agrowon marathi special article on 3 basic problems in agriculture | Agrowon

भारतीय शेतीचे तीन मूलभूत प्रश्न
SURESH KODITKAR
बुधवार, 28 मार्च 2018

शेतीतील तीन वास्तव प्रश्न हे केवळ नफ्याशी संबंधित नाहीत, तर ते दारिद्र्यनिर्मूलन आणि कुपोषण हटाव याच्याशीही जोडलेले आहेत. भारतीय शेतीतील या तीन प्रश्नांच्या सुलभीकरणाने शेतीक्षेत्राचा विकास होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी लाभेल. 
 

भारतीय शेती आणि अर्थव्यवस्थेचा विचार करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की शेती हेच अनेक शिक्षित, अशिक्षित, कुशल, अकुशल, संघटित, असंघटित, अल्पभूधारक आणि मजुरांना रोजगार देणारे क्षेत्र आहे. आज शेतीतून शेतकऱ्याला पुरेसे उत्पादन नाही आणि उत्पन्नही नाही, त्यामुळे केवळ शेतीतून दारिद्र्य आणि कुपोषण या दोन्हींचे उच्चाटन होत नाही. हे अर्थव्यवस्थेला मारक ठरत आहे. शेतीचे  खालील तीन मूलभूत प्रश्‍न असून ते सोडविल्याशिवाय शेतीचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.

१) भारतीय शेतीत परिस्थितिजन्य बाबी आहेत. त्यात पाणी, खते, बी-बियाणे, हत्यारे-अवजारे, पत आणि मजूर पुरवठा या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शिवाय, बाजारभाव आणि हवामान हे कळीचे मुद्दे आहेतच. प्रत्येक प्रांताचे पर्यावरण आणि वातावरण हे वेगळे असते. याला कारणीभूत आपले उष्ण कटिबंधीय असणे आणि त्यामुळे प्राप्त होणारे हवामान हेही असू शकते. तसेच, देशभर एकच एक अशी शेतीची पद्धत दिसून येत नाही 

२) भारतीय शेती ही अनियोजनबद्ध आहे. कोणत्याही शेती उत्पादनाची गरज किती, उत्पादक क्षेत्र किती, साधनं आणि संसाधनं यांची उपलब्धता किती, याचा कुठेच ताळमेळ घातला जात नाही. भारतीय शेतीत उत्पादन आणि उत्पन्न हे वेगवेगळे घटक समाविष्ट आहेत. शेती ही पूर्णतः व्यावसायिक नाही आणि तो धंदाही नाही. 

३) भारतीय शेती ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहे. पूर्वी शेतीत भागत होते. आता मात्र शेती परवडेनाशी झाली आहे. पेरणी ते बाजार यातील काही मोजक्याच घटकांवर शेतकऱ्यांचे नियंत्रण आहे. बाकीचे सारे रामभरोसे. शेतीचे हे तीन प्रश्न मोठी लोकसंख्या आणि देशाची अर्थव्यवस्था यांच्याशी थेट संबंधित आहेत. कसे ते पाहूया. 
    

