Story of life : गोष्ट अजूनही पुढे वाढतचं जाईन..पण इथे संपली..!

राजाच्या मर्जीशिवाय इथे कुणी शिंकत किंवा खोकत नव्हतं. स्वप्नसूद्धा लोकांना राजाच्या मर्जीनुसार पडायचे. राजा दाखवील तेच स्वप्नात आलं पाहिजे. असा इथला दंडक!
Sky
Sky Agrowon

लेखक- ऐश्वर्य पाटेकर

हे माझ्या गोष्टीतलं गाव आहे. मात्र ते कुठल्या प्रदेशातलं आहे; ते काही मला माहिती नाही. आता गोष्टीतलं आहे म्हटल्यावर गोष्टीपुरता विश्वास ठेवावाच लागेल. हे असं गाव होतं की तिथल्या राजाच्या मर्जीनच पाऊस पडायचा. राजाच्या मर्जीनच गावात हवा वाहायची. राजाच्या मर्जीइतकंच नदीत पाणी असायचं. राजाच्या मर्जीनच झाडांची पाने सळसळ करायची. राजाच्या मर्जीनच गुरं हंबरायची अन पक्षी किलबिल करायची. थोडक्यात सांगायचं तर गाव बिलकूलही राजाच्या मर्जीबाहेर नव्हतं. म्हणून गावाचं नावच मर्जीखोर असायला हवं होतं. ‘दगडपूर’ हे काय गावाचं नाव झालं? तर दगडपूर गावात पिढ्यांन पिढ्या  बाजरीचं पीक घेतलं जायचं. म्हणजे त्या लोकांना गहू, हरबरा, ज्वारी, ऊस असली पिके माहीतच नव्हती. त्या विषयी ते काहीच जाणत नव्हते. गावात कुणीही श्रीमंत नव्हतं अन गरीबही! सगळ्याच्या घरात बाजरीच्या पोत्यांची थप्पी. म्हणून बाजरीचं पीठ. भाकरी कालवण बाजरीचच. बाजरीचेच लाडू. सणावाराला बाजरीचा भात, बाजरीचा शिरा, खिचडी वगैरे!

राजाच्या मर्जीशिवाय इथे कुणी शिंकत किंवा खोकत नव्हतं. स्वप्नसूद्धा लोकांना राजाच्या मर्जीनुसार पडायचे. राजा दाखवील तेच स्वप्नात आलं पाहिजे. असा इथला दंडक! त्यामुळे तिथे वेगळं स्वप्न अजूनतरी कुणाला पडलं नव्हतं. तसं काही झालं असतं तर देहदंडाची शिक्षा ठरलेली होती. पण एक दिवस राजाच्या मर्जीला तडा गेला. असली आगळीक करण्यासाठी खूप मोठी धम्मक लागते. ती धम्मक आपल्या गोष्टीतल्या नायकामध्ये होती. तो म्हणजे संतुक! त्यावेळी  तो फक्त पाचवर्षांचा होता.

राजाच्या मर्जीनं नुकतीच सकाळ झाली होती. आप्पाच्या ओट्यावर सूर्यकिरण राजाच्या मर्जीने पोचले त्याचं पाचवर्षाचं संतुक नावाचं पोरगं स्वत:च्या मर्जीनं अंथरुणावर उठून डोळे चोळत बसलं. तेवढ्यात त्याचा बाप आप्पा तिथे आला. ते लगेच बापाला म्हणालं.

‘दादू माझ्या स्वप्नात किनी उसाचं पीक आलं!’

चेहऱ्यावरच्या आठ्यामध्ये असख्य प्रश्न घेऊन आप्पा म्हणाला

‘हे काय असतं बा?’

‘दादू लई गुळचट असतो तो अन खात्यात बी!’

तुला रे कसं कळल संतुक?’

‘मी स्वप्नात पाह्याल नं! पोरं खात व्हते.’

