Vineyard Management : वाढत्या तापमानात द्राक्षघडांचा विकास

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फळछाटणी घेतलेल्या बागेत मण्याचा विकास होत असताना बागेतील किमान तापमानात अचानक घट होते. अशा वातावरणात वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावतो.
Grape Crop
Grape CropAgrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अहमद शब्बीर, डॉ. शर्मिष्ठा नाईक

सध्याच्या वातावरणाचा विचार करता दिवसाचे तापमान (Day Temperature) जास्त वाढत (३४ अंशांपर्यंत) असून, रात्रीच्या तापमानात कमी प्रमाणात घट (१८ ते १९ अंशांपर्यंत) होत आहे.

गेल्या आठवड्यातील कमाल व किमान तापमानातील तफावत ही पुढील आठवड्यात तापमान वाढीचे संकेत देते. म्हणजेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत येत्या आठवड्यात तापमानात जास्त प्रमाणात वाढ होईल.

आपल्या बागेत (Vineyard) वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था असतील, अशा वेळी या वातावरणाचा कसा परिणाम होईल, संभावित उपाययोजनांची माहिती घेऊ.

उशिरा छाटणी घेतलेल्या बागेतील परिस्थिती ः

महाराष्ट्रात साधारणतः फळछाटणीची सुरुवात ही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून होते. उशिरा छाटलेल्या बागेचा विचार करता हीच फळछाटणी (Grape Prunning) नोव्हेंबर महिन्याच्या शेवटचा आठवडा किंवा पुळूज (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)सारख्या भागात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी घेतली जाते.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फळछाटणी घेतलेल्या बागेत मण्याचा विकास होत असताना बागेतील किमान तापमानात अचानक घट होते.

अशा वातावरणात वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावतो. परिणामी, मण्याचा विकास होत नाही.

फळछाटणीपासून फळ काढणीपर्यंतचा कालावधी साधारणतः १५० दिवसांचा असतो. काही द्राक्षजातींमध्ये हा कालावधी कमीसुद्धा असू शकतो.

उदा. मांजरी नवीन ही द्राक्षजात १०० ते ११० दिवसांत तयार होते. इतर द्राक्षजातींचा विचार करता घडाच्या विकासात मिळालेला कालावधी व बागेतील तापमान या बाबी महत्त्वाची भूमिका निभावतात.

रात्रीच्या तापमानात जास्त प्रमाणात घट झाल्यास बागायतदार जास्त प्रमाणात संजीवकांचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. संजीवक म्हणजे एक प्रकारचे रसायन आहे.

जितका रसायनाचा वापर जास्त तितका द्राक्षवेलीमध्ये सोर्स आणि सिंकचा समतोल टिकवून ठेवण्याची क्षमता असली पाहिजे.

द्राक्षवेलीमध्ये सोर्स म्हणजे वेलीची पाने, काडी, खोड, ओलांडा व मुळे इतके अवयव कार्य करतात. तर सिंक म्हणजे विकास होत असलेला द्राक्षघड असतो.

बऱ्याचदा आपण या गोष्टीवर चर्चा करतो. मात्र प्रत्येक ठिकाणी जमीन एकसारखी असते असे नाही. या जमिनीचा आपण विचार करतोच असे नाही.

जमिनीच्या प्रकाराचा विचार करता काही वेळी असे लक्षात येते, की भारी जमिनीत लागवड केलेल्या द्राक्षवेलीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा बऱ्यापैकी दिसून येतो.

या पुरवठ्याचा विचार करता वेलीवर पानांची संख्या (वाढीचा जोम), आकार, जाडी आणि तजेलदारपणा असल्याचे दिसून येईल. यामुळे द्राक्ष वेलीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा जास्त प्रमाणात होतो व परिणामी वेलीमध्ये अन्नद्रव्यांची साठवण (स्टोअरेज) क्षमता चांगली असते.

