एकात्मिक मत्स्यशेतीच्या विविध पद्धती

मत्स्यशेतीच्या (Fisheries) जोडीला वराहपालन (Swine)करताना १५ ते २० किलो वजनाची पिले विकत घ्यावीत. त्यांना पाच ते आठ महिन्यांसाठी वाढवून विकणे फायदेशीर ठरते.
integrated aquaculture
integrated aquacultureAgrowon

किरण वाघमारे, डॉ. शरद सुरनर

एकात्मिक मत्स्यपालन (Integrated Aquaculture) हे वराह (Swine), कोंबडी आणि बदकांच्या सोबत करता येते. याच बरोबरीने मेंढ्या, शेळ्या आणि गाईंच्या संगोपनाचा विचार करावा. यासाठी आपल्याकडील तलाव आणि पशू, कोंबड्या संगोपनासाठी लागणाऱ्या क्षेत्राचा विचार करावा. बाजारपेठेचा अभ्यास करून एकात्मिक मत्स्य संगोपन पद्धतीचा अवलंब करावा.

एकात्मिक पद्धतीने मत्स्य आणि वराहपालनः

मत्स्यशेतीच्या (Fisheries) जोडीला वराहपालन करताना १५ ते २० किलो वजनाची पिले विकत घ्यावीत. त्यांना पाच ते आठ महिन्यांसाठी वाढवून विकणे फायदेशीर ठरते. उष्णकटिबंधीय परिस्थितीत, विशेषत: दमट हवामानात, शेडमधील हवेचे तापमान शक्य तितके थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. विशेषत: ७० किलोपेक्षा मोठ्या वराहांना वाढवताना हवामान आणि व्यवस्थापनाच्या स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणारी जात निवडावी.

१) तलावामध्ये ग्रास कार्प, सिल्व्हर कार्प आणि कॉमन कार्प (१:२:१ रेशो) या माशांचे संगोपन करावे. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये व्हाइट यॉर्कशायर, लँड्रेस आणि हॅम्पशायर सारख्या विदेशी वराह जातींचे संगोपन करावे.

२) एक हेक्टर क्षेत्रफळाच्या मत्स्य तलावाच्या खत उपलब्धतेसाठी किमान ६० ते १०० वराहांचे संगोपन पुरेसे ठरते.

३) एका वराहासाठी ३ ते ४ मीटर वर्ग जागा आवश्यक आहे. एक हेक्टर मत्स्य तलावामध्ये एक वर्षासाठी खत देण्यासाठी पाच टन वराह खत आवश्यक आहे.

४) वराहांच्या आहारामध्ये स्वयंपाकघरातील कचरा, पाणवनस्पती आणि चारा कुट्टी दिली जाते.

वराहांसाठी शेडः

१) पुरेशी जागा तसेच पिण्यासाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था असावी.

२) शेडमधील हवेचे हवेचे तापमान कमी करण्यासाठी चांगले वायुविजन असावे.

३) शेडमधून पाण्याचा चांगला निचरा, स्वच्छता तसेच खत जमा करण्यासाठी योग्य सुविधा असाव्यात.

४) वराहांची विष्ठा ही तलावातील माशांसाठी खाद्य म्हणून उपयुक्त ठरते. यासाठी दररोज स्वच्छता करून थेट तलावात सोडता येते किंवा शेडजवळ साठवण खड्यात विष्ठा साठवून गरजेनुसार मत्स्य तलावात सोडली जाते.

एकात्मिक पद्धतीने मत्स्य आणि कोंबडीपालन ः

१) कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी सोपी आणि सामान्यतः वापरली जाणारी पद्धत म्हणजे एका विशिष्ट पुरवठादाराकडून एक दिवसाची पिले मिळवून संगोपन करावे. प्रत्येकी १ ते २ किलो वजनाची ब्रॉयलर कोंबडी किंवा ४.५ ते ५.५ महिन्यांची अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे संगोपन करावे. या कोंबड्यांचे संगोपन १२ ते १८ महिने अंडी तयार करण्यासाठी करावे. दोन्ही प्रकारच्या कोंबड्यांमध्ये एक दिवसाच्या पिलांचे पहिल्या पाच आठवड्यांचे संगोपन समान आहे.

२) कोंबडी खत फॉस्फरस आणि नायट्रोजनने समृद्ध असते. एक हेक्टर मत्स्य तलावासाठी कोंबडी खत उपलब्ध होण्यासाठी २५,००० कोंबड्यांचे संगोपन आवश्यक आहे. एक कोंबडी दरवर्षी २५ किलो पोल्ट्री खत तयार करते.

३) मत्स्य तलावाच्या थेट खताचा पुरवठा करण्यासाठी तलावाच्यावर तांत्रिक पद्धतीने पोल्ट्री शेड बांधावी.

४) मत्स्य संगोपनासोबत कोंबडीपालन केल्याने माशांसाठी खाद्य मिळते. त्यामुळे माशांना कोणत्याही खाद्य बाहेरून विकत देण्याची आवश्यकता नसते. तसेच चिकन आणि अंडी विक्रीतून नफा वाढविता येतो.

