Azolla: धान पिकामध्ये ॲझोलाचा वापर

हिरवळीच्या खतासाठी धैंचा, सोनबोरू व इतर पिकांची लागवड करून चिखलणीवेळी ही पिके जमिनीमध्ये गाडतात. कमी खर्चाचे आणि उत्तम हिरवळीचे खत म्हणून धान पिकात ॲझोलाचा (Azolla) वापर करता येतो.
Azolla  In Paddy
Azolla In PaddyAgrowon

डॉ. उषा डोंगरवार, प्रमोद पर्वते,

डॉ. प्रशांत उंबरकर, डॉ. प्रवीण खिरारी

ॲझोला (Azolla) ही पाण्यात तरंगणारी वनस्पती शेवाळ या प्रकारात मोडते. ॲझोलामध्ये प्रथिने, जीवनसत्त्व अ, ब, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह व मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच अॅझोलामध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प असते.

धान (भात) हे पूर्व विदर्भामध्ये खरीप हंगामात घेतलेले जाणारे प्रमुख पीक आहे. धान पिकाच्या उत्पादन वाढीकरिता रासायनिक खतांसोबतच हिरवळीच्या खतांचा वापर केला जातो. हिरवळीच्या खतासाठी धैंचा, सोनबोरू व इतर पिकांची लागवड करून चिखलणीवेळी ही पिके जमिनीमध्ये गाडतात. कमी खर्चाचे आणि उत्तम हिरवळीचे खत म्हणून धान पिकात ॲझोलाचा (Azolla) वापर करता येतो. ॲझोलामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत टाकल्यानंतर लवकर कुजतो.

धान पिकामध्ये ॲझोलाचा वापर ः

ॲझोला ही पाणवनस्पती हिरवळीचे खत म्हणून धान पिकात वापरली जाते. ‘ॲनाबिना ॲझोली’ नावाचे निळे हिरवे शेवाळ ॲझोलासोबत सहजीवी पद्धतीने वाढते. ॲझोला वनस्पती हवेतील नत्र स्थिर करते.

ॲझोला वाढविण्याच्या पद्धतीः

१) तळ्यामध्ये ॲझोला वाढवून, धान पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेतात टाकला जातो. त्यानंतर १० ते १५ दिवसांनी नांगराच्या साह्याने ॲझोला जमिनीत गाडला जातो.

२) ॲझोला नर्सरीमध्ये वाढवून, धान लागवडीनंतर १० दिवसांनी शेतातील पाण्यात टाकला जातो. आणि कोळपे किंवा इतर यंत्रांच्या साह्याने जमिनीत गाडला जातो. शेतातील पाण्यात प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी ५०० ग्रॅम ॲझोला टाकावा.

ॲझोला तयार करण्याची पद्धत ः

  • - झाडाच्या सावलीत ५ बाय ८ फूट आकाराचा खड्डा काढून त्यात प्लॅस्टिकचे आच्छादन करावे. खड्ड्यातील प्लॅस्टिक आच्छादनावर १० ते १२ किलो काळी माती पसरवून घ्यावी.

  • - दहा लिटर पाण्यात गायीचे शेण २ किलो व सिंगल सुपर फॉस्फेट ३० ग्रॅम चांगले मिसळून तयार केलेले मिश्रण खड्ड्यामध्ये टाकावे. त्यानंतर खड्ड्यामध्ये १० सेंमी उंचीपर्यंत पाणी भरून घ्यावे.

  • - खड्ड्यामध्ये ताजे व स्वच्छ ॲझोला कल्चर मिसळून घ्यावे.

  • - ॲझोला लागवडीनंतर दर पाच दिवसांनी खड्ड्यामध्ये गायीचे शेण १ किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट २० ग्रॅम प्रमाणे टाकावे. त्यामुळे ॲझोलाचे वाढ वेगाने होऊन उत्पादन जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होते.

  • - साधारण १० ते १५ दिवसांत खड्डा ॲझोलाने भरून जातो. त्यानंतर प्रतिदिन ५०० ते ६०० ग्रॅम ॲझोलाचे उत्पादन मिळते.

Azolla  In Paddy
Azolla : जनावरांसाठी पूरक पशुखाद्य : ॲझोला

घ्यावयाची काळजी ः

- ॲझोला तयार करण्यासाठी काढलेला खड्डा हा सावलीत असावा. खड्ड्यावर थेट ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी.

- खड्ड्यामध्ये पाण्याची पातळी कायम १० सेंमी ठेवावी.

- लागवडीनंतर ॲझोला वनस्पतीचे कीड-रोग, मुंगी आणि वाळवीपासून संरक्षण करावे.

- दर ५ दिवसांनी खड्ड्यातील २५ ते ३० टक्के जुने पाणी काढून नवीन पाणी भरावे.

- डॉ. उषा डोंगरवार, ९४०३६१७११३

(कृषी विज्ञान केंद्र, साकोली, जि. भंडारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com