
- कल्पना दुधाळ
मधल्या वाटंनं मी चालत घरी येत होते. या वाटंच्या दोन्ही बाजूंनी तुरळक घरं आहेत. सकाळची कामं आवरून कुणी बाहेर कामाधंद्याला, कुणी रानात जातात. मग घरातली वयस्कर माणसं घरदार, पोरंसोरं सांभाळतात, गुराढोरांचं वैरणपाणी करतात, कोंबड्या कुत्र्यांकडं लक्ष ठेवतात. या वस्तीवर कुणी ना कुणी ओळखीचं भेटतं. मग इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा होतात. चहापाणी होतं. आज सुमनआत्या करंजाच्या झाडाखाली चटई टाकून बसलेल्या दिसल्या म्हणून सहज विचारलं,
काय आत्या बरं चाललंय ना ?
कशाचं बरं न् कशाचं वाईट बाई. बेजार केलं बघ या दुखण्यानं.
काय झालं ?
अगं बाई, हे गुडघं जागचं हलू देईनात बघ. ह्यो डाव्या पायाचा गुडघा जरा कमी पण उजव्यानं जीव नको नको केलाय. एकीकडं हे गुडघ्याचं दुखणं. दुसरीकडं मणक्याचा ठणकापण चालूचंय.
एकतर सुमनआत्या दुखण्याला वैतागल्या होत्या. त्यात दोन अडीच वर्षाचा नातू घडीभरसुद्धा थांबायचं नाव घेत नव्हता. त्याला नवे पाय फुटले होते. पोरगा, सून रानात गेल्यावर दिवसभर त्या बारक्याला सांभाळताना त्यांच्या नाकी नऊ येत होते. आता नुकतंच त्याला झोपवून जरा बसल्या होत्या. त्या सांगत होत्या,
गुडघ्याला किती पैसं घालवलं. फोटू काढलं. मलमं थापली. गोळ्या गिळल्या.
मग काही फरक पडला नाही का अजून ?
आत्या पुढं सांगत होत्या तोवर सदाआबा खोकत घरातनं बाहेर आले. म्हणाले, इतक्या उन्हाचं कुठं गेली होतीस बाई ? उन्हातान्हाचं जरा दम खात जावा माणसानं. उन मी म्हणतंय.
दम खायलाच घरी चालले आबा. तुमची तब्येत कशी काय ?
त्यांच्या तब्येतीचंपण काही विचारू नको बघ. रोज नवंच काहीतरी पुढं येतंय. अगोदर कधी चटणीभाकर येळंवर मिळाली नाही आन् आता डाक्टर म्हणतोय, साखर वाढली. कामं करू करू मेलो तेव्हा, कधी गोडाधोडाची गाठ पडली नाही. चहालासुद्धा साखर नसायची तेव्हा. आता आधी बिनसाखरंचा चहा करून घ्यायचा मग बाकिच्यांना साखरंचा चहा करायचा. ह्यांला तर तसला सपाक चहा घोटत नाय. हे खाऊ नका, ते खाऊ नका. अजून ते बीपी का डीपी काय म्हणतेत ते वाढतंय नायतर कमी होतंय. सुमनआत्यांला मधेच थांबवत सदाआबा म्हणाले,
अगं मला बोलून देती का सगळं तूच सांगून टाकती.
सांगा की मग. मी कुठं नका सांगू म्हणलं. सांगा सांगा मी सांगतेय तर पटंना ना तुम्हाला. जसंकाय मी खोटंच सांगतेय. आता तुम्ही खरंखरं सांगा.
सुमनआत्या आणि सदाआबांचा शब्दावरनं शब्द वाढायला लागला. तसं मी म्हणलं, आबा तुम्ही कुठं दिसत नाय सध्या येताजाता.
कशाचं काय ? आत्ता घडीभर बरं वाटतंय की थोड्यावेळानं दुसरंच कायतरी होतंय. त्याच्यामुळं कुठं येत नाय, जात नाय. आपुण भलं न आपलं घर भलं. पायाला भिंगरी लावून फिरायचो आधी. पण कालचा दिवस आज नाही राहिला बाई आमचा.
सुमनआत्या पुन्हा सांगायला लागली, लै कष्ट केलंय बाई आम्ही दोघांनी. मरणाची कामं केलीत. गुडघं झीजलं असतील, नाय तर काय. ह्यांनी खांदून द्यायचं. मी डोक्यावर माती वाहून टाकायची. सगळ्या शिवारात ताली घातल्या आम्ही. दहा दहा परोस हिरीची कामं केली. रस्त्याच्या चा-या खणल्या. गड्याबरोबर कामं करायचे मी. गड्याचा रोजगार पाडायचे बाई. तव्हा कधी दवाखाना बघितला नाही. आता बसून सुखासुखी खायचं दिवस आलेत तर दुखण्यानं नको नको केलंय आम्हाला. काय करावं न् काय नाय ?
मी म्हणलं, कालचं दिवस तरी कुठं सुखाचं होतं ?
आबा सांगायला लागलं, तसं नाय. कालचं दिवस कष्टाचं होतं. कामानं जीव शीणायचा. पण थकलंभागलं तरी जरा इसावा घेतला की पुन्हा कामाधंद्याला उल्हास वाटायचा. अंगात ताकद होती. आता आपणच आपल्याला जड झालोय म्हणायचं. सगळं ध्यान दुखण्यावर लागतं. आपलं शरीर साथ देईना. बारीकसारीक गोष्टींचा कुणावर ना कुणावर राग निघतो. मग ते म्हणतेत, म्हाता-याचं पार डोकं फिरलंय.
