जिवाणू खतांचा वापर

विशिष्ट जिवाणू हवेतील नायट्रोजन (नत्र) शोषून साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. अशा उपयुक्त जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून ते विशिष्ट माध्यमात मिसळून तयार केलेल्या खतास ‘जिवाणू खते’ असे म्हणतात.
जिवाणू खतांचा वापर
FertilizerAgrowon

धीरज वसुले, अंजली गहरवार, डॉ. एन. डी. पार्लावार

--------------------

विशिष्ट जिवाणू हवेतील नायट्रोजन (नत्र) शोषून साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. अशा उपयुक्त जिवाणूंची (Bacteria) प्रयोगशाळेत वाढ करून ते विशिष्ट माध्यमात मिसळून तयार केलेल्या खतास ‘जिवाणू खते’ (Bacterial Fertilizer) असे म्हणतात. पिकांसाठी आवश्यक नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या उपलब्धतेसाठी जैविक खते (Bio Fertilizers) उपयुक्त ठरतात. या खतांचा वापर योग्य प्रकारे केल्यास जमिनीची सुपीकता वाढून पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते.

ॲझोटोबॅक्टर जिवाणू खते ः

या खतातील एकदल व तृणधान्य पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने नत्र वायूचे अमोनियात रूपांतर करतात. त्यामुळे नत्र पिकांना उपलब्ध होते. उदा.गहू, ज्वारी, बाजरी, धान, कपाशी इत्यादी.

रायझोबिअम जिवाणू खते ः

रायझोबिअम जिवाणू द्विदल पिकांच्या मुळांवर गाठी तयार करून राहतात. हे जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकास उपलब्ध करून देतात. पीकनिहाय विशिष्ट प्रकारच्या रायझोबिअम गटाचे जिवाणू खत वापरणे आवश्यक असते.

Fertilizer
जिवाणू खत वापरायचे की जिवाणूंचे अन्न...

रायझोबिअम जिवाणू खतांचा गट---या पिकांसाठी उपयुक्त.

चवळी---चवळी, भुईमूग, तूर, मूग, उडीद, वाल, मटकी, गवार, ताग, धैंचा, कुलथी, इ.

हरभरा गट---हरभरा

वाटाणा गट---वाटाणा, मसूर.

घेवडा गट---फ्रेंचबीन, लाईमा बीन, श्रावण घेवडा व इतर घेवडे

सोयाबीन गट---सोयाबीन

अल्फा-अल्फा गट---मेथी, लसूणघास

बरसीम गट---बरसीम.

ब) स्फुरद विरघळविणारी जिवाणू खते ः

प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंची वाढ करून योग्य माध्यमात मिसळून तयार होणाऱ्या खताला ‘स्फुरद जिवाणू खत’ असे म्हणतात. नत्र स्थिर करणारे जिवाणू खत व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत एकत्र मिसळून बियाण्यावर लावता येतात. या जिवाणू खतांमुळे जमिनीतील स्फुरद पिकांना उपलब्ध होऊन पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

जिवाणू खतांची मात्रा ः

जिवाणू खते---पिके---प्रमाण (प्रति किलो बियाणे)

ॲझोटोबॅक्टर---कपाशी, गहू, ज्वारी, बाजरी, धान---२५ ग्रॅम/१० मिलि

रायझोबिअम---सोयाबीन, तूर, मूग, उडीद व शेंगवर्गीय पिके---२५ ग्रॅम/१० मिलि

स्फुरद विरघळविणारे---सर्व पिकांकरिता---२० ग्रॅम/१० मिलि

ट्रायकोडर्मा---सर्व पिकांकरिता---४ ग्रॅम

जिवाणू खते वापरण्याची पद्धत ः

- जिवाणू संवर्धक किंवा बुरशीनाशके प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे वापरावीत.

- एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे.

- द्रावण थंड झाल्यानंतर त्यात २०० ते २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक मिसळावे.

- साधारण १० ते १२ किलो बियाणे स्वच्छ प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरामध्ये पसरून त्यावर तयार केलेले मिश्रण शिंपडावे. नंतर हलक्या हाताने बियाण्यांस चोळावे.

- प्रथम बियाण्यास बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी. नंतर नत्र उपलब्ध करून देणारे (ॲझोटोबॅक्टर किंवा रायझोबिअम) अधिक स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू यांचे मिश्रण करून बियाण्यास चोळावे.

- प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून २४ तासांच्या आत पेरावे.

जिवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी ः

- जिवाणू खतांचे पाकीट थंड व कोरड्या जागी ठेवावे. तसेच कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके आणि रासायनिक खतांपासून दूर ठेवावे.

- संवर्धनाच्या पाकिटावर दिलेल्या अंतिम तारखेपर्यंतच वापर करावा.

- जिवाणू खते वापरण्यापूर्वी, बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करावी.

- बियाण्यास कीटकनाशक, बुरशीनाशकाचा वापर केला असल्यास जिवाणू संवर्धनाची मात्रा दीड पट घ्यावी.

- कोणत्याही रासायनिक खतासोबत जिवाणू संवर्धन मिसळू नये.

- बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सावलीत वाळवून नंतर ताबडतोब पेरणी करावी.

जिवाणू खतांचे फायदे ः

- पीक उत्पादनात ७ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होते.

- जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते.

- जिवाणू खते अत्यंत कमी प्रमाणात लागतात. त्यामुळे त्यांच्या वापराचा खर्च अत्यल्प आहे.

- जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

- दुबार पिकांस चांगला फायदा होतो.

- वापरण्यास अत्यंत सोपे.

- रासायनिक खतांच्या मात्रेत बचत होते.

------------------------

धिरज वसुले, ९९७००११९४२

(वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com