आप्पाच्या अंगाला अन काळजाला दरदरून घाम फुटला. त्याला भोवताली ब्रह्मांड गरगरल्यासारखं झालं. एवढंच नाही; भरीस भर, सोसाट्याची हवा सुटली. झाडं-झुडपं वादळात कबरालोक वाकून, तोडं भुईला घासत होती. कसल्यातरी अघटीताची जणू त्याला सूचना मिळाली. हातातल्या उपरण्याने त्यानं घाम पुसला. अन संतुकला म्हणाला

‘संतुक बाळा असे काही स्वप्न पाहू नको!’

‘काम्हून दादू?’

‘हे राजाच्या मर्जीविरोधात आहे!’

‘स्वप्न थोडच मी पाडलं! त्याचं ते पडलं!’

‘पडूच द्यायचं नाही लेका!’ असं म्हणत हरी हरी करत मळ्याकडे निघून गेला.

संतुकला बापाच्या बोलण्याचा काहीच उलगडा झाला नाही. उलट त्याचा बाप त्याला कोड्यात टाकून गेला. का पहायचं नाही स्वप्न? हे आपल्याला कोण सांगू शकेल? आपण तर अजून शाळेत जात नाही. आई म्हणाली नं पुढच्या वर्षी माझं नाव शाळेत घालणारंय. म्हणजे शाळेत गेल्यावर कळेल आपल्याला. तोपर्यंत ठाम थांबायचं कसं? संतुकने या प्रश्नाचा छडा लावला की नाही माहित नाही. गोष्टीत सगळंच कसं सांगणार?

तर बरका आपल्या या गोष्टीत दुसरी घटना घडली. तेव्हाही संतुक पाचच वर्षाचा होता. राजाचा रथ गावात हमरस्त्यावरुन निघाला होता. अचानक गावाच्या वेशीजवळ येवून राजाच्या रथाची दोन्ही चाके जागीच थांबली. जशी पृथ्वीची गती थांबली होती. वाऱ्यानं वाहणं थांबवलं. झाडाच्या पानांची सळसळ स्तब्ध झाली. पाखरे बावचळून खोप्यात दडून बसली. गावातल्या घरांच्या माना खाली गेल्या. सूर्याचं ऊन कोमेजून उभे. असं झालं काय होतं? तर आपला संतुक रस्त्यानं गाणं म्हणत चाललला होता. हे घोर पातक होतं. देशद्रोह होता. राजाच्या मर्जीचं उल्लंघन होतं. राजाने चवताळून फर्मान सोडलं. सैनिकांनी संतुकला राजाच्या दरबारात हजर केलं. सारा गाव चिल्यापिल्यासह गोळा झालं. संतुकचे आईवडील गर्भगळीत झालेले. आप्पाने अन सिताक्काने राजासमोर लोळण घेतली. राजाकडे संतुकच्या प्राणाची भिक मागितली. राजा ढिम्म. जराही त्याचं काळीज द्र्वेना. त्याला पाझर फुटेना. सारं गाव चिनभिन. त्यांनाही आप्पाची  अन सिताक्काची द्या येत होती. पण राजाच्या मर्जीसमोर ते हतबल होते. एवढ्याशा जीवाला देहदंडाची शिक्षा होण्याची वाट पाहणं त्यांच्या हातात होतं; अन असा दुर्दैवी प्रसंग त्यांना आता पहावा लागणारच होता. एक म्हातारा कळवळला की ईश्वरा माझे डोळे घेवून टाक पण मला असं काही दाखवू नकोस. सिताक्काने मोठा हंबरडा फोडला. परत एकदा राजाला विनंती केली.

Sky
Rural Development : निश्‍चित करा ग्रामविकासाचे ध्येय

राजा त्याच्या सिंहासनावरून उठला. लोकांनी कान बंद केले. मात्र तसं काही घडलं नाही. घडलं असं, की  राजानं गावाला तंबी देत; संतुकला पहिला गुन्हा माफ केला. असे जरी असले तरी राजाची झोप मात्र उडाली होती. आपल्या मर्जीच्या खिलाप एवढासा पोरगा जातो म्हणजे काय! आपल्याला या लोकांमध्ये आणखी दहशत निर्माण करावी लागली. हा विद्रोह आहे..हा देशद्रोह आहे. आपण त्याला माफ करायला नको होतं. खूप पश्चाताप राजाला झाला. गोष्ट इथं संपली नाही. खरी गोष्ट तर पुढेच आहे.

