शेतकरी पीक नियोजन : उन्हाळ कांदा

या वर्षी एकरी सरासरी १५० ते १७५ क्विंटल कांदा उत्पादन मिळाले आहे. सध्या साठवणुकीची कामे पूर्ण झाली आहेत. कांदा जास्त काळ टिकण्यासाठी साठवणपूर्व आणि साठवणुकीच्या काळात योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
Onion
Onion Agrowon

शेतकरी ः संदीप आनंदा कोकाटे

गाव ः साताळी, ता. येवला, जि. नाशिक

उन्हाळ कांदा क्षेत्र ः १२

कांदा उत्पादन ः एकरी १५० ते १७५ क्विंटल

----------

माझी साताळी (ता. येवला, जि. नाशिक) येथे १२ एकर शेती आहे. यावर्षी संपूर्ण क्षेत्रावर उन्हाळी कांदा लागवड केली होती. मी शास्त्रीय पद्धतीने कांदा बीजोत्पादन, रोपवाटिका निर्मिती, पुनर्लागवड, कीड-रोग व्यवस्थापन तसेच काढणीपश्‍चात साठवणूक आदी बाबींचे योग्य नियोजन करतो. त्यामुळे उत्पादन वाढीस गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. सध्या मजूरटंचाईची समस्या भासत असल्याने त्यानुसार लागवड व काढणी आदी कामांचे पूर्वनियोजन करणे फायद्याचे ठरते. दर मिळण्यासाठी कांद्याचा दर्जा राखण्यासाठी साठवणूक तंत्र महत्त्वाचे ठरते.

या वर्षी एकरी सरासरी १५० ते १७५ क्विंटल कांदा उत्पादन मिळाले आहे. सध्या साठवणुकीची कामे पूर्ण झाली आहेत. कांदा जास्त काळ टिकण्यासाठी साठवणपूर्व आणि साठवणुकीच्या काळात योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

व्यवस्थापनातील बाबी ः

- दर्जेदार कांदा उत्पादनासाठी बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी दरवर्षी डिसेंबर महिन्यात निवड पद्धतीने डेंगळे कांदे काढून लागवडीसाठी वापरतो. या माध्यमातून घरगुती स्तरावर दर्जेदार कांदा बियाणे उपलब्ध होते. त्यामुळे बियाणे टंचाई आणि हंगामात बियाणांची भाववाढ आदी बाबींचा त्रास होत नाही.

- लागवडीपूर्वी ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करून रोपवाटिका तयार केली जाते.

- पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रोपांची पुनर्लागवड साधारण १ ते ३० डिसेंबर या काळात केली जाते.

- रोपांच्या वाढीच्या काळात पिकास आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते.

- काढणीअगोदर जमिनीच्या प्रकारानुसार २ ते ३ आठवडे आधी पाणी तोडले जाते.

- कांदा पात पिवळी पडून कांद्याच्या ६० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणीच्या कामांस सुरुवात होते. संपूर्ण काढणी मजुरांच्या मदतीने केली जाते.

साठवणपूर्व नियोजन ः

- या वर्षी साधारण ५ ते ८ एप्रिल दरम्यान कांदा काढणीस सुरुवात झाली. मजुरांच्या मदतीने कांद्याची काढणी केली.

- आकारानुसार चिंगळी, गोल, सुपर माल व जोड कांदे असे वर्गीकरण केले जाते. साठवणुकीसाठी दर्जेदार, मोठ्या आकाराचे कांदे निवडले जातात.

- तापमान अधिक असल्याने काढणीनंतर कांदा वाळविण्यासाठी शेतामध्ये ठेवणे टाळले.

- काढणीनंतर लगेच कांदा चाळीच्या बाजूला ढीग करून ठेवले. ढीग केल्यानंतर कांद्यावर २ ते ३ सेंमीची कांदा पात पसरवून घेतली. पातीने कांदे झाकल्यामुळे कांद्याच्या वरील आवरण लवकर परिपक्व होते.

- कांदा काढणीस सुरुवात केल्यानंतर लगेचच कांदा चाळीची तयारी करून घेतली.

चाळीत कांदा साठवणूक ः

- कांदा साठवणुकीपूर्वी चाळीची स्वच्छता करून बुरशीनाशकांची फवारणी केली. कांदा साठवुकीकरिता चाळ स्वच्छ अन् निर्जंतुक असणे आवश्यक असते.

- प्रतवारी केलेले एकसारख्या आकाराचे कांदे चाळीमध्ये साठविले जातात.

- कांदा चाळीत भरताना काळजीपूर्वक चाळीच्या पाखीत टाकला जातो.

- कांदा चाळीमध्ये भरल्यानंतर पावसाळ्यात पाण्यामुळे कांदा भिजणार नाही; याची काळजी घेतली जाते. त्यासाठी बाजूने बारदानाचे पडदे टाकले जातात.

- कांद्याची योग्य प्रकारे काढणी करून काळजीपूर्वक साठवणूक केल्यास कांदा जास्त दिवस टिकतो, असा माझा अनुभव आहे.

- वातावरण बदलाचा साठवणुकीत कांद्यावर परिणाम होतो. त्यासाठी

वातावरणाचा अंदाज घेऊन आर्द्रता वाढल्यास चाळ बंद केली जाते. तर दमट वातावरण असल्यास, चाळ उघडी केली जाते. साठवणुकीत हवा खेळती राहणे फार गरजेचे असते. त्यामुळे साठवणुकीत कांद्याची होणारी संभाव्य सड कमी होते.

विक्री नियोजन ः

- प्रतवारीनंतर बाजारपेठेचा अंदाज घेत मध्यम प्रतीच्या कांद्याची विक्री केली. साधारण २०० क्विंटल कांद्याची सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केली. पुढे दर कमी होत गेल्याने विक्री बंद करून कांदा चाळीमध्ये साठविला.

- येत्या काळात बाजारपेठेचा अंदाज घेऊन जुलैनंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने डिसेंबरपर्यंत कांद्याची विक्री केली जाईल.

- काही वेळा साठवणुकीत कांद्याची सड होण्याची शक्यता असते. अशावेळी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बाजारपेठेचा अंदाज घेत कांदा विक्रीसाठी बाहेर काढला जातो.

- संदीप कोकाटे, ८३२९८७३२३०

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com