Rural Development In Nashik : जलसंधारण, सौर पंप वापरात कोनांबे गावचे काय आहे ‘रोल मॉडेल’?

नाशिक जिल्ह्यात कोनांबे (ता. सिन्नर) गाव काही वर्षांपूर्वी दुष्काळी छायेत सापडले. अलीकडील वर्षांत लोकसहभाग, शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने गावात मृद्‍-जलसंधारणाची भरीव कामे पार पडली.
Rural Development In Nashik
Rural Development In NashikAgrowon

Nashik Rural Story : नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याच्या (Sinnar Taluka) पश्‍चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात वसलेले कोनांबे गाव पूर्वी तालुक्यातील ‘कोकण’ म्हणून ओळखले जायचे. देव नदीचा उगम या भागात आहे.

येथील संत कै. परसराम बाबा यांच्या पुढाकाराने शाळा, मंदिरे, तालीम यांसह दारूबंदी झाली. वारकरी संप्रदायाचा पगडा गावावर आहे. सुमारे ५४ दशलक्ष घनफूट क्षमतेचा कोनांबे लघू पाटबंधारे प्रकल्प झाल्यानंतर

गाव पाण्यामध्ये स्वयंपूर्ण झाले. पुढे पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणाऱ्या गाळामुळे प्रकल्प गाळयुक्त झाला. अवघा १५० मिमी पाऊस होऊनही धरण ‘ओव्हर फ्लो’ व्हायचे. परिणामी, २०१२-१३ मध्ये गाव दुष्काळाच्या छायेत आले.

सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. संकट ओळखून तत्कालीन सरपंच संजय डावरे यांनी २०१५ मध्ये जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेतला.

एकीची ताकद

सुदर्शन संस्था, सिन्नर बाजार समिती यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली. गावातील तरुणवर्ग, लोकसहभाग, युवा मित्र संस्था, सुदर्शन सामाजिक संस्था, भारतीय जैन संघटना, तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, तहसीलदार श्री. गवळी यांच्यासह शासकीय पाठबळ अशी सर्व

ताकद एकत्र आली. गावातील जुने जलस्रोत विकसित करण्यास सुरुवात झाले. सन २०१७ मध्ये पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेतील सहभागासह महिला व पुरुषांनी जलसंधारण कामांचे प्रशिक्षण घेतले. जलआराखडा तयार झाला.

Rural Development In Nashik
Water Conservation Scam : जलसंधारण घोटाळ्यातील नावे समोर

सन २०१८ मध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानात सहभाग घेतला. एक मे २०१८ मध्ये महाश्रमदान कार्यक्रम झाला. वावळा, कुरण व मोरदरा डोंगर परिसरात समतल व खोल समतल तयार केले.

चौदा जलस्रोत ज्यांमध्ये गळती होण्यासह फुटण्याची शक्यता होती तेथे कामे झाली. आज ७५० मिमी पाऊस होऊनही प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ होत नाही. त्यातील पाणीसाठा वाढला आहे. शेतकऱ्यांच्या खडकाळ जमिनींवर गाळ पसरल्याने सुमारे ७०० एकर क्षेत्र

सुपीक होऊ लागले. यंत्रांच्या इंधनासाठी शेतकऱ्यांनी खर्च केला. त्यातून शंभर शेततळ्यांची निर्मिती झाली. गावात आज सुमारे २०० शेतकऱ्यांकडे शेततळी आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून २२ रिचार्ज शाफ्ट उभारले. त्यातून शिवारात भूजलपातळी वाढली.

कोनांबे जलसंधारण दृष्टिक्षेपात

गावचे क्षेत्रफळ- २०२२ हेक्टर

कृषक क्षेत्र...१६०० हेक्टरवर

खातेदार शेतकरी...६२४

झालेली कामे

कामे... कामांची संख्या.. साठवण क्षमता (कोटी लिटर)

सलग समतल चर.. ८ .. ०.०२७

खोल सलग समतल चर...५... ०.०२४

बंडिंग...१२... ०.०४५

शेततळे...२०...०.२२

लहान मातीचे बंधारे...५...०.००२

माती नाला बांध...१४....०.६

पाझर तलाव...१...१०

केटी वेयर...२...१.०५

पाणी बचतीसाठीचे निर्णय

१) जास्त पाण्याची गरज असलेली पिके घेण्यास मनाई.

२) अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म व तुषार सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न. सेंद्रिय व व पॉली मल्चिंग आच्छादनावर भर.

