गंधक : उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे अन्नद्रव्य

पीक पोषक अन्नद्रव्यांव्यतिरिक्त जमीन सुधारक म्हणून गंधकाचा उपयोग होतो. गंधकामुळे तेलबिया पिकात तेलाचे प्रमाण सरासरी २ ते ११ टक्क्यांनी वाढण्यास मदत होते. कांदा,लसणामध्ये तिखटपणा वाढतो.फळे व भाजीपाला पिकांचा रंग आकर्षक होतो, गुणवत्ता सुधारते.
Crop Nutrient
Crop NutrientAgrowon

डॉ.अर्चना पवार, डॉ.विजय अमृतसागर

--------------------------

पीक पोषण (Crop Nutrition) शास्त्रानुसार गंधक (sulfer) हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. पिकांची गंधकाची गरज ही स्फुरदाएवढी असून पिकातील त्यांचे कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते आहे. पिकांकडून गंधकाचे भरपूर शोषण, गंधक विरहित खतांचा मोठ्या प्रमाणात वापर, पिकांकडून गंधकाचे शोषण आणि पुरवठा यातील मोठी तफावत तसेच काही प्रमाणात वापरलेल्या गंधकाचा पाण्याद्वारे होणारा निचरा अशा अनेक कारणांमुळे शेत जमिनीत गंधकाची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून येत आहे. कडधान्य, गळीत धान्य, तृणधान्य, भाजीपाला (Vegetable), फळ भाज्या, फुलझाडे, ऊस (Sugarcane), कापूस (Cotton), केळी, द्राक्षे यासारखी नगदी पिकात निव्वळ गंधकाच्या वापराने १५ ते २५ टक्के उत्पादनात (Crop Production) वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गंधकाच्या वापरामुळे गळिताच्या पिकांमध्ये सरासरी २ ते ११.३ टक्यांपर्यंत तेलाचे प्रमाण वाढते. पीक पोषक अन्नद्रव्यांव्यतिरिक्त जमीन सुधारक म्हणूनही गंधकाचा उपयोग होतो.

जमिनीतील गंधकाची उपलब्धता ः

१) गंधक हे अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य असून जमिनीत त्याचे सरासरी प्रमाण ०.०६ ते ०.१ टक्के असते. परंतु काही वेळा शेत जमिनीत एकूण गंधकाचे प्रमाण २० पीपीएम पासून हजारो पीपीएम इतके असू शकते.

२) बऱ्याच शेतजमिनीत हे प्रमाण ५० ते ५०० पीपीएम या प्रमाणात आढळते. सर्वसाधारणपणे शेतजमिनीत हे प्रमाण गंधक खनिज पदार्थ व सेंद्रिय स्वरूपात असतो.

३) गंधक हे जमिनीच्या सर्व थरातून आढळते. परंतु शेतजमिनीच्या वरच्या थरात गंधकाचे प्रमाण जास्त असते. एकूण गंधकाच्या प्रमाणाच्या अगदी थोड्या प्रमाणात जमिनीत गंधक द्रवस्वरूपात असते. त्यातून पिके गंधकाची गरज भागवितात.

गंधकाच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक

१. जमिनीतील गंधकाचे प्रमाण ः

- शुष्क आणि साधारण शुष्क विभागातील जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असते, अशा जमिनीत गंधकाची उपलब्धता कमी असते.

२. जमिनीचा पोत ः

- भारी पोताच्या जमिनीत गंधकाच्या उपलब्धतेचे प्रमाण हलक्या, मुरमाड पोताच्या जमिनीपेक्षा जास्त असते. हलक्या पोताच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असते. तसेच पाझरण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा जमिनीतून गंधक वाहून जाण्याचे प्रमाण जास्त असते

३. सेंद्रिय पदार्थ आणि त्याचे विघटन ः

- जमिनीतील सेंद्रिय पदार्थात गंधकाचे प्रमाण ०.१५ टक्यांपेक्षा कमी किंवा कर्ब- गंधक गुणोत्तर २०० पेक्षा जास्त असेल तर सेंद्रिय पदार्थ गंधकाला मोकळा करणाऐवजी घट्ट पकडून ठेवतात. अशा प्रकारे घट्ट पकडून ठेवलेला गंधक मोकळा होण्यासाठी जास्त तापमानाची गरज असते.

- जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण हे शेत जमिनीच्या जल धारण शक्तीच्या ६० टक्के असावे. या घटकामुळे जमिनीतील जिवाणूंचे प्रमाण वाढते आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटन होण्यास मदत होऊन गंधक हा द्राव्य स्वरूपात उपलब्ध होण्यास मदत होते.

४. जमिनीत गंधकाचा वापर ः

- शेतजमिनीस सेंद्रिय व असेंद्रिय गंधक युक्त खताद्वारे सिंचन आणि पावसाच्या पाण्यातून गंधक मिळाल्यास जमिनीत उपलब्ध गंधक वाढण्यास मदत होते.

५. जमिनीचा सामू ः

- ज्या जमिनीचा सामू ५.५ पेक्षा कमी आहे अशा, जमिनीत गंधकाची उपलब्धता कमी होते.

६. जमिनीतील ओलावा ः

- अतिशय शुष्क जमिनीत किंवा पुरेशा ओलाव्या अभावी सल्फेट गंधक ऋणविद्युत भारीत कणांची मुळाकडे होणारी हालचाल मंदावते,

त्यामुळे पिकांद्वारे गंधकाचे शोषण कमी प्रमाणात होते.

Crop Nutrient
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ठरेल प्रभावी

कमतरतेची कारणे ः

१. हलक्या, रेताड जमिनीत उपलब्ध गंधक आणि सेंद्रिय पदार्थाचे कमी प्रमाण, निचऱ्याचे प्रमाण जास्त.

२. गंधक विरहित खतांचा मोठ्या प्रमाणात वापर.

३. जमिनीत सातत्याने पीक लागवड आणि ज्या पिकांची गंधकाची गरज जास्त आहे अशी पिके सतत घेणे. उदा. कडधान्ये, तेलबिया, चारा पिके इ.

४. पीक फेरपालटीमध्ये कडधान्ये व गळीताची पिके सतत घेणे.

५. पिकांद्वारे गंधकाचे शोषण व पुरवठा यातील मोठी तफावत.

६. सेंद्रिय खत वापराचा अभाव किंवा गरजेपेक्षा कमी प्रमाणात वापर.

७. काही प्रमाणात वापरलेल्या गंधकाचा पाण्याद्वारे होणारा निचरा इत्यादी.

पीकवाढीच्यादृष्टीने गंधकाचे कार्य ः

१. गंधक हरित द्रव्याचे घटक नसले तरी वनस्पतीच्या पानातील हरित द्रव्य तयार करण्यास मदत करते.

२. अनेक प्रथिने व पाचकरस तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग. मोहरीच्या तेलासारख्या उडून जाणाऱ्या संयुक्त पदार्थांचा आवश्यक घटक.

३. तेलबिया पिकात तेलाचे प्रमाण सरासरी २ ते ११ टक्क्यांनी वाढण्यास मदत.

४. कांदा,लसणामध्ये तिखटपणा वाढतो.

५. फळे व भाजीपाला पिकांचा रंग आकर्षक, गुणवत्ता सुधारते.

६. चारा व चारा पिकात नत्र: गंधक गुणोत्तराचे प्रमाण कमी करून त्याचे पोषणमूल्य आणि प्रतवारीत सुधारणा.

७. तृणधान्य पिकाची प्रत सुधारते.

८. उसाच्या रसाची प्रत सुधारते, साखरेचे प्रमाण व उतारा वाढण्यास मदत.

९. मुळांची वाढ, बीजधारणा आणि मुळांवरील गाठी बनविण्यास उत्तेजन.

१०. जमिनीचा सामू कमी करणे तसेच अल्कधर्मी, चुनखडीयुक्त व चोपण जमिनी सुधारण्यास मदत.

