविता येईल याकडे बारीक लक्ष द्यावे. मात्र आपले लक्ष उसाचे टनेज कसे जास्त मिळविता येतील याकडे आहे. या चुकीच्या विचारसरणीमुळे साखर उद्योग आणि ऊस शेतीचे नुकसान होत आहे. आज तरी यावर विचार करावयास कोणालाच सवड नाही. साखर उताऱ्यावर उसाला दर देणे हा एकच आशेचा किरण आहे. संवर्धित शेतीतून उत्पादन खर्च वाचविता येईल. परंतु वरील मूलभूत त्रुटींवर या तंत्रातून सुधारणा होऊ शकत नाहीत.

कर्ब, नत्राची जमिनीतील स्थित्यंतरे ः

१) जमिनीच्या वरच्या एक मीटर थरात २२०० द.ल. टन कर्ब साठविलेला असतो. यापैकी दोन तृतीआंश साठा सेंद्रिय आणि एक तृतीआंश साठा रासायनिक स्वरूपात असतो. पृथ्वी भोवतालच्या वातावरणाच्या थरात असणाऱ्या कर्ब साठ्याच्या तुलनेत हा साठा तिप्पट असतो.

२) जंगल तोड, जंगल जमिनीचे शेत जमिनीत रूपांतर आणि शेत जमिनीची मशागत, शेती करण्याच्या सुधारित पद्धती यातून गेल्या ३० वर्षात वरीलपैकी ६० टक्के जमिनीतील साठा नष्ट होऊन त्यातील कर्ब हवेतील कर्ब वायूमध्ये मिसळला गेला. धूप आणि मशागतीमुळे होणारा कर्बाचा नाश असाच चालू राहिला तर अन्नधान्याच्या

उत्पादनावर विपरीत परिणाम होईल. याविषयी आता जागृती होऊ लागली आहे. आपल्याला आता परत हवेतून जमिनीत कर्ब आणून त्याचा साठा करणे आणि असा साठा वाढवत नेणे इकडे लक्ष द्यावे लागणार आहे. इंग्रजीत याला "कार्बन सिक्वेस्ट्रेशन'' म्हणतात. यासाठी काय केले पाहिजे याची माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे.

३) वनस्पती आणि प्राणीजन्य पदार्थ कुजल्यावर त्यातून सेंद्रिय कर्ब तयार होतो. या कुजविण्याच्या कामात असंख्य सूक्ष्मजीव भाग घेतात. यात जिवाणू, ॲक्टिनो मायसेटरा आणि बुरशी असे तीन सुक्ष्मजीवांचे गट भाग घेतात. याबाबतची माहिती यापूर्वी मी दिली आहे.

४) कुजणाऱ्या पदार्थांचेही तीन गट असतात. लवकर, मध्यम मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे कुजणारे पदार्थ. वरील तीनही सूक्ष्मजीवांच्या गटामध्ये तीनही गटातील लवकर कुजणाऱ्या पदार्थातून लवकर खत तयार होते आणि पुढे ते लवकर संपूनही जाते. याप्रमाणे मध्यम मुदतीचे पदार्थ मध्यम मुदतीमध्ये कुजतात आणि खत थोडे जास्त दिवस टिकते. दीर्घ मुदतीने कुजणारे पदार्थ कुजण्यास दीर्घ काळ लागतो आणि तयार झालेला कर्ब दीर्घ काळ टिकून राहतो. याला इंग्रजीत ह्यूमस म्हणतात. जमिनीत संपून जाणारा आणि टिकून राहणारा असे दोन प्रकारचे सेंद्रिय कर्ब असतात. यापैकी ह्यूमस हा टिकाऊ सेंद्रिय पदार्थ होय. टिकाऊ म्हणजे काही शेकड्यांपासून हजार वर्षांपर्यंतही याचे आयुष्य असू शकते.

