
राज्यभरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे काढणीयोग्य रब्बी पिके, फळबागांसह भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
आशा परिस्थितीत नुकसान झालेले गहू (Wheat), हरभरा पिके (Chana Crop) आणि आंबा, (Mango) संत्रा मोसंबी बागेत तज्ज्ञांनी सांगीतलेल्या पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा.
गहू
काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत असलेले गहू पीक आडवे झालेले आहे. पावसामुळे गव्हाचे दाणे बुरशी लागून काळे पडण्याची शक्यता असते.
दाणे भिजल्यामुळे दाण्याची प्रत खालावते याशिवाय दाण्याची चकाकी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर परिपक्व पिकाची काढणी करुन पीक उन्हात वाळवावे. पीक जमिनीवर लोळत असेल तर मशीनने काढणी करता येत नाही.
त्यामुळे मजुरांकडून गव्हाची कापणी करावी. ज्याठिकाणी गव्हाची उशीरा पेरणी झालेली आहे. त्याठिकाणी फारसं नुकसान होणार नाही. दाणे अजून परिपक्व झाले नसतील तर पीक काढण्याची घाई करु नये.
हरभरा
ज्याठिकाणी हरभऱ्याची उशीरा पेरणी झालेली आहे. अशा हरभरा पिकाला हा पाऊस फायदेशीर आहे. तर काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार पावसामुळे पिकाचे पुर्णपणे नुकसान झालेलं आहे.
अशा ठिकाणी पीक लवकरात लवकर पाण्याबाहेर काढावे. फुलोरा अवस्थेतील पिकावर ढगाळ हवामानामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
अशा ठिकाणी घाटेअळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
आंबा
वादळी वाऱ्यासह जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे अशा ठिकाणी आंबा बागेत फळांची गळ झालेली आहे.
अशी गळालेली फळे उचलून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. कारण या फळांमुळे बागेत मीजमाशी, फळ पोखरणारी अळी अशा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ज्याठिकाणी फांद्या तुटलेल्या आहेत अशा ठिकाणी झाडाला १ टक्का बोर्डोपेस्ट लावावी.
ओलसर हवामानामुळे बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे बागेत हेक्झाकोनॅझोल किंवा प्रोपीकोनॅझोल किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी मिसळून आलटून पालटून फवारणी घ्यावी.
ज्याठिकाणी रिमझीम पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी पुनर्मोहराची गळ होण्याची शक्यता आहे. जी फायदेशीर आहे.
संत्रा, मोसंबी
संत्रा, मोसंबी बागेमध्ये आंबिया बहाराची फळे गोटी आकाराची आहेत. पावसामुळे या फळांची गळ झालेली आहे. तर मृग बाहाराच्या काढणीयोग्य फळांचीही गळ झालेली आहे. पावसामुळे फळांवर काळे डाग पडून फळांची प्रत खालावते.
अशी फळे गोळा करुन बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार घेतलेल्या बागेत उशीरा ताण तोडला आहे अशा बागा फुलोरा अवस्थेत आहेत.
अशा बागेत फुलगळ झालेली आहे. अशा बागेत ताबडतोब १ टक्का बोर्डोमीश्रणाची फवारणी करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.