सुभाण्या: समीर गायकवाड यांची चटका लावणारी कथा

शेवंताला देवाघरी जाऊन दोनेक महिने उलटून गेले होते. आज लोचनाबाईंनी सुभान्याचा अक्षरशः दोसरा काढून गावकऱ्यांच्या लाडक्या आबाला म्हणजेच आपल्या पतीला साखरवाडीला पाठवलं होतं. जाताना शेरभर गव्हाची खीर पितळी डब्यात दिली होती.
Subhany
SubhanyAgrowon

समीर गायकवाड

शेवंताला देवाघरी जाऊन दोनेक महिने उलटून गेले होते. आज लोचनाबाईंनी सुभान्याचा अक्षरशः दोसरा काढून गावकऱ्यांच्या लाडक्या आबाला म्हणजेच आपल्या पतीला साखरवाडीला पाठवलं होतं. जाताना शेरभर गव्हाची खीर पितळी डब्यात दिली होती. गरमागरम खीर डब्यातून सांडू नये म्हणून स्वच्छ फडकं तोंडाला बांधून दिलं होतं. डबा असलेली पिशवी पायापाशी ठेवली तर हिंदकळून डबा पडेल आणि डबा मांडीवर घेऊन बसलं तर चटका बसेल हे ओळखून डब्याखाली कापडाची मोठी चुंबळच तयार करून दिली होती. थंड खीर दिली असती, तर एसटीतल्या वाऱ्या वावदानाने ती अजूनच थंड झाली असती आणि गार खिरीला सुभान्या तोंड लावत नव्हता हे त्यांना पक्कं माहिती होतं.

म्हणून रामपारी उठून जर्मनचं पातेलं मातीनं सारवून त्यात शेरभर गहू, किलोभर पिवळ्या धम्मक गुळाचा तुकडा, मूठभर वेलची, जायफळीचा मोठा लठ तुकडा घालून त्यांनी टचटचीत खीर करून कडीच्या पितळी डब्यात घालून आबांच्या हातात दिली होती. इतकंच नव्हे तर आपला नवरा कुठं तरी मन उदास करून रस्त्यालगतच बसून राहील, साखरवाडीला जायचाच नाही याचा अंदाज लावत त्या स्वतःच आबांना घालवून देण्यासाठी पांदीपर्यंत सोडण्याऐवजी मैलभर चालून हमरस्त्याला एसटीच्या थांब्यापाशी आल्या होत्या. आपला मुलगा सुरेश हा जर आबांना सोडायला गेला असता, तर आबांना त्यांच्या भावना त्याच्यापाशी व्यक्त करणं जमलं नसतं हेही लोचनाबाईंना माहिती होतं, त्यामुळेच सुरेशने मिनतवाऱ्या करूनही त्यांनी त्याला घरी थांबायला भाग पाडलं होतं.

Subhany
Mixed Cropping : प्रयत्नपूर्वक शेतीतून समृद्धी अन् समाधान

सकाळच्या वक्ताला एसटीची वाट बघत डांबरीवर उभ्या असलेल्या त्या दोघांना जोडीनं बघून गावकऱ्यांना खूप आश्‍चर्य वाटलं, पण कुणाची बिशाद झाली नाही काही विचारायची ! कारण गोविंद भोसल्यांच्या घराला गावात मोठा मान होता. त्यांच्या घरातलं सुखदुःख गावाचं सुखदुःख होतं. याचं एक कारण असंही होतं, की हे कुटुंब गावातल्या प्रत्येक घराच्या सुखदुःखात सामील होतं. लोचनाबाई म्हणजे गावाची लाडकी नानीबाई. गावात कुणाच्या घरी बाईमाणसाला काहीही झालं, कुणाला काही कमी पडलं, कुणाच्या चुलीवरचं भांडं रितं असल्याचं कळलं, कुणाची कूस उजवणार असल्याची बातमी कळली, कुणाला चोळी-बांगडीची ददात असली, की नानी त्या घरात यायचीच. त्या घरातल्या माणसाला तिच्यापर्यंत जावं लागत नव्हतं. कुणी ना कुणी ही वार्ता तिच्यापर्यंत पोहोचतं करायचाच !

