
लेखक- विकास गोडगे
गेली तीस चाळीस वर्षे म्हातारी त्याच पायवाटेच्या कडेला डगरीवर असलेल्या कोपीत राहतेय. ती एकच त्रिकोणी कोप, कोपीसमोर एका कडेने सावली धरून उभा असलेलं लिंबाचं झाड, लिंबाच्या झाडात नागाच्या जुगम्या सारखं वेटोळं करुन वाढलेली चिंच. त्या झाडाला कधी लिंबोळ्या लागत तर कधी चिंचा. त्या चिंचा पण कधी कुणी विकल्या नाहीत ना कधी लिंबुळ्या विकायची पाळी आली. अख्या शिवारात ती म्हातारीची कोप म्हणून प्रसिद्ध होती. कसल्यापण उन्हाळ्यात त्या डगरीवर कोपीत किंवा कोपीच्या बाहेर गार गारच वाटत, म्हणजे जीवाला आराम भेटत.
त्रिकोणी आकाराची कोप म्हातारीच्या नवऱ्याने त्याच्या काळात रानात कवा आलं तर वारवासा असावा म्हणून बांधली होती. कसल्याही कावदानात ती कधी उडुन गेली नाही, पावसात गळली नाही किंवा उन्हाळ्यात उनाची किरणं आत पडुन तिचा चांदणी महाल झाला नाही. म्हातारीचा थोरला पोरगा शेती करायचा, तो दहा वर्षापूर्वी म्हातारा होऊन मेला, धाकटा लहानपणीच शिकून गेला, आता कुठं तरी परमुलखात असतो. नातवंडं मोठी झाली मुलुख गाजवू लागली. नवरा गेल्यावर कधीतरी जानवास्याला बांधलेली कोप तिनं जी धरली ती अजून सोडलीच नाही. आणि आता मरेपर्यंत सोडायची शक्यता पण नव्हती.
“पोराच्या आणि सुनंच्या जीवाला ताप नको म्हणून मी इथंच सुखात हाय बाबा” असं म्हणायची. पोराला वाईट वाटत असेल तसं सुनेला पण वाईट वाटत असेल पण ती तिथंच रानात लिंबाखाली राहिली तर तिचंच आयुष्य वाढल असा सुनेचा एकूण सकारात्मक दुर्ष्टीकोन होता. आयुष्य वाढून काय करायचं आहे, म्हणजे ती वीस वर्ष अगोदर मेली असती तरी काय फरक पडला असता, आणि अजून दहा वर्ष जगली तरी काय फरक पडणार आहे, पण म्हातारी जगली पाहिजे असं सुनेला मनापासून वाटायचं असं म्हातारीला वाटत.
पोरगा मेल्यावर सून पण मेली, तिला पण तिथंच समोरच जाळलं. नातू आणि पणतू आता गावात राजकारण करतात. पंचायत समिती, तहसील मधील अधिकारी त्याच्या वोळखीचे असतात, गावातल्या लोकांची कामे करतात. हे म्हातारीला गावातल्या आलेल्या वाटसरूकडून समजतं. दिवाळीला नातू, नातसून लाडू चिवडा आनुन देतात, नवीनच लग्न झालेला पणतू आणि त्याची केस कापलेली बायको शेजारी उभे राहतात.
दिवाळीत आणून दिलेल्या गोष्टी तशाच वाळून जातात. नातसून म्हणते , ‘म्हातारीला खावत न्हाय, चांगलं चुंगलं. जिचे कापलेले केस वाऱ्यावर उडत असतात त्या नवीन आलेल्या सुनेच्या सुनेला, म्हातारीचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्यासाठी काढू वाटत असतो, म्हातारीचा फोटो कमीतकमी नऊशे लाईक मिळवून देईल असं तिला वाटत असतं पण ती कंट्रोल करते.. परमुलुखात असलेल्या पोराची नातवंड कधी कधी येतात, कोपीच्या बाहेर उभा राहून म्हातारीला मोसंबी सफरचंद देतात. आणि पुढे रानात बॉन फायर करायला जातात. सुट्टीत तेवढं रान कधीतरी गजबजलेला दिसतं. पण म्हातारी तशीच एकटीच असते. तिला सनसूद वगैरे कशाचं कौतुक राहिलेलं नाही.
