Grape Disease Management : द्राक्षातील केवडा, भुरी रोगाची लक्षणे अन् व्यवस्थापन

महाराष्ट्रातील द्राक्ष पट्ट्यात दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात फळछाटणी केली जाते.
Grape Management
Grape Management Agrowon

डॉ. सुजोय साहा, सुमंत कबाडे, स्नेहा भोसले

महाराष्ट्रातील द्राक्ष (Grape) पट्ट्यात दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात फळछाटणी (Grape Prunning) केली जाते. मात्र, या वर्षी परतीच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उशिरा छाटणी केली आहे. नाशिक आणि सांगली भागातील द्राक्ष उत्पादकांनी (Grape Farmer) ऑक्टोबर महिन्याच्या मध्यवधीपासून छाटण्या केल्या आहेत.

सद्यःस्थितीत थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांत बागेमध्ये सकाळच्या वेळी दव पडते आणि दुपारी सूर्यप्रकाश अशी स्थिती राहते. त्यामुळे बागेमध्ये आर्द्रता तयार होते. अशा आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये वेलींवर प्रामुख्याने केवडा (प्लास्मोपॅरा विटिकोला), भुरी (इरिसिफे निकेटर) या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. वेलीची कोवळी पाने, शेंड्याचा भाग, लहान घड व लहान मणी यावर प्रादुर्भाव दिसून येतो. दरवर्षी द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठे आर्थिक नुकसान होते.

केवडा किंवा डाऊनी मिल्ड्यू (प्लास्मोपॅरा विटिकोला) ः

सध्या बागांमध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फळछाटणी झाल्यापासून आतापर्यंत पाऊस झाला नसला, तरी बागेमध्ये मोठ्या प्रमाणात डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. केवडा रोगाच्या प्रादुर्भावासाठी आर्द्रता हा प्रमुख घटक आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ज्या बागांमध्ये घड लागले आहेत अशा ठिकाणी घडांमध्ये पाणी साठून राहते.

त्यामुळे घडांमध्ये डाऊनीचे प्रमाण वाढते आहे. पाऊस, सिंचन किंवा जास्त प्रमाणात दव पडण्यामुळे झाडाची पाने ओली होतात. त्यामुळे बागेत आर्द्रता वाढते. जीएची (जिबरेलिक ॲसिड) फवारणी किंवा डीपिंग झाल्यामुळे देखील घडांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. जास्त आर्द्रतेच्या काळात लागण झालेल्या पानांवरील बीजाणू रात्रीच्या वेळी इतरत्र पसरून रोगाची दुय्यम लागण होते.

लक्षणे ः

पानाच्या वरील बाजूस पिवळ्या रंगाचे तेलकट डाग दिसून येतात.

पानांच्या खालील बाजूस पांढऱ्या रंगाची बुरशीजन्य वाढ दिसून येते. तसेच घडांवर देखील पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते. पुढच्या अवस्थेमध्ये घड कुजून जातो.

Grape Management
Onion Rate : दर घसरल्याने संताप;सरकारविरोधात घोषणाबाजी अन् मागण्या | ॲग्रोवन

व्यवस्थापन ः

वेलींवर पडणाऱ्या दवामुळे घडांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे सकाळी द्राक्ष वेली हलवून पाणी काढून टाकणे गरजेचे आहे.

फळछाटणीनंतर ३० ते ४५ दिवसांच्या अवस्थेमध्ये द्राक्षवेलीवर आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा.

३० ते ४५ दिवसांच्या बागेमध्ये सीएए बुरशीनाशके.

(फवारणी ः प्रति लिटर पाणी)

मॅन्डिप्रोपॅमिड ०. ८ मिलि किंवा अमिसुलब्रोम ०.३७ मिलि

Grape Management
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

या बुरशीनाशकांच्या दोन फवारण्या घ्याव्यात.

