Organic Fertilizer : जमिनीच्या जिवंतपणासाठी सेंद्रिय खतांचा वापर

जमीन जिवंत ठेवण्यासाठी उपयुक्त जिवाणूचे प्रमाण वाढले पाहिजे. त्यासाठी त्यांचे खाद्य सेंद्रिय पदार्थ उपलब्ध केले पाहिजे. त्यातून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता शाश्‍वत बनण्यास मदत होईल.
Organic Fertilizer
Organic FertilizerAgrowon

डॉ. प्रमोद जगताप, डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. बापूसाहेब भाकरे

पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी (Crop Production) शेतकऱ्यांची धडपड चाललेली असते. त्यात सिंचन (Irrigation), पीक व्यवस्थापनावर (Crop Management) भर दिला जात असला तरी अनेक वेळा जमिनीच्या सुपीकतेकडे (Land Fertility) दुर्लक्ष होते. मुळात आपल्या जमिनीचे गुणधर्म, समस्या यांची माहितीही अनेक शेतकऱ्यांना असत नाही. कारण त्यांनी मातीचे परीक्षणच केलेले नसते. तसेच आपली जमीन ही त्यातील सूक्ष्मजीवांमुळे जिवंत असते, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडताच आपल्याला मातीचा सुगंध पसरल्याचे दिसते. हा सुगंध सुप्तावस्थेमध्ये असलेल्या ॲक्टिनोमायसेट्स हे जीवाणू पाऊस पडताच क्रियाशील होत असल्यामुळे येतो. जमिनीत असे असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव -जिवाणू असतात. ते वनस्पतींच्या वाढीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपली भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे अशा उपयुक्त जिवाणूंनी परिपूर्ण जमिनीला जिवंत जमीन मानले जाते. या जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण ठेवणे हे शेतकऱ्याचे काम आहे. (Organic Fertilizer)

आजकाल रासायनिक खते, पाणी यांचा असंतुलित वापर होत आहे. तुलनेने सेंद्रिय, जैविक खतांच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. हे सेंद्रिय पदार्थ जिवाणूंचे अन्न आहे. सेंद्रिय खते पुरेशा प्रमाणात वापरल्यास जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या निश्‍चित वाढू शकते. केवळ रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन काही काळ वाढले तरी शाश्‍वत उत्पादन मिळणार नाही. कारण रासायनिक खते ही सेंद्रिय खतांना कधीच शंभर टक्के पर्याय होऊ शकत नाही.

सेंद्रिय खतामध्ये सर्व प्रकारची अन्नद्रव्ये अल्प प्रमाणात असली तरी विविध विकरे (एन्झाईम्स), संप्रेरके (हार्मोन्स) आणि जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) मुबलक मिळतात. त्यामुळे त्यांचा वापर केल्यास पीक उत्पादनाचा दर्जा उदा. गोडी, रंग, शिवाय रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच जमिनीची जडणघडण, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीतील हवा आणि निचरा यामध्ये लक्षणीय सुधारणा होते.

जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता यातील फरक -

* जमिनीची सुपीकता म्हणजे त्या जमिनीची पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता.

* जमिनीची उत्पादकता म्हणजे जमिनीतून मिळालेले उत्पादन.

जमिनीने फक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा केला तर अपेक्षित उत्पादन मिळेलच असे नाही. कारण चांगले उत्पादन मिळण्यासाठी पीक व्यवस्थापनाकडे (उदा. सिंचन, तणे, रोग आणि कीड नियंत्रण) लक्ष द्यावे लागते.

सुपीकतेचे तीन प्रकार -

१) जैविक सुपीकता : जमिनीतील उपयोगी जिवाणूची संख्या

२) भौतिक सुपीकता: जमिनीची जलधारण शक्ती, जमिनीतील मोकळी हवा, निचरा इ.

३) रासायनिक सुपीकता : सामू, क्षारांचे प्रमाण, पिकांसाठी उपलब्ध अन्नद्रव्ये इ.

या तिन्ही सुपीकता योग्य प्रकारे जपल्यास पिकाचे उत्पादन आणि दर्जा चांगला मिळतो. त्यात जैविक आणि भौतिक सुपीकता जपण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता, सेंद्रिय खतांचा वापर हाच रामबाण उपाय आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा निर्देशांक मानला जातो. जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा पुरेसा पुरवठा केल्यामुळे जमिनीतील जिवाणूंची वाढ होऊ लागते.

--------खड्ड्यात सेंद्रिय खत तयार करताना मातीने झाकलेले असावे. तसेच सेंद्रिय खते शेतात वापरल्यानंतर मातीमध्ये मिसळून घ्यावीत. अन्यथा त्यातील नत्राचा ऱ्हास होतो.