Crop Nutrient
कापूस पिकासाठी पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन

गंधकाच्या कमतरतेची लक्षणे

१. पिकामध्ये गंधकाच्या कमतरतेची लक्षणे ही नत्राच्या कमतरतेशी मिळतीजुळती असतात. नत्राच्या कमतरते प्रमाणेच वनस्पतीची पाने फिकट पिवळ्या रंगाची दिसतात. परंतु गंधकाची कमतरता ही नवीन फुटीच्या पानावर आढळून येते. नत्राचा योग्य वापर केला तरी सुद्धा पिकाचा पिवळेपणा कमी होत नाही.

२. झाडाची वाढ खुंटते.

३. तृणधान्य पिकास पक्व होण्यास उशीर लागतो. उदा. ज्वारी, बाजरी, गहू इत्यादी.

४. कडधान्याच्या मुळावरील गाठींचे प्रमाण कमी होऊन नत्र स्थिरीकरणाचे प्रमाण कमी होते. उदा. तूर, मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, इत्यादी.

५. फळे एकदम पूर्णपणे पक्व न होता त्यांचा रंग फिकट हिरवा दिसतो.

६. चारा पिकांमध्ये जर नत्र : गंधक गुणोत्तराचे प्रमाण जास्त असेल तर त्याची पोषणमूल्ये व गुणवत्ता कमी असते.

कमतरतेवर प्रतिबंध आणि उपाय ः

जमीन किंवा वनस्पतीत गंधकाची कमतरता तुलनात्मक दृष्ट्या सहजा सहजी आटोक्यात आणणे सोपे आहे. त्यासाठी बाजारात अनेक गंधक युक्त खते उपलब्ध आहेत.त्यांचा योग्य प्रमाणात वापर करून गंधकाच्या कमतरतेवर उपाय करता येणे सहज शक्य आहे.

क्रं---खत ---गंधकाचे प्रमाण (टक्के)---व्यवस्थापनाचे स्वरूप

१.---अमोनिअम सल्फेट ---२४---नत्र + गंधकयुक्त खत पेरणीवेळी आणि जमिनीच्या पृष्ठभागावर वापरण्यास योग्य.

२.---सिंगल सुपर फॉस्फेट---१२---स्फुरद + गंधकयुक्त खत पेरणीवेळी सर्व साधारण आणि विम्लधर्मीय जमिनीसाठी योग्य (सामू ८ पेक्षा जास्त )

३.---पोट्यॅशियम सल्फेट---१८---पालाश + गंधकयुक्त खते जी पिके क्लोराईड आयनला संवेदनशील आहेत अशा पिकांसाठी योग्य. उदा. बटाटा, तंबाखू, द्राक्ष इत्यादी.

४.---अमोनिअम फॉस्फेट सल्फेट---१५---नत्र + स्फुरद + गंधकयुक्त खत पेरणीच्या वेळी वापरण्यास योग्य.

५.---मूलभूत गंधक---८५ – १०० ---हलक्या पोताच्या, चुनखडीयुक्त जमिनीत पुरेसा ओलावा व खेळती हवा असताना पेरणीच्या किंवा लागवडीच्या अगोदर ३ ते ४ आठवडे जमिनीत मिसळून द्यावे.

६.---पायराइट---२२---पेरणीपूर्वी ३ ते ४ आठवडे चोपण / विम्लधर्मीय जमिनीसाठी योग्य ओलावा व खेळती हवा असताना जमिनीच्या पृष्टभागात मिसळून द्यावे (१५ ते २० सेंमी खोल).

७.---जिप्सम (शुद्ध) ---१८

---जिप्सम (शेती योग्य) ---१३---हलक्या पोताच्या रेताड जमिनी, ज्या पिकांना गंधक व कॅल्शिअमची गरज आहे अशा पिकांना जमिनीत मिसळून द्यावे. उदा. भुईमूग

८.---मॅग्नेशिअम सल्फेट (किसे राइट)---२२---पिकाला गंधक ताबडतोब मिळण्यासाठी जमिनीत मिसळून देण्यास योग्य.

९.---मॅग्नेशिअम सल्फेट (एप्सम क्षार )---१३---पाण्यात जलद विरघळणारे असल्याने पिकावर फवारून देण्यास योग्य तसेच जमिनीतून देण्यास योग्य.

-------------------------------------------------------

संपर्क ः डॉ.अर्चना पवार,७५८८०४७८५९

(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com