शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचे आहे : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

विरोधक हा शब्द कुणी आणला, याचे संशोधन केले पाहिजे. इथे आपण सर्वच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी जर आलेले असू, तर मग विरोधक आणि सत्ताधारी असे वेगवेगळे का? - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  : मी नशीबवान आणि भाग्यवान मुख्यमंत्री आहे. जे २५ वर्षे विरोधात होते, ते आज मित्र आहेत. जे २५ वर्षे मित्र होते, ते आता विरोधक झाले आहेत. मी इथे येईन असे मी कधीच बोललो नव्हतो. तरीही मला इथे यावे लागले. आता आलो आहे तर आपल्याला जनतेची कामे करावी लागतील. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल, सातबारा उतारा कोरा करावा लागेल, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत केले.

श्री. ठाकरे रविवारी (ता. १) विधानसभेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. 

या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस तुमचे अभिनंदन; कारण माझा मित्र तिथे बसला आहे. पण, आज जर तुम्ही माझ्यासोबत असता ना, तर मी हा सर्व कारभार टीव्हीवर बसून बघितला असता. गेल्या पाच वर्षांत मी सरकारला दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्या चांगल्या कामाआड माझी शिवसेना, माझा पक्ष येऊ दिला नाही. तेव्हाचे सर्व सहकारी आजही माझ्यासोबत आहे. त्यांनाही मी सक्त ताकीद दिली होती. जे बोलायचे ते स्पष्ट बोलायचे कपट, कारस्थान आणि काळोखात काही बोलायचे नाही. जेव्हा युती नव्हती तेव्हा आम्ही विरोधात होतो. त्या वेळीही आमचे हिंदुत्व होते, आजही आहे; कालही होते आणि उद्याही ते राहील. पण त्या हिंदुत्वामध्ये दिलेला शब्द पाळणे हेसुद्धा माझे हिंदुत्व आहे. ‘जय श्रीराम’ म्हणायचे आणि दिलेले वचन तोडायचे हे माझे हिंदुत्व नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान लगावला.

आपण गेली २० ते २५ वर्षे एकत्र आहोत. आपला परिचय आज माझ्या हातात आला. तो आधी असता तर बरे झाले असते. कारण, या दिवसाची, या नात्याची मला अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले. एका दृष्टीने पाहिले तर मी आत्तापर्यंतचा नशीबवान किंवा भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण जे २५ ते ३० वर्षे विरोधात होते ते माझे मित्र झालेत, आणि जे मित्र होते ते विरोधात बसलेत. म्हणून प्रामाणिकपणे वाटते की विरोधी पक्ष अस्तित्वात राहणार नाही, कारण विरोधी पक्ष माझे मित्र आहेत, असे श्री. ठाकरे म्हणाले.

ज्या महापुरुषांच्या तसबिरी येथे लावलेल्या आहेत. जर त्यांची नावे सभागृहात घ्यायची नसतील, तर मग ते महापुरुष तसबिरीतून काय विचार करत असतील, असेही श्री. ठाकरे म्हणाले. इतके दिग्गज सभागृहात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मित्र माझ्यासमोर आहेत. देवेंद्र फडणवीस यांची मैत्री मी कधीच लपवलेली नाही. ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील, त्यात कधीही अंतर पडणार नाही. सत्ताधारी आणि विरोधक हे दोन विरुद्ध शब्द न राहता इथे लावलेल्या महापुरुषांच्या ज्या तसबिरी आहेत, त्यांचा वारसा पुढे न्यायचे काम आपल्याला इथे करायचे आहे. देवेंद्रजी मी आपल्याला विरोधी पक्षनेता म्हणणार नाही, तर या सभागृहातील एक जबाबदार नेता म्हणून मी आपल्याकडे पाहील, असे श्री. ठाकरे म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com