Cashew Processing: शून्यातून उभारलेला काजू प्रक्रिया उद्योग पोहोचला एक कोटीपर्यंत...

काजू प्रक्रिया उद्योग (Cashew Processing Business)सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांची गरज होती. मात्र तेवढेही भांडवल नव्हते. संदेश यांचे काका सीताराम दळवी आणि मित्र अडचणीत मदतीला आले. त्यांच्यामुळे ५५ हजार रुपये उभे झाले. घोडवली येथील जुन्या पत्र्याचे शेडमध्ये पाच हजार रुपये भाडेतत्त्वावर प्रक्रियेची यंत्रणा उभारली.
Cashew Processing Industry
Cashew Processing IndustryAgrowon

राजेश कळंबटे

घोडवली (ता. संगमेश्‍वर) या ग्रामीण भागात अगदी प्रतिकूल परिस्थितीत संदेश परशुराम दळवी यांनी केवळ वीस किलो काजू बीवर प्रक्रिया करत सुरू केलेल्या काजू प्रक्रिया उद्योग (Cashew Processing Business) आता एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करत आहे. बाजारपेठेची मागणी, गरज ओळखून अत्याधुनिक मशीनरीच्या वापरातून काजूगरांचा दर्जा वाढवत नेला आहे. ‘दळवी कॅश्यू’चे विविध स्वाद, चवीचे रंगीत असे काजूगर मुंबई बाजारपेठेत प्रसिद्ध आहेत.

घोडवली येथील संदेश परशुराम दळवी हे एकत्रित कुटुंब पद्धतीत वाढले. वडिलोपार्जित एकत्रित शेतीवरच सर्वांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर खासगी कंपनीमध्ये नोकरी सुरू केली. दरम्यान विवाह झाल्यामुळे वाढलेल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यात अडचणी येऊ लागल्या. नोकरीपेक्षा छोटा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार केला. त्याला पत्नी सौ. श्रद्धा यांनीही प्रेरणा दिली.

काजू प्रक्रिया उद्योग (Cashew Processing Business)सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांची गरज होती. मात्र तेवढेही भांडवल नव्हते. संदेश यांचे काका सीताराम दळवी आणि मित्र अडचणीत मदतीला आले. त्यांच्यामुळे ५५ हजार रुपये उभे झाले. घोडवली येथील जुन्या पत्र्याचे शेडमध्ये पाच हजार रुपये भाडेतत्त्वावर प्रक्रियेची यंत्रणा उभारली. ५० हजार रुपये खेळत्या भांडवलातून आजूबाजूच्या गावातून वीस किलो बी गोळा केली.

उभयतांनी त्यावर स्वतः प्रक्रिया केली. योग्य प्रतवारी करून मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेऊन विकली. त्यामधून आलेल्या पैशातून पुन्हा काजू बी खरेदी केली आणि ती विकली. यातून भांडवल आणि प्रक्रियेचे प्रमाण वाढवत नेले. २००८ मध्ये अगदी शून्यातून सुरू केलेला हा काजू प्रक्रिया उद्योग आता एक कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. सातत्यपूर्ण १० वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे दळवी कॅश्यू असा ब्रॅण्ड तयार करण्यात यश आले आहे.

भांडवलासाठी मिळाले बँकांचे सहकार्य

एक लाख रुपये कर्जासाठी गेलेल्या संदेश यांना एका राष्ट्रीयीकृत बॅंकेने उभेही केले नव्हते. मग तशीच धडपड चालू ठेवली. २००९ मध्ये अन्य एका बँकेतून २ लाख रुपयांचे कर्ज व्यवसाय वाढविण्यासाठी उपलब्ध झाले. दोघांचे कष्ट आणि मेहनत पाहून २०१० मध्ये त्याच बँकेने मशिनरी खरेदीसाठी २० लाख रुपयांचे कर्ज दिले. खादी ग्रामोद्योग विभागाद्वारे केलेल्या प्रकल्पामध्ये सात लाखाचे अनुदानही मिळाले. त्यामुळे प्रक्रियेचे प्रमाण वाढले.

या प्रकल्पामधून ८० महिलांना रोजगारही मिळू लागला. आता मागणीनुसार दर्जेदार काजू पुरवण्यासाठी स्वयंचलित आणि अत्याधुनिक यंत्राची गरज भासू लागली. मग २०१७ मध्ये एका राष्ट्रीयीकृत बॅंकेतून ४० लाख रुपयांचे कर्जप्रकरण केले. व्यवसाय वाढत होता. आता जागा कमी पडू लागली होती. २०२० मध्ये आणखी १ कोटी आणि १ कोटी ५० लाख अशा दोन कर्जप्रकरणे केली. त्यातून रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये प्रक्रिया उद्योगासाठी स्वतःची जागा खरेदी केली.

या जागेशेजारील एक कंपनीमध्ये पूर्वी संदेश स्वतः केवळ ३ हजार रुपये पगारावर नोकरी करत होते. आज त्या शेजारीच स्वतःची एक एकर जागा विकत घेऊन स्वतःचे युनिट उभारल्याचा अभिमान संदेश यांना वाटतो. त्याची नोंदणी ‘लक्ष्मी कॅश्यू’ या नावाने केली आहे. या जागी अधिक क्षमतेची आधुनिक यंत्रेही बसवली आहेत. त्यामुळे प्रतिदिन चार टन काजू बीवर प्रक्रिया करणे शक्य झाले. गेल्या वर्षी याच प्रकल्पामधून ८०० टन काजू बीवर प्रक्रिया केल्याचे संदेश सांगतात. २०१८ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडून उत्कृष्ट उद्योजक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

कोरोनामुळे अडचणीत वाढ

धाडस तर मोठे केले होते. पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे थोड्याच होतात. मार्च २०२० मध्ये कोरोनाने देशभरात थैमान घातले. याच दरम्यान आमचा नवीन मशिनरी, जागा खरेदीचा प्रस्ताव सादर केला होता. तो रखडला. जागा खरेदीची नोंदणी फेब्रुवारीपर्यंत न झाल्यामुळे आणि कोरोनाच्या स्थितीमुळे उत्पादनच घेता आले नाही. पण अजिबात हिंमत न हारता एकमेकांना धीर देत परिस्थितीतून सावरलो. नवीन जागा खरेदी, मशिनरी बसवणे अशी कामे उपलब्ध स्थितीमध्ये करत राहिलो.