अशा भारी जमिनीतील बागेत शक्यतो द्राक्ष घडाच्या विकासात अडचणी कमी दिसून येतात.

Grape Crop
Grape Export : कमी साखरेच्या द्राक्ष माल निर्यातीचा मुद्दा पुन्हा समोर

हलक्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे द्राक्षवेलीचा विकास अपेक्षेप्रमाणे होत नाही. परिणामी, पानांची संख्या (वाढीचा जोम), आकार कमी प्रमाणात दिसून येईल. पानाचे क्षेत्रफळ कमी असल्यास हरितद्रव्याची मात्रा कमी असेल.

त्यामुळे प्रकाश संश्‍लेषणसुद्धा कमी होईल. परिणामी, वेलीमध्ये अन्नद्रव्यांचा साठाही कमी राहू शकतो. या परिस्थितीतील द्राक्ष बागेत कमी तापमानातसुद्धा द्राक्ष घडांचा विकास चांगला व्हावा.

या उद्देशाने द्राक्ष बागायतदार वेगवेगळ्या संजीवकांची फवारणी शिफारशीपेक्षा अधिक मात्रेमध्ये करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र या जमिनीमध्ये सोर्स सिंक संबंधामध्ये बरीच तफावत दिसून येते. याचा अर्थ असा होतो, की घडाच्या विकासात आवश्यक संजीवकांचा मात्रा जरी पुरेशी असली तरी त्याच्या सोबत सोर्स मधून उपलब्ध होणाऱ्या घटकांची हलक्या जमिनीमुळे पूर्ण होत नाही.

यामुळे सिंकमध्ये संजीवकांची तीव्रता वाढून त्याचे विपरित परिणाम घडांच्या देठ, दांड्यावर गाठीच्या रूपात दिसून येतात.

काही परिस्थितीमध्ये काडीवरील डोळ्यावरही गाठी दिसून येतात. जर वेलीमध्ये हा सोर्स आणि सिंकचा समतोल आणता न आल्यास (संजीवकांची तीव्रता जास्त झाल्यास) घडाच्या पाकळ्यांची वाढ व्यवस्थित होत नाही.

काही बागेमध्ये घडाच्या वरील भागातील पाकळ्यांची जाडी व्यवस्थित असेल, तर त्याच घडाच्या खालील बाजूच्या पाकळ्याची जाडी कमी असेल.

यामुळे मण्यातील आकारात कमी अधिकपणा आढळून येईल. अशा प्रकारची द्राक्षे निर्यातक्षम प्रतीची समजली जात नाहीत.

कारण निर्यातक्षम प्रतीची द्राक्षे म्हणजे त्या घडात जवळपास शंभर टक्के मणी एकसारख्या आकाराचे व गोडीचे असले पाहिजेत. या वर्षी हलक्या जमिनीतील व उशिरा छाटलेल्या द्राक्ष बागेत ही समस्या प्रामुख्याने दिसून येत आहे.

यावर सध्याच्या परिस्थितीत काही उपाययोजना नसल्या तरी बारीक मणी असलेल्या पाकळ्या पुढील काळात काढून घ्याव्यात.

फार जास्त समस्या असल्यास तो द्राक्षघड जास्त मोकळा होण्याची शक्यता असेल, अशा स्थितीत काही वरच्या व काही खालील पाकळ्या काढून पनेट बसण्यायोग्य द्राक्षघड तयार करून घ्यावा.

हीच परिस्थिती जर दरवर्षी उद्‍भवत असल्यास पुढील काळात महत्त्वाच्या उपाययोजना म्हणजे बोद व्यवस्थितरित्या खोदून त्यामध्ये शेणखते, कंपोस्ट, उसाचे पाचट, बगॅस अशा काही सेंद्रिय पदार्थांचा जास्त प्रमाणात वापर करून व्यवस्थितरीत्या अन्नद्रव्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे. त्याद्वारे या जमिनीचाही पोत भारी जमिनीप्रमाणे सुधारता येईल.