मत्स्यपालनासह कोंबडीपालन करताना ः

१) ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन करायचे ठरविले तर संगोपन चक्राच्या सुरुवातीला प्रत्येक बॅचमधून उपलब्ध कोंबडी खताचे प्रमाण खूपच कमी असेल. वाढत्या कालावधीत ते शेवटपर्यंत कमाल पोहोचेपर्यंत वाढेल. तलावांमध्ये गरजेपेक्षा जास्त खत टाकू

नये याची काळजी घ्यावी. प्रत्येक पाच ते सात आठवड्यांनी कोंबड्यांची बॅच बदलावी.

२) अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांचे संगोपन करायचे असेल, तर खताचा पुरवठा १ ते १.५ वर्षांच्या कालावधीसाठी अधिक स्थिर होतो. चिकन स्टॉक अधूनमधून बदलावा लागेल.

कोंबडीच्या जिवंत वजनानुसार खताचे प्रमाणः

१) पाच आठवड्यांची कोंबडी दररोज सुमारे १ ग्रॅम कोरडे पदार्थ तयार करते.

२) १२ आठवड्यांची ब्रॉयलर कोंबडी सुमारे ४५ ग्रॅम ड्राय मॅटर डे तयार करते.

३) एक अंडी देणारी कोंबडी (०.५ ते १.५ वर्ष) दररोज सुमारे ४० ते ५० ग्रॅम कोरडे पदार्थ तयार करते.

कोंबड्यांची निवड ः

१) उत्पादनाच्या प्रकारानुसार स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कोंबडीच्या जाती निवडावी.

२) ब्रॉयलरच्या उत्पादनासाठी स्थानिक, सुधारित जाती किंवा संकरित जात निवडावी.

३) अंडी उत्पादनासाठी, सुधारित जाती किंवा त्यांच्या संकरित जातींना प्राधान्य द्यावे. काही निवडक जातींचा वापर मांस आणि अंडी यांच्या मिश्र उत्पादनासाठी देखील करता येतो.

एकात्मिक पद्धतीने मत्स्य आणि बदकपालन

१) बदक-मासे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये बदके तलावातील लहान बेडूक, टॅडपोल आणि ड्रॅगनफ्लाय खाऊन माशांसाठी सुरक्षित वातावरण तयार करतात.

२) बदक आपला बहुतेक वेळ तलावात पोहण्यात घालवते. म्हणून त्यांची विष्ठा थेट तलावात पडते. ज्यामुळे माशांच्या तलावातील नैसर्गिक अन्नाच्या वाढीस चालना देण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात.

३) बदकांच्या विष्ठेमध्ये कार्बन, फॉस्फरस, पोटॅशिअम, नायट्रोजन, कॅल्शिअम इत्यादी अनेक घटकांसह २५ टक्के सेंद्रिय आणि २० टक्के अजैविक पदार्थ असतात. त्यामुळे ते खताचा एक चांगला स्रोत बनते.

४) एक हेक्टर माशांच्या तलावासाठी खत उपलब्ध होण्यासाठी बदकांची संख्या १०० ते ३,००० च्या दरम्यान असावी. मत्स्यपालनाचा कालावधी आणि खताची आवश्यकता यावर बदकांची संख्या अवलंबून असते.

५) दोन आठवडे वयाची बदक पिले फार्ममधून खरेदी करावीत. आठ ते १२ आठवडे वयाचे बदक १.७ ते २.५ किलो किंवा पाच ते सहा महिन्यांची अंडी देणारी बदके १२ ते १८ महिन्यांसाठी संगोपन करावे. फार्ममधून एक दिवसाची बदक पिले मिळवावीत. माशांसह एकत्रित संगोपन करण्यापूर्वी दोन आठवडे बदक पिलांची काळजी घेणे आवश्यक आहे.

६) बदक वाढीच्या काळात माशांच्या तलावासाठी उपलब्ध खताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बदलते. बदके त्यांच्या प्रौढ जिवंत वजनापर्यंत पोचतात आणि अंडी घालू लागतात, तेव्हा ते स्थिर होते. कोणत्या जातीच्या बदकांचे संगोपन करावे. प्रत्येक तलावात किती बदके ठेवावीत याचा अंदाज घ्यावा. गरजेनुसार बदकांची संख्या योग्य पद्धतीने ठेवावी.

बदक जातींची निवडः

१) मांसासाठी बदकपालनः पेकिंग बदक, मस्कोव्ही किंवा संकरित पाळीव जातींची निवड.

२) अंडी उत्पादनासाठी बदक पालन : इंडियन रनर, खाकी-कॅम्पबेल, बाली.

३) पेकिंग बदकांसारखी दीर्घकाळ पाण्यात राहणे पसंत करणाऱ्या जातींची निवड करणे फायदेशीर ठरते.

integrated aquaculture
MSP panel: हमीभाव समितीत पंजाबला स्थान देण्याची मागणी

जनावरे आणि मासे एकात्मिक शेतीः

१) माशांच्या तलावांमध्ये शेणखत हे सर्वाधिक वापरले जाणारे खत आहे. एक हेक्टर तलावासाठी ५ ते ६ गाईंपासून मिळणारे शेण हे खत म्हणून पुरेसे ठरते. गाईंच्या दुधापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते. तसेच प्रति हेक्टरी प्रति वर्षी मत्स्य उत्पादनात ३,००० ते ४,००० किलो माशांचे उत्पादन मिळते.

२) एकात्मिक मत्स्यशेतीमध्ये मत्स्यसंगोपनाच्या बरोबरीने शेळी, मेंढीपालन, ससेपालन देखील किफायतशीर ठरते.

संपर्क ः किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com