आपण रासायनिक खतामार्फत अन्नद्रव्ये दिली असली तरी ती पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम जिवाणू करतात. उदा. युरिया दिला तरी त्यातील नत्र जोपर्यंत नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर हे जीवाणू नायट्रेटमध्ये रूपांतरित करत नाहीत, तोपर्यंत पिकाला घेता येत नाही. म्हणजेच जमीन जिवंत असली तरच पिकांना अन्नद्रव्ये मिळू शकतात.

पिकांचे अवशेष, काडी कचरा आणि प्राण्याचे अवशेष यापासून तयार झालेल्या सर्व प्रकारच्या खतांचा समावेश सेंद्रिय खतांमध्ये होतो. त्याचे सेंद्रिय भरखते आणि सेंद्रिय जोरखते असे दोन प्रकार येतात.

-भर खतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने वापर जास्त प्रमाणात करावा लागतो. उदा. शेणखत, कंपोस्ट खत, प्रेसमड केकयुक्त खत इ.

-जोर खतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण तुलनेने जास्त असते. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत इ.

Organic Fertilizer
परंपरागत कृषी योजनेतून सरकारचं सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन 

पालापाचोळा, वनस्पतीचे अवशेष आणि शेण, लेंडी, प्राण्यांची विष्ठा यामध्ये तणांचे बी तसेच राहू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर न कुजवता केल्यास शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थात कर्बाचे प्रमाण जास्त आणि नत्राचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांचा कुजण्याचा वेग खूप कमी असतो. हे सेंद्रिय पदार्थ कुजवणाऱ्या जिवाणूंच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. हे जिवाणू जमिनीतील नत्र वापरतात. परिणामी पिकांला नत्र कमी पडू शकते. त्यामुळे पूर्ण कुजलेले सेंद्रिय खतच पिकाला वापरावे. सेंद्रिय खतांचे विविध प्रकार व त्यातून उपलब्ध होणाऱ्या अन्नद्रव्याची माहिती घेऊ.

Organic Fertilizer
सेंद्रीय द्रवरूप जैविक खत तयार करण्याची पद्धती

शेणखत :

शेणखताचा वापर कमी अधिक प्रमाणात सर्वच शेतकरी करत असतात. एकूण सेंद्रिय खतातील सर्वाधिक वापरले जाणारे ही खत आहे. त्यात ०.५ ते ०.८ % नत्र,०.२ ते ०.४% स्फुरद, ०.३ ते ०.५ % पालाश, १५०० ते ३००० पीपीएम लोह, १०० ते १२५ पीपीएम जस्त, ६०० ते ८०० पीपीएम मंगल आणि २० ते ३० पीपीएम ताम्र असते. एकूण शेणखतापैकी निम्मे नांगरटीवेळी आणि निम्मे लागवडी वेळी वापरल्यास अधिक फायदा होतो. यामुळे शेणखतातील अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकांच्या कालावधीमध्ये दीर्घकाळ होऊ शकते. मात्र जनावरांची संख्या वेगाने कमी होत चालल्यामुळे शेतीसाठी शेणखत अपुरे पडत आहे. खरेदी करून देणे परवडण्याबाहेर जात आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा अधिक वापर करणे हा पर्याय होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवून पर्यायी दुसऱ्या सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे.

कंपोस्ट खत :

वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थांच्या कुजवण्याच्या प्रक्रियेनंतर कंपोस्ट खत तयार होते. या खताच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यावर मातचे व्यवस्थित आच्छादन केले पाहिजे, अन्यथा त्यातील नत्राचा ऱ्हास होतो. या खतामध्ये नत्र ०.५ ते ०.६%, स्फुरद ०.४ ते ०.५% तर पालाश ०.७० ते ०.८०% इतक्या प्रमाणात असते. या खतात काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.

प्रेसमड केक :

हा साखर कारखान्यातील एक उपपदार्थ असून, त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सामू विम्लधर्मीय व क्षारांचे प्रमाण कमी असलेल्या आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये प्रेसमड केक फायदेशीर दिसून येते. यात नत्राचे प्रमाण १.५ ते २.०%, स्फुरद २ ते ३% आणि पालाश १ ते १.५ % एवढे असते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे घेतलेल्या प्रयोगांती केलेल्याय शिफारशीनुसार पूर्वहंगामी उसामध्ये हेक्टरी २० टन शेणखत किंवा १० टन सल्फिटेशन प्रेसमडकेक व १० टन पाचटाचे कंपोस्ट खत खरीप सोयाबीननंतर वापरण्याचे सुचवण्यात येते. सेंद्रिय खत उपलब्ध नसल्यास पूर्वहंगामी उस लागवडीपूर्वी खरीप सोयबीनऐवजी धैंचा हे हिरवळीचे पीक म्हणून घ्यावे.