द्राक्षघडाचा सुकवा ः

द्राक्षघडाचा विकास होत असताना मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत बऱ्याच वेळा द्राक्षबागायतदारांची एक तक्रार असते, ती म्हणजे घडांचा सुकवा.

द्राक्ष बागेत घडाचा सुकवा होत असताना खालील बाजूस काही मणी सुकताना दिसून येतील, त्या घडातील काही पाकळ्या आधीच सुकलेल्या असतील. जर पाकळ्या आधीच सुकलेल्या असल्यास मण्याच्या विकासात नक्कीच अडचणी येतील.

म्हणजेच मण्याचा विकास होणार नाही व मणी तिथल्या तिथेच सुकताना दिसून येतील. ही परिस्थिती द्राक्ष बागेत दोन गोष्टींमुळे उद्‍भवू शकते.

Grape Crop
Grape Advisory : ढगाळ वातावरणात द्राक्ष बागेची कशी काळजी घ्याल ?

मण्यात पाणी उतरतेवेळी बागेमध्ये द्राक्ष बागायतदार मोकळे पाणी देण्याचा प्रयत्न करतात. या वेळी उपलब्धता व गरज यामध्ये अचानक तफावत जास्त झाल्यास सुद्धा ही परिस्थिती निर्माण होते.

याच सोबत वेलीवर आवश्यकतेपेक्षा घडांची संख्या जास्त असल्यासही सोर्स सिंकचा समतोल बिघडतो. अन्नद्रव्याचा पुरवठा आणि उपलब्धता यातील गणित बिघडते. त्यामुळे बागेत सुकवा दिसून येतो.

बागेत प्रीब्लूम ते फुलोरा अवस्थेत डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जरी विविध बुरशीनाशकांच्या फवारणीमुळे कमी झाला असला, तरी मण्यात पाणी उतरतेवेळी मोकळे पाणी दिल्यास बागेतील आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते.

त्यामुळे सुप्तावस्थेत असलेला डाऊनी मिल्ड्यूची बीजाणू पुन्हा सक्रिय होतात. परिणामी, काही देठाच्या पाकळ्या गुलाबी ते तपकिरी रंगाच्या दिसून येतील.

कालांतरानेच या पाकळ्या द्राक्ष घडाचा सुकवा म्हणून संबोधल्या जातील. यावेळी द्राक्ष बागेत रोग नियंत्रणाकरिता रसायनांचा वापर करण्याची मुभा नसेल. परंतु जैविक नियंत्रणाचा वापर करणे शक्य असेल.

यामध्ये ट्रायकोडर्मा उदा. मांजरी वाईनगार्ड २ मिलि प्रति लिटर प्रमाणे तिसऱ्या दिवशी याप्रमाणे तीन ते चार फवारण्या करून घ्याव्यात.

ज्या बागेत ही परिस्थिती नसल्यास अन्नद्रव्याचा समतोल बिघडला असे समजून कॅल्शिअम ३ ग्रॅम, मॅग्नेशिअम ४ ग्रॅम व पोटॅश ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात वेगवेगळी फवारणी करून घेतल्यास थोड्या फार प्रमाणात सुकवा नियंत्रणात येऊ शकतो.

या वेळी घडाच्या विकासाकरिता द्राक्ष बागायतदार बऱ्यापैकी फक्त पालाशचा वापर करतात. (०-०-५०) असे न करता स्फुरद व पालाशयुक्त ग्रेडचा वापर अधिक महत्त्वाचा असेल.

बऱ्याचशा जमिनीचा सामू ७.५ पेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. अशा ठिकाणी मण्यात पाणी उतरल्यानंतर ०-४०-३७ एक ते सव्वा किलो प्रति एकर प्रमाणे किंवा ०-९-४६ सव्वा ते दीड किलो प्रति एकर या प्रमाणे फळकाढणीपर्यंत जमिनीतून उपलब्धता करता येईल.

डॉ. आर.जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com