याव्यतिरिक्त डायमेथोमॉर्फ (५० टक्के डब्ल्यू.पी.) ०.५० ते ०.७५ मिलि किंवा इप्रोव्हॅलीकार्ब (५.५५ टक्के) अधिक प्रोपिनेब (६१.२५ टक्के डब्ल्यू.पी.) २.२५ ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक) किंवा सायझोफॅमिड ०.२ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आलटून-पालटून फवारणी करावी

बागेमध्ये मोठ्या प्रमाणात दव असेल तरच मॅन्कोझेब किंवा मेटीराम या बुरशीनाशकांची ५ किलोग्रॅम प्रति एकर प्रमाणे धुरळणी करावी.

बागेमध्ये मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे ठिबकद्वारे ७ ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे.

Grape Management
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

भुरी (इरिसिफे निकेटर) ः

फळछाटणीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो. पाने, कोवळी फूट या भागांवर रोगाची लागण होते. दाट कॅनॉपी असलेल्या वेलीवर दमट हवामानामुळे बुरशीचे बीजाणू लवकर वाढतात. कमी ते मध्यम प्रकाश, २२ ते २८ अंश सेल्सिअस तापमान व दमट वातावरण भुरी रोगासाठी अनुकूल आहे. सध्याचे वातावरण हे भुरी रोगास अनुकूल आहे.

लक्षणे ः

पानांच्या वरील बाजूस पांढऱ्या रंगाचे डाग दिसून येतात. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.

घडांवर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. कालांतराने हे डाग काळसर होतात आणि घडाचा दर्जा पूर्णपणे ढासळतो.

व्यवस्थापन ः

द्राक्षवेलीवरील कॅनॉपीच्या वाढीचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे. जेणेकरून प्रकाशसंश्‍लेषण योग्यरीत्या होऊन प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

Grape Management
Rabi Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजना राज्यभर लागू

रासायनिक नियंत्रण ः

सल्फर २ मिलि आणि ॲम्पिलोमायसिस क्विसक्वॅलिस ५ मिलि प्रतिलिटर पाणी,

मेट्राफेनॉन (५० टक्के एससी) २५० मिलि प्रति हेक्टर किंवा फ्लुओपायरम (१७.७ टक्के) अधिक टेब्यूकोनॅझोल (१७.७ टक्के ४०० एससी) (संयुक्त बुरशीनाशक) ०.६ मिलि प्रतिलिटर पाणी किंवा फ्लुक्झापायरॉक्झाइड अधिक डायफेनोकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक) ०.८ मिलि प्रतिलिटर पाणी किंवा सायफ्लुफेनामाइड (५ टक्के ईडब्ल्यू) ५०० मिलि प्रति हेक्टर

जैविक नियंत्रकांचा (बॅसिलस सबटिलिस, ट्रायकोडर्मा स्पेसीज आणि अ‍म्पेलोमेसेस क्विस्क्वालिस) वापर बुरशीनाशकांच्या फवारण्या कमी करण्यास उपयुक्त ठरतो.

रोग नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर फक्त फळधारणा होईपर्यंत (छाटणीनंतर ५५ ते ६० दिवसांपर्यंत) करावा. फळधारणेनंतर काढणीपर्यंत गंधकयुक्त मिश्रणाचा वापर करावा.

जैविक नियंत्रके आणि बुरशीनाशके एकत्र टॅंक मिक्स करून फवारणी करू नयेत. गरज नसताना कोणत्याही टॉनिकचा वापर करू नये. बऱ्याच वेळा रोगाची लक्षणे व वनस्पती वाढ नियंत्रकांचे अधिक्य आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणारी लक्षणे यामध्ये सारखेपणा दिसून येतो. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बुरशीनाशकांच्या अधिक माहितीसाठी भाकृअनुप-राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांच्या संकेतस्थळावरील परिशिष्ट ५चा (Annexure-५) संदर्भ घ्यावा.

- डॉ. सुजोय साहा, ७०६६२४०९४६

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com