३) पावसाचे पाणी गावातच अडविण्यासाठी जल व मृद्‌संवर्धनाचे उपाय

४) वर्तमान पाणीसाठा व जमिनीच्या प्रतवारीनुसार सिंचन वेळापत्रक.

५) सांडपाण्याच्या नियोजनासाठी घरोघरी शोषखड्डे

६) प्रति व्यक्ती दोन देशी झाडांची लागवड. पाऊसमान टिकविण्यासाठी जैवविविधता टिकवण्यावर भर.

Rural Development In Nashik
राज्यात मृद्‌ व जलसंधारण विभागाची २३ नवी कार्यालये

शेतीचा समृद्ध विकास

सेंद्रिय अवशेषांचा पुन्हा शेतात वापर होत असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फायदा झाला. शिवारात टोमॅटो, वांगी, काकडी, कलिंगड, द्राक्ष, शेडनेटमध्ये सिमला मिरची आदी पिके डोंगराळ भागात फुलली. १० ते १५ तरुण भाजीपाला खरेदी-विक्री व्यवसाय करतात.

२५ हून अधिक जणांना वाहतूक व्यवसायातून रोजगार संधी उपलब्ध झाल्या. शेतकरी एकत्रित येऊन निविष्ठा व साहित्याची सामूहिक खरेदी करतात. त्यामुळे अतिरिक्त खर्च कमी झाला आहे. कोनांबे व रूट ग्रोवर या दोन शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत.

द्राक्ष, कांदा निर्यातीच्या अनुषंगाने कार्य सुरू आहे. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांचे मार्गदर्शन मिळते. राइस मिल सुरू होत आहे.

सौर कृषिपंप वापरात ओळख

शेतात वीज न पोहोचलेल्या शेतकऱ्यांचे माजी सरपंच संजय डावरे यांनी सर्वेक्षण केले. त्यातून पाच अश्‍वशक्तीचे ५८ तर ३ अश्‍वशक्तीचे ८२ सौरऊर्जेवरील पंप कार्यान्वित झाले. भारनियमनाचे संकट कमी झाले.

रात्रीच्या वेळी साप, बिबट्याचे धोके, थंडी, पाऊस आदी समस्यांपासून शेतकऱ्यांची सुटका झाली. जिल्ह्यातील सर्वाधिक १४० पंप एकट्या कोनांबे गावात मुख्यमंत्री कृषी सौर कृषी आणि पंतप्रधान कुसुम सौर योजनेच्या माध्यमातून बसवण्यात आले.

यातील सुमारे ७५ पंप जिथे वीजच पोहोचली नव्हती अशा डोंगरदऱ्यातील शेतांमध्ये बसविले. सुमारे सातशे एकर शेती सिंचनाखाली आली. त्यातून आदिवासींना आपले उत्पादन वाढवणे शक्य झाले. इतरांच्या शेतात मजुरीसाठी जाण्याची गरज संपली.

शिवारात ३७ रोहित्रे कार्यान्वित होते. महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नव्याने ५० रोहित्रे कार्यान्वित झाली. वीज चोरीला आळा बसला. एकसमान दाबाने विद्युतपुरवठा होत आहे.

दृष्टिक्षेपात कोनांबे विकास :

-अंगणवाडी, पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणसुविधा

-ग्रामीण आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उपचार व्यवस्था.

-केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून अटल भूजल योजनेत गावाचा समावेश.

-नवीन तलाठी सजा निर्मितीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळली.

-पाणी पुरवठ्यासाठी नळ योजना कार्यान्वित.

-चराईबंदी, कुऱ्हाडबंदीमुळे जैवविविधता संवर्धन

-विद्यार्थ्यांकडून सीड बॉल, रोपवाटिका निर्मिती व वृक्षलागवड.

-करंज, कडुनिंब, चिंच, आवळा यांची वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लागवड

-कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालनात आघाडी.

-एक गाव एक गणपती उत्सव परंपरा, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांचे गावं, पर्यावरणपूरक उपक्रम आदींसाठी गावाची ओळख.

-महात्मा गांधी ग्रामसमृद्धी, पाणी फाउंडेशन वॉटर कप, कृषी माउली, ग्लोबल इको व्हिलेज आदी पुरस्कार.

संपर्क - संजय डावरे, ७७९६२७१४२१, पांडुरंग डावरे, ७५८८०४०७३५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com