
सौ.मयूरी अनुप देशमुख
हिरवळीची पिके (Green Manure) जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा (Organic Matter) पुरवठा करतात. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. जमिनीची जलधारणाशक्ती (Water Holding Capacity) वाढते. याचा पीक उत्पादनवाढीसाठी (Crop Productivity) फायदा होतो. ताग, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार, इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून जमिनीत गाडावीत.
याचबरोबरीने गिरिपुष्प, सुबाभूळ, करंज या पिकाच्या कोवळ्या फांद्या व हिरवी पाने जमिनीत गाडून कुजवावीत. हिरवळीच्या पिकांमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सूक्ष्म जिवांच्या क्रियांची गती वाढते. पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते, धूप कमी होते, जलधारणाक्षमता वाढते.मातीच्या रचनेत सुयोग्य बदल होतात.
शेंगवर्गीय पीक हिरवळीच्या खतासाठी घेतल्याने जास्तीचे नत्र जमिनीत स्थिर होते, त्यामुळे पुढील पिकास नत्राची मात्रा कमी प्रमाणात लागते. हिरवळीची खते जमिनीत खालच्या थरात निघून जाणाऱ्या अन्नद्रव्यांना धरून ठेवण्यास मदत करतात. हिरवळीची पिके जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्ये वरच्या थरात आणतात. हिरवळीचे खत नत्रासोबतच स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोहाची उपलब्धता वाढविते.
सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे.
जमिनीतील सामू मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत चालला आहे.
सखोल पीक पद्धतींचा वापर. असमतोल अन्नद्रव्यांचा वापर. अमर्याद सिंचनाचा वापर.
रासायनिक खाते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा.
जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्म जिवाणूंची संख्या.
वाढत चाललेल्या अपधावाच्या प्रमाणामुळे एक इंच थर (सुपीक थर) अन्नद्रव्यांसह वाहून जातो.
जमिनीच्या शाश्वत आरोग्यासाठी
शेणखतासाठी खड्डा पद्धत किंवा नाडेप पद्धतीचा अवलंब करावा.जैविक खतांचा वापर बीजप्रक्रिया किंवा शेणखतात मिसळून अधिक प्रमाणात करावा. (उदा. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू, ॲझोस्पिरीलम, ॲसेटोबॅक्टर इ.)
पिकांची फेरपालट करावी. त्यात कडधान्य पिकांचा समावेश केल्यास पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता होते. विविध सेंद्रिय खतांचा शिफारशीनुसार वापर करावा.
माती परीक्षणानुसार खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणाद्वारे करावा. जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.
माती परीक्षण करून कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा.
ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांद्वारे अन्नद्रव्ये पीक वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत.
बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार, सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर वाढवावा. मृद व जलसंधारणासाठी उपाययोजना कराव्यात. शेततळी तयार करून संरक्षित पाण्याची सोय करावी.
बागायत क्षेत्रात दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके (उदा. ताग, धैंचा) घेऊन गाडावीत.
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.
जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून त्यानुसार जमीन सुधारणा व पीक पद्धतीचे नियोजन करावे.
शेतातील उरलेले पीक अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे, म्हणजे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढून सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढेल.
(लेखिका डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.