मराठवाड्यात मोसंबीतील 'मर' वाढीस

शेतकऱ्यांसमोर बागा वाचविण्याचे संकट
मराठवाड्यात मोसंबीतील 'मर' वाढीस
Sweet LimeAgrowon

औरंगाबाद : मोसंबीचे आगर (Sweet Lime Hub) असलेल्या मराठवाड्यातील मोसंबी बागांमध्ये ‘मर’ चे प्रमाण (Mosambi Wilt Disease) वाढीस लागेल आहे. जालना जिल्ह्यातील रामगव्हाण येथील रोहिदास मोहिते यांच्या बागेतील बहार आलेली अनेक झाडे केवळ महिनाभरात गेली. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आपल्या बागा वाचविण्याचे संकट उभे ठाकले आहे.

मराठवाड्यातील जवळपास ४९ हजार हेक्‍टरवर मोसंबीच्या बागा आहेत. औरंगाबाद, जालना, बीड आदी जिल्ह्यांतील गोदावरीच्या पट्ट्यात खासकरून मोसंबी फळबागांचे क्षेत्र विस्तारलेले आहे. ‘राजा’ पीक असलेल्या या मोसंबी बागांवर अलीकडे ‘मर’ चे संकट चांगलेच घोंगावते आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका अंतर्गत रामगव्हाण येथील रोहिदास मोहिते यांच्या बागेतील अनेक झाडे जवळपास महिनाभरातच ‘मर’ ची शिकार झाली आहेत. तालुका कृषी अधिकारी रोडे यांनी या बागेची प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रकार नेमका कशाने झाला? या विषयी मोसंबी संशोधन केंद्राच्या प्रमुखांसह कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत केली.

‘‘अडीच एकरात २०१४ मध्ये जवळपास ५०० झाडांची लागवड केली होती. गेल्या वर्षीही बाग ५ लाखाला तर त्या आधी दहा लाखांना विकली गेली होती. यंदा मे पर्यंत बागेतील झाडांवर आंबिया बहराची फळे लगडलेली होती. परंतु दोन-चार झाडे जाण्यापुरती मर्यादित असलेली मर मोठ्या प्रमाणात वाढून आता ६० ते ७० झाडेच बागेत शिल्लक असल्याची स्थिती आहे. गावातील इतरही एका शेतकऱ्याची शंभरावर झाडे अशाच प्रकारे गेली आहेत,’’ असे मोहिते यांनी सांगितले.

मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘‘एका बहराची भरपूर फळे झाडावर असताना पुन्हा मृगासाठी मोसंबी बागा ताणावर सोडल्याने झाडे सुकण्याचे प्रमाण मराठवाड्यात वाढीस लागले आहे. प्रत्येक बागेतील ५ ते १० झाडे ‘मर’ला दरवर्षी बळी पडतात. फळधारणा घेण्यासाठी मोसंबी झाडांची कायिक वाढ पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. वाढ पूर्ण न होता बाग ताणावर सोडणे, फळे धरणे, एका बहराची फळे झाडावर असताना दुसरा बहर घेणे हे नुकसानकारक ठरते.’’

दोन बहर, फळसंख्या जादा नुकसानकारक

‘‘झाडे सुकण्यास सुरुवात झाल्याबरोबर झाडावरील सर्व फळे ताबडतोब तोडून बुरशीनाशकाची आळवणी करणे फायदेशीर ठरते. जवळ लागवड, दोन बहर, रासायनिक खतांची, सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता, झाडावर वेलींमुळे प्रकाश संश्लेषण कमी, फळसंख्या जादा, खोडांना इजा, जादा पाण्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव आदींमुळे झाडे ‘मर’ला बळी पडतात,’’ असेही डॉ. पाटील म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com