agrowon marathi agralekh on failure of group farming scheem | Agrowon

गटशेती योजना का फसली?
विजय सुकळकर
मंगळवार, 8 मे 2018

गटशेती योजनेसाठी जिल्हानिहाय एखाद्या सेवाभावी संस्थेला शासनाने फॅसिलीटेटर म्हणून नेमले असते, तरी योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली असती.

सद्यपरिस्थितीत शेतीतील अनेक समस्यांवर मात करून यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी गट-समूह शेतीची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेद्वारे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी निविष्ठांची निर्मिती, त्यांचा गटातील शेतकऱ्यांना पुरवठा ते उत्पादित शेतीमालाची थेट विक्री, मूल्यवर्धन आणि निर्यात अशा बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजमधील सर्व कामे करणे अपेक्षित आहे. गटशेतीचा मूळ उद्देश ज्यांना खरोखरच समजला असून, अपेक्षित ध्येय गाठण्याचे ज्यांनी चिकाटीने प्रयत्न केले, त्यात सातत्य ठेवले, असे काही गट राज्यात यशस्वी झाले आहेत. बाकी केवळ शासकीय अनुदान, योजनांचा लाभ घेण्यासाठी तयार झालेले शेतकऱ्यांचे गट हे कागदावरच शोभून दिसत आहेत. शासनाचा मानससुद्धा वैयक्तिक शेतकऱ्यांवर फोकस करण्यापेक्षा गटांवर फोकस करण्याचा आहे. त्यामुळेच अनेक योजना, उपक्रम गटशेतीच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे असताना राज्यात गटशेती योजना सपशेल फसल्याचे चित्र आहे. गटशेती अनुदान योजनेसाठी राज्य सरकारने ३१ कोटी रुपये कृषी खात्याला दिले होते; परंतु कृषी विभाग केवळ तीन कोटी रुपये अनुदानवाटप करू शकले असून, बाकी रक्कम त्यांना शासनाला परत करावी लागली. यावरून गटशेतीमध्ये आघाडीवरच्या आपल्या राज्यात ही चळवळ मागे पडत असल्याचे दिसून येते.

गटशेतीच्या बाबतीत एकीकडे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, मुख्य सचिव आणि राज्यभरातील कृषीचे अधिकारी यांच्यामध्ये सर्वसामान्य समज तसेच समन्वयाचा अभाव दिसून येतो. तर दुसरीकडे योजनेबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये प्रसार-प्रचारच केला नाही, त्यामुळे अनेक चांगले गट इच्छुक असूनही प्रस्ताव सादर करू शकले नाही. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात किमान दोन गट तयार करून एका गटाला एक कोटीचे अनुदान देण्याच्या या नव्या योजनेत शेतकऱ्यांनीच व्यावसायिक प्रस्ताव तयार करून सादर करावयाचे होते, तसेच त्यांच्या मंजुरीचे काम आत्मा यंत्रणेकडे सोपविण्यात आले होते आणि इथेच योजना फसली. व्यावसायिक प्रस्ताव जिल्हानिहाय काही गटांनी सादर केलेत; परंतु त्यातील अनेक त्रुटींनी ते नामंजूर झाले आहेत. आत्माचे कर्मचारीसुद्धा मंजुरीच्या किचकट प्रक्रियेने गोंधळून गेले. शासनाने युनिटनिहाय आदर्श प्रस्ताव तयार करून त्यात स्थानिक परिस्थितीनुरूप आवश्यक बदल करून शेतकऱ्यांच्या गटांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असते, तर बहुतांश प्रस्ताव मंजूर झाले असते.

गंभीर बाब म्हणजे या योजनेतील अनेक निकष व अटी योजनेचा लाभ बहुतांश गटांना मिळूच नयेत, अशा आहेत. शासनाच्या बहुतांश नवीन योजनेत, उपक्रमात एखादा ‘फॅसिलीटेटर’ (सेवा-सुविधा पुरविणारा) असतो. गटशेती योजनेसाठी जिल्हानिहाय एखाद्या सेवाभावी संस्थेला शासनाने फॅसिलीटेटर म्हणून नेमले असते, तरी योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली असती. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खर्च वाचतो तसेच त्याचे उत्पादन वाढून त्याचे रूपांतर अधिक उत्पन्नात होते, अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी राज्यात सुरू झालेल्या या चळवळीस ब्रेक लागता कामा नये. या योजनेतील किचकट नियम, निकष दूर करुन अनुदानाची प्रक्रिया अधिक सुलभ व्हायला हवी. महत्त्वाचे म्हणजे अंमलबजावणीची जबाबदारी एखाद्या संस्था-व्यक्तीवर निश्चित केल्यास राज्यात ही योजना यशस्वी होईल, हे लक्षात घ्यायला हवे.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...