कोपीत एका मेडीच्या बाहेर आलेल्या वाकड्या लाकडावर काळा पडलेला कंदील अडकवलेला आहे, त्याची काच वरच्या बाजूने तडकलेली आहे आणि वात लहान मोठी करण्याचा खालचा वाल आता दिसत नाही. म्हातारी तो कंदील कधीच पेटवत नाही. पण तो आपली जागा पकडून आहे तो तसाच म्हातारीला अनेक वर्षापासून साथ देतोय. तिथंच शेजारी शिकं लोंबकळतय, खाली जरा पुढं सरकलं कि चुल, चुलीच्या पुढं सरपन, चुलीवर चिमनी, चिमनीच्या कडंला काडीपेटी, जरा मागं सरलं कि म्हातारीचं हातरुन पांघरुन. एवढीच म्हातारीची जिंदगी.
जगात जगायला काय पाहिजे असं कुणी विचारलं तर म्हातारी आणि म्हातारीची कोप दाखवावी. भर दुपारच्या पारात म्हातारी सरकत सरकत कोपीच्या दरवाज्यात आली. कोपिचा दरवाजा म्हणजे त्यातून बसूनच आत जावं लागतं, वाकून सुद्धा जाता यायचं नाही असा. म्हातारी बुडा खालचं पोतं तसंचं बुडाला चिकटून ठेवून सरकत सरकत कोपीच्या बाहेर आली आणि झाडाखाली बसून उगच वरलाकड बघू लागली. ती तिची सवयच होती. दुपारी ह्या टायमाला बाहेर झाडाखाली बसून कोपीच्या वरलाकड पसरलेल्या माळावरच्या पायवाटेकड कपाळावर हात धरून बघत बसायचं. कोण दादापा येतोय का वगैरे.
दिवसातून एकदा कधी कधी दोनदा, उन्हाळ्यात किंवा लगीन सराईत जरा माणसांची जास्त वर्दळ असायची. बाकी तिकडे कुणी फिरकत नसे. तोच रस्ता पुढे एका गावाला जात असे, फुफुट्याने माखून गेलेल्या त्या पायवाटेवरून सरळ लांब आभाळाखाली वर डोकी काढलेल्या डोंगरांची बारकी रांग वोलांडली कि एक गाव लागतं ते तिचं माहेर, त्या रस्त्याकड म्हातारी बघत बसते, जोपर्यंत दिवस मावळत नाही तोपर्यंत.
दुपारी असंचं डोळ्याला डोळा लागल्यावर बैलगाड्यांचा आवाज आला. ह्या तर आपल्या लग्नाच्या गाड्याच येत आहेत चंगाळ्या बांधून. ती आजून त्यांच्या बैलाच्या चंगाळ्याचा आवाज ओळखते. तिच्यासमोर तिची नटून बसलेली आई आहे, रुबाबदार आबा पटका बांधून गाडी दापत आहेत, वेणी बांधून बसलेली बारकी बहिण आबाच्या शेजारी बसलीय. ती नवरी बनून नटून बसलेली आहे आणि भविष्पाची स्यप्नं रंगवत आहे.
पन्नासिक बैलगाड्या एकाम्हागं एक, तिचं वडील रुबाबदार, पहिल्या नंबरला तिची गाडी होती, तट्याची गाडी आणि मागे काही तट्या नसलेल्या काही तशाच उघड्या पण बैलं सजवलेल्या बैलगाड्या आणि प्रत्येक गाडीत बायापोरी आणि एक गडीमाणूस. तिच्या सुरकुतलेल्या तोंडावर एक हास्य उमलतं. ती दचकून जागी होते, तिचे किलकिले डोळे उघडतात, तिला आबा शेजारी बसलेली बारकी लुकलुकत्या डोळ्यांची बहिण आठवते, तिला पण हिकडच्याच गावात दिली होती.
तिला त्या स्वप्नातून बाहेर यायचं नसतं पण ते तिच्या हातात नसतं, आता ती डोळे झाकून पुन्हा त्या काळात जायचा प्रयत्न करते...तिला पुन्हा ती खेळणारी खोडकर लहान बहिण दिसू लागते ...आपल्या लग्नानंतर म्होरल्याच वर्षी तिचं पण लग्न झालेलं.......बिचारी..........आणि तिला आठवून म्हातारीच्या डोळ्यातून पाण्याचे दोन थेंब ओघळतात .....