
शेतीची मशागत करताना येणाऱ्या अडचणी, उत्पादन खर्चात होणारी वाढ आणि जमिनीची घटत चाललेली सुपिकता (Fertility) या सर्व समस्यांचे समाधान होऊन शेतकऱ्यास देखील समाधान मिळण्यासाठी आणि लागवड खर्चात बचत करून जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञानाची (Zero Tillage Technology) आवश्यकता आहे.
शून्य मशागत तंत्रज्ञानाचा उद्देश
- प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आलेल्या गाव समुहातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
- प्रकल्प क्षेत्रामध्ये शून्य मशागत (एसआरटी) तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करणे.
- जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता वाढविणे.
- पावसातील खंड तसेच अतिपाऊस या दोन्ही परिस्थितीत अनुक्रमे पाण्याचा ताण सहन करण्यासाठी आणि अति पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे.
- शून्य मशागत (एसआरटी) तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यास मदत करणे .
सगुणा राईस तंत्र (एसआरटी)
संवर्धित शेती पद्धतीचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी विकसित केलेले तंत्र म्हणजे "शून्य मशागत तंत्र" होय. संवर्धित शेती करण्यासाठी राज्यात कोल्हापूर येथील प्रगत शेतकरी आणि कृषितज्ञ श्री. प्रतापराव चिपळूणकर यांनी स्वतःच्या शेतीतील प्रयोगातून विना नांगरणीची शेती सिद्ध करून दाखवली आहे.संवर्धित शेतीचे शास्त्रीय विश्लेषण करताना त्यांनी जमिनीच्या सुपिकतेचे आणि विशेष करून सेंद्रिय कर्बाचे महत्व अधोरेखित केले आहे.
⦁ कृषीरत्न श्री चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी सगुणा बाग, ता. कर्जत, जि. रायगड येथे भात पिकावर आधारित पीक पद्धतीकरिता शून्य मशागतीसाठी उपयुक्त म्हणून सगुणा राईस तंत्र (एसआरटी) विकसित केले आहे.
⦁ एसआरटी तंत्रामध्ये आणि विना नांगरणीच्या शेतीमध्ये सुरवातीलाच गादी वाफ्यावर पिकांची लागवड केली जाते व नंतर गादीवाफे न मोडता आणि कोणतीही मशागत म्हणजेच नांगरणी, कुळवणी, वखरणी न करता तसेच पाभरीने पेरणी न करता पुढील पिकांची टोकण पद्धतीने लागवड केली जाते.
⦁ तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निंदणी, भांगलणी किंवा कोळपणी न करता तणनाशकांचा वापर केला जातो.
⦁ पिकांची काढणी करताना पिके जमिनीलगत कापून घेतली जातात आणि खोडाचे अवशेष (सड), धसकटे व मुळे तशीच ठेवली जातात.
⦁ पिके किंवा तणे मुळासकट उपटून काढली जात नाहीत त्यामुळे पिकांची व तणांची मुळे जमिनीत राहतात, कुजतात आणि त्यापासून सेंद्रिय खत तयार होते.
⦁ शून्य मशागत तंत्र राज्यातील भात, सोयाबीन, कापूस, मका, सुर्यफुल, हरभरा, झेंडू इ. पिकांसाठी फायदेशीर असल्याचा प्रयोगशील शेतकऱ्यांना अनुभव येत आहे.
⦁ सदर तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, इतर तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, हरभरा, इतर कडधान्ये, भुईमूग, सुर्यफुल, मोहरी, जवस, तीळ, इतर तेलबिया, कांदा, भाजीपाला, फुलपिके, औषधी व सुगंधी पिकांची लागवड करणे शक्य आहे. हळद, आले, बटाटा, रताळे, गाजर अशा पिकांचा जमिनीखाली वाढणारा बहुतांशी भाग काढण्यासाठी जमिनीची मोठी खांदणी करावी लागत असल्याने या पिकांमध्ये शून्य मशागत तंत्र वापरण्यावर काही मर्यादा आहेत.
शून्य मशागत तंत्रज्ञानाची आवश्यकता
⦁ कोणत्याही पिकाच्या पेरणीपूर्वी मशागत झालीच पाहिजे ही शेतीतील परंपरा आहे.
⦁ बैलाची वर्षभर जोपासना करून भर उन्हाळ्यात पूर्व मशागतीच्या कष्टदायक कामात शेतकरी गुंतलेला दिसतो.
⦁ नांगरणे, ढेकळे फोडणे, दिंड किंवा कुळवाच्या पाळ्या मारून माती बारीक करणे, सपाट करणे वखरणी, कोळपणी अशा प्रकारची मशागतीची कामे हा शेतकऱ्याच्या जबाबदारीचा भागच बनला आहे.
⦁ पुढे पूर्वमशागतीची अति कष्टाची कामे ट्रॅक्टरने तर कमी कष्टाची कामे बैलांकडून अशी विभागणी झाली.
⦁ अतिमशागतीमुळे जमिनीमध्ये दीड-दोन फुटाखाली कडकपणा येऊन जमिनीची नैसर्गिक रचना बिघडत चालली आहे.
⦁ वारंवार जमीनीची मशागत केल्याने मातीची सारखी हलवाहलव होऊन खालच्या थरातील माती वर येते व या मातीवर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आणि उष्णतेमुळे प्रतिकूल परिणाम होतो .
⦁ सर्वप्रथम तापलेल्या मातीतील सेंद्रिय कर्ब हवेत उडून जाण्याची प्रक्रिया सुरु होते आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
⦁ सेंद्रिय पदार्थ कमी झाल्याने मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडूळासारख्या उपयुक्त प्राण्यांची उपासमार होऊन त्यांचे प्रमाण घटत जाते.
⦁ मशागतीच्या कामासाठी नेहमीच दुसऱ्यांवर कधी बैलांसाठी, कधी मजुरांसाठी तर कधी ट्रॅक्टरसाठी अवलंबून राहावे लागत असल्यामुळे शेतीची कामे वेळेत होण्यास अडचणी निर्माण होतात.
⦁ पिकाच्या लागवड खर्चामध्ये मशागतीचा खर्च निम्म्याहून अधिक असून दिवसेदिवस मशागतीच्या खर्चामध्ये वाढ होत आहे, परिणामी लागवड खर्च देखील वाढत आहे.
⦁ ट्रॅक्टरचलित औजारांच्या अतिवापरामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनत आहे आणि वातावरणातील तापमान वाढीस देखील कारणीभूत ठरत आहे.
स्त्रोत ः शून्य मशागत तंत्र पुस्तिका ः विजय कोळेकर कृषी विद्यावेत्ता, पोकरा, मुंबई
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.