Maharudra Mangnale : लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतील?

'काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच 'तो' 'अच्छे दिन'चे अनुभव घेणार, असं दिसतंय. साक्षात ब्रह्मदेव त्याला समजावायला आला तरी, त्याच्या विचारात बदल होणार नाही.'
Rural Communication
Rural CommunicationAgrowon

काल माझा एक मित्र, त्याच्या मुलासोबत अचानक भेटला. त्याचा मुलगा मोठ्या मुश्किलीनं दहावी (10 Standard Pass) पास झालाय. त्याला विचारलं, तू दहावी पास म्हणजे नेमकं काय मिळवलंस? तो माझ्या तोंडाकडं बघू लागला.

मी म्हटलं, तुला काय येतंय? पुन्हा तोंडाकडं बघू लागला. मी म्हटलं, रेशन कार्ड (Ration Card) मिळवण्यासाठी एक अर्ज (Writing Application) लिहून दाखव. तो पटकन बोलला, रेशनकार्ड हाय आमचं.

मी म्हटलं, मराठी विषयात (Marathi Subject) किती मार्क पडले? मऱ्हाटीत व्हय- ३८. पहिलीपासून दहावीपर्यंत मराठीत तू किती कविता (Marathi Poem) शिकल्यात? तो शांत. एक तरी कविता तुला पाठ आहे का? तो बोलला, परीक्षा (Exam) होईपर्यंत पाठ होती. आता नाही.

मी म्हटलं, भूगोलात (Geography) तू काय शिकलास? तो बोलला- नद्या (River), डोंगर (Mountain), पिकं (Crop), पाणी (Water) .
मराठवाड्यातील तीन नद्यांची नावं सांग? मी विचारलं.
मांजरा... (Manjara River) म्हणून तो थांबला. मी विद्युत निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्रातील धरणाचं नाव विचारलं. मुलगा गप्पच.

मी विचार केला, इतिहास आणि गणितातले दोन-दोन प्रश्न विचारावेत. पण त्याच्या बापालाच त्याची दया आली.

तो म्हणाला, ‘‘बस झालं की. कळलं पोरगं किती शिकलंय ते?‘‘ शिक्षणाचा मुख्य हेतू ज्ञानप्राप्ती हा सांगितला जातो. दहावी, बारावी, बी.ए. अथवा एम.ए.ची पदवी घेणारा ज्ञानी होतो का? तो माहितगार तरी होतो का?

शिक्षणाने हा हेतू तरी साध्य केलाय का? याचे उत्तर नकारार्थी येत असेल तर, हे शिक्षण कशासाठी द्यायचे किंवा घ्यायचे? हा प्रश्न विचारलाच पाहिजे. त्याचे उत्तर मिळत नसेल तर, ते शिक्षण म्हणजे सरळ पैशाचा आणि वेळेचा अपव्यय आहे.

मी माझ्या मित्राला विचारलं, ‘‘पुढे काय शिकवणार आहेस मुलाला?‘‘
तो बोलला, ‘‘पोरगं कॉलेजला जायचं म्हणतंय.‘‘
‘‘ कशाला?‘‘
‘‘ शिकायला.‘‘
‘‘ काय शिकायला?‘‘
‘‘ बी.ए. करायचं म्हणतोय.‘‘
‘‘ कशासाठी?‘‘
‘‘ ते काही माहित नाही.‘‘
‘‘ बी.ए. कशासाठी करायचं म्हणतयं ते पोराला विचार.‘‘
‘‘ विचारलो. बघू तेव्हाच्या तेव्हा म्हणतोय.‘‘
‘‘ त्याला काहीतर कामाचं शिकव. तुझे पैसे आणि वेळ वाया घालतंय बघ.‘‘
‘‘ मग काय घरी बसवून ठेऊ का आतापासून? त्याचं पुढचं सगळंच राहिलंय.‘‘
‘‘ बघू, शिकंल तवर शिकंल.‘‘
‘‘ तू चूक करतोयस बघ.‘‘
‘‘ आता लई झालं बघ दोस्ता. या विषयावर बोलणं नको. डोस्कं खराब झालंय. त्यांचं काय व्हायचं ते होऊ दे. कोणी काही जन्माला पुरत नाही. त्याचं नशीब त्याच्या बरोबर. त्यांची मी नाही चिंता करणार!‘‘

Rural Communication
Sudhir Mungantiwar : नागपुरात १०० एकरांवर ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र

ओळखीतला एक जण आहे. तो एम.कॉम. झाला. मोठ्या मुश्किलीनं नोकरीला लागला. एका पतसंस्थेत महिना सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय. त्याच्या कामाचं स्वरूप आहे. हरकाम्या.

दुसरा तो एम.ए., बी.एड. झाला. दहा वर्षांपूर्वी एका संस्थाचालकाला दहा लाख रूपये देऊन तो शिक्षक बनला. दहा वर्षे झाली खिशातनं पेट्रोल घालून त्यानं शाळा केली.