या गावातील लोकांना चांगले दिवस किंवा वाईट दिवस असे आश्वासन काही  राजानं दिलं नव्हतं. नाहीतरी या लोकांना चांगल्या अन वाईट दिवसांतला फरक तसाही कळत नव्हता. जर ज्या गावाचा सूर्य राजाच्या मर्जीने उगवायचा अन मावळायचा तोही राजाच्या मर्जीने. त्यांना काय दिवसांमधला फरक कळणार! तर असं माझं गोष्टीतलं दगडपूर हे गाव. या गावात जर असा राजा असेल तर खूप काही घडत असेल. पण मला सगळच थोडं सांगता येईल? मी फक्त संतुकची गोष्ट सांगतोय.

दगडपुरच्या राजाच्या मर्जीने जरी दिवस उगवायचे अन मावळायचे. तरी वयावर थोडंच राजाचं नियंत्रण होतं. मुलाचा म्हातारा अन म्हाताऱ्याचा मुलगा काय राजाच्या मर्जीने होणार काय? म्हणून आपला संतुकही आता वीस वर्षांचा युवक झाला होता. राजानं त्याच्या गाण्यावर अंकुश ठेवला होता स्वप्नावर थोडाच. इथेच राजाची घोडचूक झाली. संतुकने गेल्या पंधरावर्षांत कितीतरी स्वने पाहिली होती. त्याला त्याच्या स्वप्नांनी जे जे स्वप्नात दाखवलं; ते ते आता त्याला करुन पहायचं होतं.  पिढ्यांन पिढ्या ज्या गावात बाजरी पेरली गेली. आता त्याला वेगवेगळी पिके घ्यायची होती. त्यानं आई- वडीलांना आपली इच्छा बोलून दाखवली

‘संतुक लेका तुला देहदंडाची शिक्षा झालेली आम्हाला पहावणार न्हायी. आम्ही जित्ते आहोत तवर अशी आगळीक करु नको; आमचे डोळे झाकले की तुला काय करायचं ते कर! तवरुत दम काढ!’

‘दादू पिढ्यांन पिढ्या दम काढला; आता नाही!’

संतुकने आपल्या वावरात उसाचं पीक केलं. संतूकचं उसाचं पीक गावभर चर्चेचा विषय झाले. नवलाने सारं गाव येवून त्याचे पीक पाहू लागले. अन संतुकचे गोडवे गाऊ लागले. मात्र ही वार्ता राजाच्या कानावर जाऊन पोचली. राजाने साऱ्या गावाच्या समक्ष संतुकच्या उसाला आग लावली. त्या आगीत संतूकचेही जळीत झाले...जळीत जेव्हा शांत झाले त्यातून पुन्हा उसाचे पीक तरारून आले. राजा परत आग लावू लागला. आग विझली की पुन्हा पीक तरारून यायचे. आता तर गावभरच्या शेतात वेगवेगळी पिके उगवून येवू लागली. राजा अन त्याचे सैनिक आग लावून थकले. लोकांना काय वाटले माहित नाही त्यांनी हातात पेटता पलिता घेवून घेराव घातला राजाला अन सैनिकांना. नंतर राजवाडाही जाळून टाकला. अन सारेच संतुकच्या उसाच्या शेतात येवून उभे राहिले. संतुक उसाच्या पानापानातून डोलत होता. आपण मुक्त झालो!!!!! लोक संतूकचा जयजयकार करु लागले.

त्यांनतर गावातील नदी स्वत:च्या मर्जीने वाहू लागली. झाडाची पाने सळसळू लागली. गुरे स्वत:च्या मर्जीने हंबरु लागली अन पाखरे चिवचिवू लागली..

गोष्ट अजूनही पुढे वाढतचं जाईन..पण इथे संपली..!   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com