गांडूळ खत, व्हर्मिवॉश निर्मिती तंत्र

गांडूळखतामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असतात. यामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी आईसेनिया फेटिडा आणि युड्रीलीज यूजनी या प्रजातींचा वापर करावा.
गांडूळ खत, व्हर्मिवॉश निर्मिती तंत्र
VermicompostAgrowon

डॉ.आनंद जाधव, डॉ.अविनाश गोसावी

गांडूळखतामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असतात. यामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी आईसेनिया फेटिडा आणि युड्रीलीज यूजनी या प्रजातींचा वापर करावा.

साहित्य ः

१) व्हर्मी बेड (१२फूट x ४फूट x २ फूट आकारमान)

२) पीक अवशेष किंवा झाडांचा पालापाचोळा.

३) शेणखत ,सेंद्रिय पदार्थ कुजविणारे जिवाणू, पाणी.

निर्मिती तंत्र ः

१) प्रथम सपाट जमिनीवर व्हर्मी बेड व्यवस्थित बसवून घ्यावा. व्हर्मी बेडसाठी व्यवस्थित बसण्यासाठी साधारणपणे चार फुटांचे १४ ते १६ बांबूचे तुकडे लागतात.

२) पहिला थर ः बेडच्या तळाशी प्रथम ६ ते ८ इंचांचा पीक अवशेष किंवा वाळलेल्या पानांचा थर द्यावा.

३) दुसरा थर ः यानंतर थरावर अर्धवट कुजलेले शेणखत/ पालापाचोळा किंवा कंपोस्टचा थर द्यावा.

४) तिसरा थर ः कंपोस्टच्या थरावर १०० लिटर पाण्यात ४० किलो शेण मिसळून चांगले मिश्रण तयार करावे. या मिश्रणामध्ये एक टन पीक अवशेष/ पालापाचोळा कुजविण्यासाठी एक किलो कुजविणारे जिवाणू संवर्धक मिसळावे. हे मिश्रण चांगले मिसळून सारख्या प्रमाणात शिंपडावे.

५) पुन्हा या तिसऱ्या थरावर परत ६ ते ८ इंचांचा पीक अवशेष/ पालापाचोळ्याचा थर द्यावा. त्यावर पुन्हा अर्धवट कुजलेले शेण किंवा शेणखत, कंपोस्ट खत यांचा थर द्यावा. त्यानंतर परत शेणकाला व कुजविणारे जिवाणू संवर्धकाच्या मिश्रणाचा थर द्यावा.

६) वरील कृतीप्रमाणे पूर्ण व्हर्मी बेड भरून घ्यावा. बेडमध्ये साधारणपणे ६० टक्के पाणी राहील याची दक्षता घ्यावी. त्यानंतर यामध्ये साधारणपणे दोन किलो गांडुळे सोडावीत. गांडुळांची उपलब्धता असल्यास तीन-चार किलोसुद्धा सोडता येतात. यामुळे गांडूळखत लवकर तयार होते.

गांडूळ खताचे फायदे ः

- पीकवाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते.

- खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक स्वरूपात उपलब्ध. त्यामुळे झाडांची मुळे सहजपणे घेऊ शकतात.

- जमीन भुसभुशीत राहते. जमिनीत हवा व पाणी खेळते राहते.पिकांची जोमदार वाढ होते.

- पाण्याचा योग्य निचरा होतो, जलधारण क्षमता वाढते.

व्हर्मिवॉश निर्मिती ः

व्हर्मिवॉश तयार करण्यासाठी २०० लिटर प्लास्टिक ड्रम वापरावा. प्लॅस्टिक ड्रमच्या तळापासून वर चार ते सहा इंच जागा सोडून व्हर्मीवॉश काढण्यासाठी तोटी बसवावी.

१) पहिला थर ः ड्रमच्या खालच्या बाजूस विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा.

२) दुसरा थर ः विटांच्या तुकड्यावर वाळूचा थर द्यावा.

३) तिसरा थर ः २५ टक्के माती आणि ७५ टक्के कुजलेल्या शेणखताचा थर द्यावा.

४) चौथा थर ः शेणखताच्या थरावर दोन किलो गांडुळे सोडावीत.

५) पाचवा थर ः गांडूळे सोडल्यानंतर त्यावर मातीमिश्रित शेणखत/ कुजलेले शेणखत याचा थर द्यावा.

त्यानंतर यावर एका पाइपद्वारे ड्रिपरच्या साह्याने थेंब-थेंब पाणी पडण्याची व्यवस्था करावी.

६) प्रत्येक थरामध्ये एका प्लॅस्टिक जाळीचा वापर करावा. जेणेकरून गांडुळे खालच्या थरात जाणार नाहीत. ७) पहिल्या पंधरा दिवसांत जमा झालेले व्हर्मीवॉश पुन्हा ड्रममध्ये टाकावे. त्यानंतर पुढे तयार होणारे व्हर्मीवॉश स्वतंत्र बादलीत जमा करावे.

८) ड्रम सावलीत ठेवावा.ड्रममध्ये पुरेसा ओलावा ठेवण्यासाठी

वरच्या थरावर कोकोपीटचा वापर करावा.

व्हर्मिवॉशचे फायदे ः

१) फवारणीसाठी व्हर्मिवॉश आणि पाणी यांचे प्रमाण १ः१० असे ठेवावे. हे पीक वर्धक म्हणून काम करते.

२) यामध्ये संप्रेरक, एन्झाइम, जीवनसत्त्वे, प्रथिने, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. यामुळे मुळांची वाढ जोमदार होते.

३) फुलोरा आणि फळ पक्व अवस्थेत फवारणीद्वारे वापरल्याने फूलगळ, फळांची गळ थांबवण्यास मदत होते.

संपर्क ः ०२०-२९५२०४८३, ०२०-२५५३७०३३/३८, विस्तार क्रमांक ३५४ किंवा ३५५ (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.