Corporate : बाजारशरण जगण्याची अगतिकता

शेती क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका गडद होण्याची आशंका असल्यामुळेच अमेरिका आणि युरोपातील नियंत्रकांनी या व्यवहाराला अजून मान्यता दिलेली नाही.
Corporate
CorporateAgrowon

लेखक- विकास गोडगे

शेती क्षेत्रातील दोन महाकाय कंपन्या मोन्सॅन्टो (Monsanto) आणि बायर (Buyer) यांच्यात काही दिवसांपूर्वी एक करार झाला. त्यानुसार बायरने ६६०० कोटी डॉलर्स मोजून मोन्सॅन्टो कंपनी विकत घेण्याचे ठरले आहे. हे विलिनीकरण जर खरोखर झाले तर जगातील ३० टक्के शेतातील बियाणे आणि २५ टक्के पिकांवर फवारली जाणारी किडनाशके या एकट्या कंपनीची असतील इतका मोठा आकार या नव्या कंपनीचा होईल. अमेरिकेतील बियाणे बाजारपेठेतील (American Seed Market) तब्बल ७० टक्के वाटा या कंपनीचा असेल.

ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. कारण तुम्ही शेतात काय पिकवावे, कोणते बियाणे लावावे, तुमच्या पिकावर कोणते रोग आणि किडी यावेत आणि त्यावर काय औषध फवारावे याचा निर्णय घेण्याची ताकद या कंपनीकडे एकवटली जाण्याची भीती आहे. शेती क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका गडद होण्याची आशंका असल्यामुळेच अमेरिका आणि युरोपातील नियंत्रकांनी या व्यवहाराला अजून मान्यता दिलेली नाही. 

मोन्सॅन्टो-बायरच्या आधी केम चायना-सिन्जेन्टा आणि ड्यूपॉंट- डाऊ केमिकल्स या बड्या कंपन्यांचे विलीनीकरण-अधिग्रहणाचे व्यवहार पार पडले आहेत. जगातल्या शेतीचा जीव पूर्वी पाच महाकाय कंपन्यांच्या पोलादी पंजात अडकलेला होता, आता विलिनीकरण-अधिग्रहणामुळे या कंपन्यांची संख्या तीनवर आली आहे. म्हणजे केवळ तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात जगातल्या संपूर्ण शेती क्षेत्राची नाडी आहे.

पृथ्वीची मालकी

केवळ शेतीच नव्हे तर आपल्या एकूण जगण्याशी संबंधित सर्वच क्षेत्रांवर कॉर्पोरेट कंपन्यांची हुकुमत निर्माण झाली आहे. आपण आपल्या मर्जीने श्वाससुध्दा घेऊ शकत नाही, अशी स्थिती नजीकच्या भविष्यात ओढवेल. थोड्या फार फरकाने जॉर्ज ऑर्वेलच्या ‘एनिमल फार्म' या कादंबरीतल्यासारखी आपल्या जगण्याची कथा झाली आहे.

जगात बहुतांश राष्ट्रात लोकशाही आहे आणि तिथली लोकनियुक्त सरकारे त्या राष्ट्रांचा गाडा हाकतात, हा खूपच मोठा भ्रम सध्या जगात पसरला आहे. वास्तविक हे जग काही औद्योगिक घराणी आणि कोर्पोरेशन चालवतात आणि लोकनियुक्त सरकारे फक्त त्याचे क्रेडीट घेतात किंवा एजन्ट म्हणून काम पाहतात. आपण अमुक तमुक देशात नव्हे तर एका खूप मोठ्या मार्केट मधे राहतो, हेच सत्य आहे. शिवाय मार्केट हे मागणीनुसार चालते हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आता समुद्रात बुडवायची वेळ आलेली आहे.

Corporate
Dairy Business : संघर्षातून सांभाळली शेती, दूध व्यवसाय

ह्या मार्केटचे कर्तेकरविता म्हणजेच कॉर्पोरेटस्. हेच मागणी निर्माण करतात, हेच माणसाच्या गरजा निर्धारित करतात, माणसाने काय पिकवले पाहिजे, कसे पिकवले पाहिजे, काय खाल्ले पाहिजे, ह्यांना कोणते रोग झाले पाहिजेत, ह्यांनी कोणती औषधे घेतली पाहिजेत, ह्यांनी कोणती कपडे घातली पाहिजेत हे सगळं हे कॉर्पोरेट्स ठरवतात. पृथ्वीची मालकी सध्यातरी ह्या आवाढव्य अशा कंपन्यांच्या हातात आहे, असेच दिसते.

जनुकीय बदल केलेले पिकांचे वाण (जीएम) तर आता आलेलेच आहेत. पण आपण जे गाईचे दुध पितो त्याला सुद्धा गाईचे दुध म्हणावे की नाही ही एक शंकाच आहे. आजच्या संकरीत गाईंना ‘दूध देणारे यंत्र` म्हणणेच जास्त सयुक्तिक ठरेल. कारण ५०%, ७०% किंवा १००% संकर करून किंवा प्राण्याचे मुलभूत गुणधर्म बदलून ह्या गाई तयार केलेल्या असतात. हे असेच चालू राहिले तर लवकरच निसर्गाने निर्माण केलेल्या वनस्पती, प्राणी नष्ट होऊन जगात विज्ञानाचा गैरफायदा घेऊन निर्माण केलेले कृत्रिम प्राणी, वनस्पतीच दिसू लागतील. आणि तो दिवस दूर नसेल ज्या दिवशी ह्या पृथ्वीने कसे दिसले पाहिजे, प्राण्याचा रंग कसला पाहिजे, वनस्पती कोणत्या असाव्यात आणि त्या किती असाव्यात, किती नवीन माणसांना जन्म द्यायचा, माणसांच्या प्रजननावर नियंत्रण ठेऊन, आहे त्या लोकांनाच अमर ठेवून पृथ्वीचे आयुष्य वाढवण्यासाठी काय केले पाहिजे याचाच फक्त अभ्यास केला जाईल.