Subhany
Indian Media : वृत्तपत्रांचे बदलते जग

बंद्या रुपयाएवढं गोल गरगरीत कुंकू ल्यालेली सावळ्या रंगाची लोचना नानी आपसूक हजर व्हायची. चाळिशी पार केलेल्या नानीचं व्यक्तिमत्त्व खास होतं. ती काही खूप देखणी वा रुबाबदार स्त्री नव्हती. मात्र तिच्या चेहऱ्यात विलक्षण गोडवा होता, तेज होतं. आवाजात कमालीचं मार्दव होतं, डोळ्यांत सदैव कणव दाटलेली असे. कुणाला काही द्यायचं असलं, की तिचा हात आखडता नसे. आबांचंही असंच होतं, गावातलं तालेवार घराणं होतं त्यांचं. कुणाच्याही घरी तंटा-बखेडा झाला, की त्याचा तोडगा काढण्याचं काम त्यांच्याकडेच यायचं. त्यांच्या शब्दाला गावात मोठा मान होता. त्यांच्याकडे कुठलं पद नव्हतं की कसली जहागिरी नव्हती; पण लोकांच्या सच्चा प्रेमाचे ते खरे मनसबदार होते.

त्यांचं सगळं सुखात चाललं होतं, पण एकाएकी त्यांच्या सुखात जणू बिब्बा उतला आणि होत्याचं नव्हतं झालं होतं. मागच्या काही दिवसांत या दांपत्यांनं स्वतःला जणू कोंडून घेतलं होतं. त्यांच्या परिघात कुणीच नव्हतं, लोक मात्र त्यांच्या मदतीस आतुर होते, पण काय बोलायचं आणि या दुःखाच्या डोंगरातून कसं बाहेर काढायचं हेच मुळी कुणाला उमगत नव्हतं, त्यामुळे इच्छा असूनही कुणी त्यांच्या दुखवट्यावर उतारा शोधू शकले नव्हते. नाही म्हणायला गावातली जुनी जाणती मंडळी अनेकदा त्यांच्या घरी जाऊन आली होती, त्यांचं दुःख जरी मोठं असलं, तरी त्यांनी आता ते विसरलं पाहिजे यासाठी आपल्या परीने बोलून आली होती. मात्र त्याचा फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळे आज आबांना निरोप द्यायला आलेल्या नानीला पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले होते.

दोन महिनं झालं आपला घरधनी खिन्न बसून आहे याचं लोचना नानीस मनस्वी वैषम्य होतं. मागच्या कैक दिवसांपासून अन्नाचा घास देखील त्याच्या घशाखाली नीट उतरत नाही; तो नुसता आपल्या जिवाला खातो हे तिला ठाऊक होतं. घरात असला की आढ्याला नजर लावून बसतो. पारावर गेला की वडाच्या पारंब्यात गुतून पडतो आणि देवळात गेला की शून्यात नजर लावून बसतो, शेतात गेला की बांधावर बसून वाटंला डोळं लावून बसतो. पार थिजून जाईपर्यंत डोळ्यांत प्राण एकवटून एका जागी मुकाट बसून राहतो. कुठलं काम करत नाही की कुणाशी बोलत नाही. त्याचं कुठं म्हणून चित्त लागत नव्हतं हे तिनं पुरतं ओळखलं होतं, यावर काय उपाय केला पाहिजे, हे मात्र तिला उमगत नव्हते.

खरं तर आबांचं वागणं आधी असं नव्हतं. पण एकुलत्या एक पोरीचं आयुष्य डोळ्यादेखत उद्‌ध्वस्त होताना पाहून त्यानं हबका खाल्लेला. ज्या दिवशी त्यांची मुलगी शेवंता हे जग सोडून गेली, त्या दिवसापासून या दांपत्याचं जगणंच खुंटलेलं. उगाच श्‍वास चालू आहेत म्हणून त्यांना जितं जागतं म्हणायचं. आठवणींच्या उमाळ्यातून वारंवार येणारी दुःखाची स्पंदनं आणि त्यातून दाटून येणारी कणव सोडली, तर त्यांच्या जीवनात कुठलाच रसरंग उरला नव्हता.

आपला पती खचल्यावर आपण कंबर कसून त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे हे लोचनाबाईस ठाऊक होतं त्यामुळेच ती चेहऱ्यावरचं नैराश्य सफाईदारपणे झाकत उसनं अवसान आणून त्याला धीर द्यायची. आज मात्र सुभान्याचं निमित्त करून नानीनं आबांना गावाबाहेर पाठवण्यात यश मिळवलं होतं. त्याला ते सहजासहजी तयार झालेले नव्हते. आठवडाभर मनधरणी केल्यावर त्यांनी होकार भरला होता. त्याला कारणही तसंच होतं, आबांचा सुभान्यावर अतोनात जीव होता.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com