आत्याबाई म्हणाल्या, त्यांच्यामागं त्यांचं व्यापताप असतेत. आता आपल्याच्यानं नाय होत तर सोडून द्यायचं. गप बसायचं. त्यांचं ते चट आदबतेत, करतेत. उगं असंच करा न् तसंच करा सांगितलं की त्यांला येतो राग. आपली दुखणी आपल्यासंगं येणार. तोवर होईल तेवढं औषधपाणी करायचं. आपली पैशाची तारांबळ असती. आपलं कशाचं मोठं येणंय का काही ? यंदा कांद्याचं पैसं होत्याण अशी आशा होती तर कांद्यानं पार बुडवलं, पार मातीत घातलं बघ. त्यात पाण्याचं ह्ये आसं. तरकारीवर चालतंय कसंतरी आपलं. त्यांनी काय आपल्याला टाकून दिलंय का ? आपल्या दुखण्यासाठी पोराला काय वावरं इकायला लावायची का बाई ?
आत्या भडाभडा बोलत होत्या. त्यांना काय सांगावं ते मलापण कळंना. म्हणलं, आत्या घरी लै कामं पडलेत. उशीर होतोय. निघते मी.
आत्या म्हणाल्या, अगं थांब चहा ठेवते.
नको नको घरी जाऊन जेवायचंय. जाते मी.
बरं बाई जा. येत जा अधनंमधनं. तेवढंच बरं वाटतं.
होय होय.
पुढं निघाले. विचार करत होते की, काय बोलावं ते कळेना झालं की माणसं असंच सटकायचं बघतात. सदाआबा म्हणतेत तसं कालचं दिवस कष्टाचं होतं तरी त्यात आनंद होता. कितीपण कष्ट करायची ताकद होती. आज ना ताकद राहिली ना उल्हास राहिला. अशा किती सुमनआत्या, सदाआबा थोड्याफार फरकाने घरोघरी दुखण्याभाण्याचं पाढं वाचत असतात. घरातली बाकीची माणसं रोज उठताबसता यांची गा-हाणी ऐकून जाम होतात आणि म्हाता-यांना वाटतं आमचं कुणी ऐकत नाही. वय वाढेल तसं कुणाला मणक्याचं दुखणं, पाठीचं दुखणं, कुणाला दमा, कुणाला काय तर कुणाला काय उद्भवतं. पण कितीतरी माणसं परिस्थितीकडं बघून दवाखान्याचं नावसुद्धा काढत नाहीत.
काहीजण वय झालं म्हणून सहन करतात. काहींचा अडाणीपणा असतो. काहीजण दुखण्याला आपले भोग मानतात. काही सहन करत करत एखाद्या दिवशी मरून जातात. काही मात्र औषधोपचार, पथ्यपाणी, व्यायाम करतात. काही दवाखान्याच्या पैशांकडं बघून मेडिकलमधून वेदनाशामक गोळ्या औषधं घेतात. खाजगी दवाखान्यात साधं सर्दी, पडशासाठी गेलं तरी शेदिडशे रूपये सहज द्यावे लागतात. सरकारी दवाखान्यात कमी खर्च होतो खरा पण तिथल्या अडचणी अजून वेगळ्या असतात. कधी नावंपण न ऐकलेले आजार आज घरोघरी माणसांना होऊ लागलेत. आधीची माणसं म्हणायची, गरिबाघरी आजार येत नाहीत. पण आजार काही परिस्थिती बघून होतो का ?
हवामान इतकं बदलतंय की सकाळी थंडी, दुपारी कडक उन, संध्याकाळी पाऊस. अशा हवमानाचा माणसांच्या आरोग्यावर परिणाम होतोच की. हायब्रीडमधे कस नाही म्हणून आजार वाढलेत, रासायनिक खतं औषधांमुळे माणसांची प्रतिकारशक्ती कमी होतेय असं काही काही म्हणत आपण मनाची समजूत काढतो. घरोघरी प्रत्येकाचे आजार वेगळे. औषधं वेगळी. आता दुखणं काही कुणाचं वयपण बघत नाही. एखादं कुणी भेटलं तर जेवण केलं का म्हणायच्याऐवजी गोळ्या खाल्ल्या का विचारतं. वरचेवर धडधाकट माणसं कमी होत चाललीत. आता रानात गेल्यावर कुठल्या विहीरीचं पाणी घेऊन पिलंय असं नाहीच.
एखाद्या वेळेस घोटभर पाणी पिलं तरी घसा दुखतोय, ताप येतोय. कुठंपण जाताना फिल्टरचं पाणी बरोबर न्यावं लागतं. एक काळ होता, रानात जिथं पाणी दिसंल तिथं माणसं पाणी प्यायची. रासायनिक खता-औषधांशिवाय शेती केली जायची हे सांगितलं तर खोटं वाटेल. आता पुन्हा सेंद्रिय शेतीचे दिवस येत आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती बदलतेय.
सदाआबा म्हणतेत तसं कालचा दिवस आज नाही. आजचा दिवस उद्या नाही. हे फक्त माणसांच्या आरोग्यापुरतं, शेतीपुरतं मर्यादित नाही. निसर्ग घडोघडी बदलतो, बदलायला लावतो. कालच्या दिवशी करायच्या राहिलेल्या गोष्टी करण्यासाठी आजचा दिवस येतो. पण प्रत्येकाचा आजचा दिवस सारखा नसतो. कुणाचा सुखाचा, कुणाचा दुःखाचा असतो. हे काळाचे चक्र सतत नव्या नव्या गोष्टी आणतं. त्यांना जूनं करतं. नष्ट करतं. दुसरं नवं आणतं. तेही नष्ट करतं. आजचा दिवस गुंडाळून निघून जातं. त्याला कालचा दिवस करतं. रोज नवा