पंकज चव्हाण यांची ऊस लावण पद्धत ः

उसाची ट्रेमध्ये रोपे तयार करणे खर्चिक व कष्टदायक काम आहे. तरीही रोपे लावण्याची पद्धत खुपच लोकप्रिय आहे. माझ्या ओळखीचे शेतकरी पंकज चव्हाण यांनी स्वस्त, सोपी, कमी कष्टाची आणि जोखमीने रोपे तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. या प्रयोगाचे अनुभव मांडत आहे.

१) बेणे तयार करण्याचा ऊस न तोडता फक्त वाडे तोडायचे. वरील वाढ बंद झाल्याने वरून ४ ते ५ डोळ्यांतून फुटवे बाहेर पडतात. लावणीचे क्षेत्र, रोपांची एकूण संख्या याचे गणित करून तितक्‍या उसाचे वाढे तोडावे. ३० ते ३५ दिवसात उसावरच रोपे तयार होतात. बेणे तोडणे, रोप करण्याच्या जागी नेणे, कांडी तयार करणे, ट्रे व कोकोपीट खरेदी, दररोज पाणी घालणे इत्यादी कामे वाचतात.

२) साधारण ३० ते ४० सेंमी लांबीची ४ ते ५ रोपे एका उसावर तयार होतात. फुटलेल्या डोळ्यापर्यंत लावणीच्या वेळी तोडावे. विळतीने एक डोळ्याचे रोप तयार करावे. कांडीच्या लांबीपेक्षा जास्त झालेली रोपाची वाढ कापून टाकल्याने हाताळणी, वाहतुकीत नुकसान होत नाही. या रोपाला मुळे नसतात. माती नसते, अशा रोपाचे वजन खूप कमी असते. पोत्यात भरूनही दूरपर्यंत सहज वाहतूक करता येते.

३) आता एक डोळ्याच्या कांडीप्रमाणे सरीच्या तळात कुदळीचे दोन घाव मारले तर बेणे लावणीपूरता खड्डा तयार होतो, त्यात रोप लावावे. लावण झाल्यानंतर बेण्याला खाली कांडीमुळे फुटू लागतात. डोळ्यातून बाहेर आलेल्या कोंबाची वाढ थांबते आणि ३ ते ४ फुटवे एकाच वेळी ४ ते ५ दिवसात जमिनीतून बाहेर पडू लागतात. सहसा वाढणारा कोंब निवडला गेल्यामुळे नांगे पडण्याचे प्रमाण खूप कमी असते.

४) या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा कांडीची उगवण अवस्था उसावरच संपते. रानात लावल्यावर ४५ दिवसानंतरची फुटीची अवस्था लगेच सुरू होते. हे दिवस वाचल्याने वाढीला ३० ते ४० दिवस जास्त मिळतात. वरील फुटलेली रोपे काढून घेतल्यानंतर त्या खालील ३ ते ४ डोळे फुटतात. गरज लागल्यास परत नवीन बेणे मिळते. नको असल्यास खालील शिल्लक ऊस बाकी उसाबरोबर कारखान्याला तुटून जातो. अशा रोपांची विक्री करणे शक्‍य आहे. ट्रे मधील रोप २.५० रुपयांना विकले जाते. मात्र हे रोप १ ते १.५० रूपयांच्यापर्यंत विकले तरी परवडते.

५) ट्रे मधील रोप स्थिर स्थावर होण्यात एक महिना लागतो. या रोपाला स्थिर स्थावर होण्यास ४ ते ६ दिवस पुरेसे आहेत. यातून लावणीतील बेणे खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत शक्‍य होते. वाढीचा कालावधी जास्त मिळण्याचा फायदा भरपूर आहे.

६) संवर्धित शेती म्हणजे फक्त जमिनीची सुपीकता वाढविण्याचा तसेच खर्च कमी करणे नव्हे., तर प्रत्येक खर्च कसा कमी करता येईल अशा प्रत्येक बाबीला यामध्ये महत्त्व आहे.

-----------------------------------------------------------------------------

संपर्क ः प्रताप चिपळूणकर,८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com