व्यापारयुद्धातील संधी

चीनने आयातकर लावल्याने शेतमालाची निर्यात अमेरिकेला महाग पडेल. अशावेळी कापूस सोयापेंड आदी शेतमालाची चीनमध्ये निर्यात वाढविण्याची चांगली संधी आपल्याला लाभली आहे.
sampadkiya
sampadkiya

आपल्या देशातील मालास परदेशांतील बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात. त्या मालास चांगली किंमत मिळावी. जागतिक बाजारात इतर देशांच्या स्पर्धेत आपला माल आघाडीवर राहावा, यासाठी सर्वच देशांचा प्रयत्न असतो. या व्यापारी स्पर्धेतून पूर्वी युद्धे, महायुद्धे भडकली आहेत. खुल्या आर्थिक धोरणाने जागतिक व्यापारातील अडथळे कमी करण्यात आलीत. व्यापारी युद्धांना आळा घालणे हा त्यामागचा उद्देश होता आणि आहे. युद्धाचा वणवा कुणालाच नको असला तरी देशोदेशांत व्यापारी युद्धाला वारंवार तोंड फुटतच आले आहे. अमेरिका आणि चीनमध्ये नुकतेच व्यापारीयुद्ध जुंपले असून त्याचे बरेवाईट परिणाम जगाला भोगावे लागतील. विशेष म्हणजे या युद्धाची सुरवात मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेकडूनच झाली आहे. ‘अमेरिका फस्ट’ असे तेथील जनतेला आश्वासन देऊन सत्तेत आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलाद, ॲल्युमिनियम धातूंवर आयातकर वाढविला. त्याचा सर्वाधिक फटका चीनला बसल्याने त्यांनी अमेरिकेतून आयात होणाऱ्या सुमारे २३४ वस्तूंवर आयातशुल्क लावले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेसुद्धा चीनमधून आयात होणाऱ्या १३०० वस्तूंवर २५ टक्के आयातशुल्क लावले आहे. चीन हा कापूस, सोयाबीन, फळे-भाजीपाला या शेतमालासह सागरी पदार्थांचा प्रमुख आयातदार देश आहे. ही आयात चीन आजपर्यंत अमेरिकेकडून करीत आला आहे. परंतु आता चीनने आयातकर लावल्याने शेतमालाची निर्यात अमेरिकेला महाग पडेल. अशावेळी कापूस, सोयापेंड, मोहरीपेंड, मका या शेतमालाची चीनमध्ये निर्यात वाढविण्याची चांगली संधी आपल्याला लाभली आहे. 

भारत हा अमेरिकेच्या खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे. चीन आयात करीत असलेल्या कापसात अमेरिकेचा वाटा ४० टक्के आहे. सध्या भारतातून चीनला केवळ सहा ते सात लाख कापसाच्या गाठींचीच निर्यात होते. आपली चीनला निर्यात क्षमता याच्या पाच ते सहा पटीने अधिक असून तेवढी निर्यात आपण यापूर्वी केलीदेखील आहे. सध्या भारतातून आयात होणाऱ्या कापसावर चीनने कोणतेही शुल्क लावलेले नाही. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत भारतीय कापूस चीनला स्वस्त पडेल. चीनच्या सोयाबीन आयातीत अमेरिकेचाच दबदबा आहे. परंतु, आता चीनने लादलेल्या निर्बंधामुळे अमेरिकेची चीनला होणारी सोयापेंड निर्यात रोडावेल. अशावेळी चीनमधील पोल्ट्री उद्योगाची गरज भागविण्यासाठी चीन भारताकडून सोयाबीन, सोयापेंड आयात करू शकते. चीनने गुणवत्तेच्या कारणास्तव आपल्या सोयापेंडवर निर्बंध घातलेले आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत आपली सोयापेंड निर्यात निम्म्यावर आली आहे. चीनला अपेक्षित गुणवत्तेनुसार आपण सोयापेंड पुरवू शकलो तर एक मोठे मार्केट आपल्या हाती लागेल. असे झाल्यास चीनसह जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम या देशांनाही सोयापेंड निर्यात करता येईल. आपल्या शेतमालाची चीनला निर्यात वाढविण्यासाठी मात्र कृषी, वाणिज्य, व्यापार मंत्र्यांना योग्य तो पाठपुरावा करावा लागेल. भारतीय शेतमालाची निर्यात त्यांना कशी फायदेशीर ठरेल, हे पटवून द्यावे लागेल. असे झाल्यास दोन देशांदरम्यान असलेली ५० अब्ज डॉलरची व्यापार तूट भरून निघेल. महत्त्वाचे म्हणजे भारतीय शेतमालास देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढून शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com