विविध स्वादांचे काजू आणले बाजारात

-दळवी कॅश्यू प्रकल्पात ४० ग्रेडचे काजूगर विक्रीला ठेवले जातात.

-दर्जा वाढविण्यासाठी हाताळणी कमीत कमी करून यंत्रांचा अधिक वापर केला जातो. सफेद गराला बाजारात मागणी लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन केले जाते.

-काजू बी विकत घेताना चांगली सुकवलेल्या बियांनाच प्राधान्य दिले जाते. प्रकियेदरम्यान तुकडा कमी राहील, यावर भर देतात.

-पिवळा, काळा, लाल असे रंगीत काजूही बाजारात आणले आहेत. यासाठी स्वतंत्र यंत्रणा बसवली आहे.

त्वरित हवाबंद डब्यांमध्ये त्याचे पॅकिंग केले जाते.

-साध्या काजूसोबतच मागणीनुसार वेगवेगळ्या चवीचे (सॉल्टेड, ब्लॅक पेपर, चॉकलेट, चाट मसाला, मसालायुक्त) काजू बाजारात आणले आहेत.

- स्थानिक मागणी पुरवण्यासाठी मुंबई गोवा रोडवर एक आणि देवरुख मार्लेश्‍वर रोडवर एक अशी दोन रिटेल आउटलेट उभारली आहेत.

अत्याधुनिक यंत्रांचा फायदा

* ५०० किलो काजू बी एका तासात प्रक्रिया करणे शक्य.

* वायफायद्वारे यंत्राची हाताळणी (किंवा काही स्थितीमध्ये दुरुस्तीही) करता येते.

* माणसांद्वारे होणारी हाताळणी कमी करण्यासाठी, बी फोडण्यासाठीही यंत्राची मदत घेतली जाते.

* प्रतिदिन ४ टन काजू बीवर प्रक्रिया करणे शक्य.

...असे आहे नफ्याचे गणित

-काजूगराचे दर हे त्याच्या ग्रेडनुसार पाचशे रुपयांपासून १३०० रुपयेपर्यंत असतात. काजू प्रक्रिया उद्योग करणाऱ्या लाभार्थ्यांना टनामागे पाच टक्के नफा मिळतो. एक टन काजू बीवर प्रक्रिया केल्यानंतर २४० किलो काजूगर मिळतो. सरासरी ७५० रुपये दर मिळाला तरी त्यातून साधारणपणे १ लाख ८० हजार रुपये मिळतात. काजू बी खरेदीसह अन्य खर्च वजा जाता सरासरी ८ ते १० हजार रुपये नफा मिळतो.

प्रक्रिया केल्यानंतर मिळणारा काजू शंभर टक्के एकाच दर्जाचा (ग्रेडचा) नसतो. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी सातत्याने काजू बी प्रक्रियेची क्षमता वाढवत न्यावी लागते. सध्या स्थानिक काजू २० टक्के तर उर्वरित ८० टक्के आफ्रिकन काजू बीवर प्रक्रिया केली जात असल्याची माहिती संदेश दळवी यांनी दिली.

मागील तीन वर्षांतील सरासरी दर

वर्ष.........................दर (प्रतिकिलो रुपये)

२०२०.....................६००

२०२१.....................६५०

२०२२.....................६५०

नवीन उद्योजक घडविण्यासाठी पाऊल

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय काजूगराला मोठी मागणी आहे. तसेच भारत हा सर्वांत मोठा ग्राहकही आहे. तुलनेने काजू बीचे उत्पादन खूपच कमी पडते. त्यामुळे भविष्यात काजू लागवडीसाठी मोठा वाव आहे. तसेच काजू प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ नव्या पिढीनेही घेण्याची गरज आहे. मात्र माहिती आणि कौशल्याच्या अभावामुळे नुकसानीमध्ये जाणाऱ्या काजू प्रक्रिया केंद्राचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. हा धोका कमीत कमी होण्यासाठी शासनाच्या ‘स्किल इंडिया’ प्रकल्पांतर्गत दळवी कॅश्यू युनिटमध्ये एक प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहा महिन्याचा परिपूर्ण अभ्यासक्रम पुढील दोन महिन्यांत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे संदेश यांनी सांगितले.

काजू प्रक्रिया व्यवसाय हा केवळ पाच टक्क्यांवर आहे. त्यामुळे अधिक काजू बी वर प्रक्रिया करणे शक्य झाले तरच या व्यवसायातील नफा वाढू शकतो. आवश्यकतेनुसार यंत्रे, कुशल माणसे यांचे प्रमाण वाढवत न्यावे लागते. या साऱ्यांसाठी मेहनतीबरोबरच चिकाटीही तितकीच गरजेची आहे.

- संदेश परशुराम दळवी

(९६५७९९९४८०, ८३०८३२००००)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com