जीएम पिकांच्या पाठोपाठ  पुनरूत्पादन करु न शकणारे प्राणी निर्माण करणे हे दुसरे पाउल आणि पुनरूत्पादन करू न शकणारे उच्च दर्जाचे निरोगी आणि पुढे जाऊन अमर मानव निर्माण करणे हे मानव जातीचे पुढचे उद्दिष्ट असेल. आणि या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ह्या महाकाय कंपन्यांचे असेल. त्यांच्याच हातात हे तंत्रज्ञान असेल, उत्पादन साधने असतील, वितरणाचे अधिकार असतील. अर्थात जगावर हुकुमत असेल.  ही एखाद्या इंग्रजी चित्रपटाची कथा नाही, तर नजीकच्या भविष्यातील वास्तव आहे. 

घरचे बियाणे

साधारण वीस वर्षापूर्वी मला आठवते कि आमचे आजोबा, आज्जी आणि गावातील इतर लोक ज्वारी, तूर, करडई या मुख्य पिकांचे ‘बी` जपून ठेवत आणि त्याला थोड्याफार गावरान पद्धतीने धुवून वगैरे किंवा थोडेसे थायमीट लावून पेरणी करत. पिकांचे अनेक गावरान वाण होते.  प्रत्येक वाणाच्या ज्वारीच्या भाकरीची चव वेगळी लागत असे. तेच डाळींचे पण. जवस, भगर, तीळ, लसून, पपई, घेवडा, मूग, हुलगा, हादगा, शेवगा, काकडी, वाळूक, शेंदाड अशा किती तरी पिकांचे वाण एका छोट्याशा कापडी फडक्यात बांधून घराच्या छताला असणाऱ्या आडाला बांधून ठेवत. आणि पेरण्यांच्या काळात हेच बियाणे म्हणून वापरले जाई.

तेव्हा शेतकऱ्यांना आणि सरकारला बियांण्यांसाठी व्यापारी,कंपन्यांवर अवलंबून रहायची वेळ येत नसे. आज गावातले चार आणे शेतकरी सुद्धा स्वतःचे बियाणे वापरत नाहीत. सर्व मूळ बियाणे जी निसर्गाची देणगी होती तेच आता समूळ नाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. ही समस्या फक्त भारतापुरतीच मर्यादीत नाही, तर संपूर्ण जगातच हा झगडा सुरू आहे. 

भूकेची कारणे

देशी किंवा नैसर्गिक वाणांमुळे शेतीउत्पादन पुरेसे वाढत नसल्यामुळे उपासमार होत होती, हे अर्धसत्य आहे. उपासमारीची कारणे वेगळी आणि व्यवस्थेमध्ये दडलेली आहेत. असंतुलित समाजरचना, बाजारशरण अर्थव्यवस्था आणि भांडवलशाहीचा विपर्यास ही भुकेच्या समस्येची कारणे आहेत. आज अमेरिकेतील एक माणूस जेवढे अन्न वाया घालवतो त्यापेक्षा कमी अन्नामध्ये आफ्रिकी आणि आशियायी माणूस जगतो.

बाजारकेंद्री व्यवस्था बदलली नाही तर जगाच्या गरजेपेक्षा दीडपट अन्नउत्पादन झाले तरी उपासमार, भूकबळी यांचे अस्तित्व असणारच आहे. भारतात दुसऱ्या हरिक्रांतीचे डोहाळे लागलेल्या सरकारला हे विचारणे गरजेचे आहे कि या क्रांतीची गरज कुणाला आहे? आताच शेततकरी पिकवत असलेल्या शेतमालाला सरकार भाव देत नाही तर दुसऱ्या हरिक्रांतीमधून निर्माण होणाऱ्या अफाटआणि निकृष्ट शेती उत्पादनाला सरकार भाव देऊ शकणार आहे काय ?

भारतासारख्या गरीब देशातल्या लोकांना गुलाम करण्याची ही विकसित पाश्चिमात्य देशांची चाल आहे, असा एक लोकांचा समज असतो. पण हे इतके साधे-सोपे नसते. ह्या कंपन्या भांडवलावर चालतात आणि भांडवलाला जात, भाषा, देश वगैरे काही नसते. असते फक्त एकच लक्ष्य- नफा, अजून नफा आणि अजून जास्त नफा. ह्या भांडवलावर मालकी असलेले मोजके लोक फक्त भारताला नाही तर जगातील देशनिरपेक्ष सगळ्या लोकांना गुलाम बनविण्यात यश मिळवू शकतात.

थोडक्यात प्रदूषण, वाढते तापमान, समुद्राच्या पातळीत वाढ, दुष्काळ, अम्लांचा पाउस ह्या सगळ्या गोष्टींची भीती प्रसारमाध्यमातून दाखवली जाते पण पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत हे जीवशास्त्रीय आणि रसायन शास्त्रीय तंत्रज्ञान असणार आहे हे कुणीही सांगत नाही.

जगातील सरकारांनी जर बियाणे, शेतीवरील औषधे, मानवाची औषधे यांच्या कारभारावर नियंत्रण आणायचे ठरवले तरी ते आता शक्य नाही. कारण वेळ निघून गेलेली आहे. तेवढी त्यांची ताकदही नाही. आता केवळ  ‘ठेविले अनंते तैसेची राहावे , चित्ती असू द्यावे समाधान...!`या पलीकडे काही हाती उरले आहे, असे जाणवत नाही.   

(लेखक खासगी क्षेत्रात वरिष्ठ पदावर आहेत.) 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com