अलीकडे प्रेसमडकेकपासून कंपोस्ट खत तयार केले जाते. प्रेसमड केक हे मळीबरोबर (स्पेंटवाश) किंवा रॉक फॉस्फेटबरोबर मिसळले जाते. यात स्फुरदाचे प्रमाण अधिक असून, त्याचा पिकांना चांगला फायदा होतो. आडसाली उसासाठी ४-५ वर्षांतून एकदा नत्र, स्फुरद आणि पालाश यांची मात्रा समायोजित करून हेक्टरी ५ ते ७.५ टन प्रेसमडकेक स्पेंटवाश कंपोस्ट वापरल्यास फायदेशीर ठरते. सर्वसाधारणपणे मध्यम ते जास्त विम्लधर्मीय (चोपण) जमिनीत तसेच क्षारांचे प्रमाण कमी (विद्युत वाहकता ०.५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी) किंवा चुनखडीयुक्त जमिनीत (मुक्त चुनखडी १० % पेक्षा जास्त) वापरल्यास उपयुक्त ठरते. या खताचा वापर मुरमाड जमिनीत मुरमाची माती होण्यासाठी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी होतो. ४ ते ५ वर्षांतून एकदाच मळी कंपोस्ट हेक्टरी ५ टन वापरावे.

गांडूळ खत :

शेतातील काडीकचरा, पीक अवशेष, शेण आणि गांडूळे यांच्या वापरातून हे खत शेतपातळीवर तयार करता येते. याचा जमिनीच्या सुपीकतेवर, पीक उत्पादन आणि उत्पादनाच्या दर्जावर चांगला परिणाम दिसतो. या खतात १.५ ते २.० % नत्र, ०.६० ते ०.८० % स्फुरद, १ ते १.२५ % पालाश, २००० ते ३००० पीपीएम लोह, १५० ते २०० पीपीएम जस्त असते. या खतातून मिळणारे व्हर्मिवॉशही उपयुक्त आढळून आले आहे.

हिरवळीची खते :

हिरवळीची खते हा एक सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. ताग, धैंचा, चवळी अशी पिके दीड ते दोन महिने शेतात ठेवून नंतर ती शेतात गाडायची असतात. त्यातून सेंद्रिय पदार्थासोबत अन्नद्रव्येही मिळतात. उदा. धैंचा पिकात ३.५ % नत्र, ०.६०% स्फुरद आणि १.२०% पालाश असतो. यातून हेक्टरी ६९ किलो नत्र मिळतो. तागामध्ये २.३०% नत्र, ०.५% स्फुरद आणि १.८% पालाश असतो. तागापासून हेक्टरी ७५ किलो नत्र मिळतो. चवळी पिकात २.३% नत्र, ०.५% स्फुरद आणि २.३% इतका पालाश असून, हेक्टरी ५० किलो नत्र मिळतो. जमिनीत जिवाणूंची संख्याही वाढते. जमिनीचा पोत, मगदूर सुधारल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. जमिनीतील क्षारांचा बीमोड आणि निचरा होतो. जमिनीचा कडकपणा कमी होतो.

उसाचे पाचट :

ऊस शेतीमध्ये हेक्टरी १०-१२ टन पाचट उपलब्ध होते. त्यातील सेंद्रिय पदार्थांचा पिकांच्या वाढीसाठी वापर करण्यासंदर्भात प्रयोग करून १९९७-९८ मध्ये शिफारस करण्यात आली. ती अशी - ऊस खोडव्याच्या सरीमध्ये पाचट ठेवून दोन वेळा खतमात्रा द्यावी. पहिली मात्रा सरीच्या एका बाजूस ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत आणि दुसरी मात्रा १३५ दिवसांनी दुसऱ्या बाजूस द्यावी. एकीकडे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध नाहीत, आणि दुसरीकडे सहज उपलब्ध असणारे पाचटही जाळले जाते, ही चिंतेची बाब आहे. त्याऐवजी पाचट कुट्टी करून वापरले तर उत्पादनामध्ये वाढ मिळू शकते.

कोंबडी खत :

कुक्कुटपालन व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या या खतात २ ते २.५ % नत्र, २.५ ते ३.० % स्फुरद आणि १.२५ ते १.४०% पालाश असते. हे खत वापरण्यापूर्वी शेताबाहेरच त्यावर पाणी टाकून त्यातील उष्णता बाहेर काढावी. नंतर ते सुकल्यावर शेतात वापरावे. अन्यथा, या खतातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे रोपांना इजा होऊ शकते. उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि पीक कोमेजते.

निंबोळी पेंड :

यातून नत्राचा ५% पर्यंत पुरवठा होतो. तसेच कडवटपणामुळे पिकांचे किडीपासून संरक्षणही होण्यास मदत होते. उदा. सूत्रकृमी.

या सर्व सेंद्रिय खतांसोबत जैविक खतांचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. उदा. ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, ॲसिटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू, पालाश विरघळविणारे जिवाणू, जस्त विरघळविणारे जिवाणू इ.

डॉ. प्रमोद जगताप

(लेखक डॉ. जगताप हे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे मृदाशास्त्रज्ञ आहेत. आणि डॉ. दुरगुडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदाशास्त्रज्ञ, तर डॉ. भाकरे हे मृद्शास्त्र व कृषी रसायन विभासाचे प्रमुख आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com