उरलेल्या वेळेत पानपट्टी चालवली म्हणून त्याचं घर भागलं. आता त्यांची शाळा २५ टक्के अनुदानात आलीय. त्याच्या आयुष्यातला उमेदीचा काळ फुकट नोकरी करण्यात गेला.

तरीही तो खूष आहे. पंधराव्या वर्षी का होईना, त्याला पूर्ण पगार मिळेल. अशी उदाहरणं आजुबाजूला कितीतरी आहेत.

तोंडावर कसलीच रया नसलेले, पण आपण कोणीतरी आहोत असा समज करून जगणारे तरूण सगळीकडे दिसतात.

तोंडात काही तरी मचमच चालू असलेले. कोणी एम.ए. कोणी बी.ए., बी.एड., डी.एड. तर कोणी पॉलिटेक्निक तर कोणी बी.ई. झालेले. असे तरूण गावोगाव शेकड्यांनी आहेत.

अपवाद वगळले तर, सगळेच व्यसनांच्या अधिन. तंबाकु, गुटखा, सिगारेट, गांजा, दारू यातच यांचा दिवस जातो. ज्यांच्या बापाची आर्थिक स्थिती चांगली आहे, ती पोरं बापाच्या जीवावर मजा करताहेत. मजा म्हणजे काय तर हेच गुटखा, गांजा, दारू....

ही पोरं काहीच काम करीत नाहीत. या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय. ती मिळणं शक्यचं नाही. शेतीकडं यावं अशी स्थिती नाही.

शिवाय शेतीत ढोर मेहनत करावी लागते. त्यामुळं ही पोरं आयुष्यभर अशीच जगतील. बेकार हा शिक्का कपाळी घेऊन मरतील.

माझ्या समोर गावात तिशीच्या आतील सात-आठ तरूण दारू पिऊन मेले. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्या मुलांची लग्न झालीत. त्यांना लेकरं झालीत. त्यांचं जीवितकार्य संपलं.

वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची, त्यांची लग्न रखडलीत. लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय. ती चिंता विसरायला गांजा आणि दारू हेच औषध.

ग्रामीण भागात शारीरिक कष्टाची कामं सोडली तर, दुसरी कुठलीच कामं नाहीत. या पोरांची अशी कामं करण्याची क्षमता नाही, इच्छाशक्तीही नाही. ही पोरं म्हणजे बापांसाठी ब्याद आहेत.

धरलं की चावतयं, सोडलं की पळतयं, अशी बापांची अवस्था आहे. सगळे बाप कदरून गेलेत. माझ्या एका मित्रानं, व्यसनी पोराच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी, त्याच्या खुनाचा घाट घातला होता.

ऐनवेळी रिक्षावाला तयार झाला नाही म्हणून तो प्लॅन अंमलात आला नाही. मित्रानं स्वत: हा किस्सा सांगितला, तेव्हा मी हादरून गेलो.

Rural Communication
Communication : संवाद वाढवा

परिस्थितीनं गांजून गेला की, माणूस किती टोकाला जाऊ शकतो, याचं हे उदाहरण. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा-काहीतरी करायला हवं रे बाळ.

तो म्हणतो, काय करू ते सांगा काका. यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या, पानपट्ट्या आहेत.

त्यातील काहींचं बरं चाललंय. अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही. अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला, दुकानदाराला बोला. तो म्हणतो की, गिऱ्हाईकच नाही, मालाला उठाव नाही.

अनेकांनी नोकर कमी केलेत. नवा एकही रोजगार नाही. असं एकही क्षेत्र नाही, जिथं या पदवीधारकांना संधी आहे. कारकुनी कामंच राहिली नाहीत. सगळीकडं ठप्प आहे.

तरीही देशभरात दरवर्षी लाखो, करोडो मुलं दहावी, बारावी, पदवी, पदव्यूत्तरची कागदं घेऊन बाहेर पडताहेत. सगळ्यांना माहित आहे, नोकरी मिळणार नाही.

तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय. या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही, कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड.

‘आपण कोणीतरी आहोत' या आभासात रमायला आहे मोबाईल डाटा आणि दारू,गांजा. तो यांना वास्तवाची कधीच जाणीव करून देत नाही.

आपलं भवितव्य काय? याचं कोणाकडंच उत्तर नाही. तरीही समाजात सगळं काही सुरळीत सुरू आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, मी परवा पतसंस्थेतल्या त्या एम.कॉम. मित्राला सहज भेटलो. तो बोलला, ‘‘बाकी काही असो बघा, देशाला मजबूत सरकार मिळालं.

काश्मिरचं ३७० कलम हटविलं सरकारनं. आता समान नागरी कायदा आणला की, देशाची गाडी रूळावर येईल. मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय...''

मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही. त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.

काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो 'अच्छे दिन'चे अनूभव घेणार, असं दिसतंय. साक्षात ब्रह्मदेव त्याला समजावायला आला तरी, त्याच्या विचारात बदल होणार नाही.

देशाचं भवितव्य आता लिहलं गेलंय. सध्या फक्त वाट बघायची, लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्याची...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com