परिस्थितिजन्य बाबी ः आधुनिक शेतीच्या पद्धती या भौतिक कामात कार्यक्षम बदल याच्याशी संबंधित आहेत; पण हे बदल अशाश्वत आहेत. आपण या बळावर हरितक्रांती पूर्वी साध्य केली आहे. आता साधने वाढली आहेत, संकरित बियाणे अधिक उत्पन्नाची ग्वाही देत आहेत. खते आणि कीटकनाशके अधिक प्रभावी करण्याची गरज भासत आहे; पण जमिनीचा कस आणि मातीची सुपीकता, मातीच्या सर्व घटकांचे खनिजासह मिश्रण हे स्थिर राहात नाही. ते टिकवून ठेवण्यासाठी पीक फेरपालट, माती परीक्षण, मूलद्रव्यांच्या जोपासनेसाठी विविध उपाय केले जात आहेत. पण अजूनही एकरी उत्पादकता म्हणावी अशी वाढलेली नाही. जिथे मुबलक पाणी आहे तिथे अतिरेकी वापर केला जातो. नगदी पिकांवर पाणी उधळले जाते. पाणी वाया जाते आणि जमिनी क्षारपड होतात. आपल्या इथे शेतीचा सामाईक असा आकृतिबंध नाही. यावर कडी करणारी बाब म्हणजे बेभरवशाचे आणि अनिश्चित पाऊसमान. कधी तारणारे कधी मारणारे. सोबत हवामानाचा तडाखा. गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ. परिस्थिती शेतकऱ्याला जगणे आणि कमावणे यामध्ये संघर्ष करायला लावते. शेतीत भांडवल आणि कर्ज, कार्यान्वयनासाठी खर्च, गरजेनुसार पीकविमा याकरिता पत लागतेच. एकत्रित कुटुंबव्यवस्था आता मोडकळीस आली आहे. शेती ही तुकड्यातुकड्याची झाली आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा कोंडीत सापडून घुसमटणे हे आता नित्याचेच झाले आहे. या परिस्थितिजन्य बाबी थोड्याफार फरकाने सर्वत्र सारख्याच आहेत. यावर कायमस्वरूपी तोड काढणे अजून तरी शक्य झालेले नाही. 
   

 अनियोजनबद्ध शेती ः भारतीय शेती ही आधी उपजीविका, मग उत्पन्न आणि मग व्यवसाय आहे. त्यामुळे आधी भूक भागवणे आणि मग उत्पन्नाकडे वळणे हे पूर्वापार चालत आलेले आहे. शेती पिकली नाही, तर आपण खाणार काय आणि आपला प्रपंच चालणार कसा, ही एक चिंता शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेली असते. निर्धास्त होऊन जमीन कसणे शेतीत शक्य होत नाही. म्हणून शेतकरी कधीच चिंतामुक्त होत नाही. भारतीय शेती ही त्याच्याशी संलग्न सर्वच क्षेत्रांत अनियोजनबद्ध आहे आणि त्यामुळेच कधी कोणत्या शेतमालाची अचानक टंचाई निर्माण होते, तर कधी प्रचंड प्रमाणात त्याचे उत्पादन झाल्यामुळे भाव कोसळतात आणि उत्पादन मातीमोल होते. शेती क्षेत्र, शेती उत्पादनातील अन्नधान्य आणि कच्च्या मालाचे परिमाण, उत्पादनाची एकूण गरज/मागणी आणि उपलब्ध पिकाऊ क्षेत्राचा ताळेबंद मांडायला हवा. त्यामध्ये एक सुसंगत धोरण असायला हवे. उत्पादन आणि उत्पन्न याचा थेट किमतीशी समन्वय घालून उचित नफा कमावण्याचे कसब आणि कौशल्य शेतकरी नियोजनाने प्राप्त करेल, तेव्हा त्याच्या शेतीच्या विवंचना कमी होतील. धान्य आणि फळे खाण्यासाठी की इतर उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून आणि तेही ग्राहक आणि व्यापारी यांना एकाच भावात, हे शेतकरी आणि ग्राहक यांच्यावर अन्याय करणारे आहे. शेत उत्पादन आणि कच्चा माल यात फरक आहे, मग दरात फरक नको का? नियोजनाची मात्रा शेतीच्या सर्वच क्षेत्रांत आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्वच क्षेत्रांतील अनियोजन शेतीला मारक ठरत आहे.
    

शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी निगडित शेती ः जमीन हा शेतकऱ्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्याच्या हक्काचा, रोजीरोटीचा आसरा म्हणजे त्याची मातीमाउली आहे. तिच्यावरील नितांत श्रद्धेपोटी तो राबतो आणि घाम गाळतो. आपल्या येथील शेतीत नापिकी, कर्जबाजारीपणा, भूसंपादन, अधिग्रहण, कोर्टकचेरी हे सगळे होते. शेतकरी पीडला जातो. शेती फायदेशीर करणे आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास टिकवणे हे आज अगत्याचे झाले आहे. त्याने शेतकऱ्यांच्या अस्तित्वाला आधार लाभेल. शेती आता खरोखर परवडेनाशी झाली आहे. पेरणी ते बाजार यातील मोजक्या घटकांवर शेतकऱ्यांचे नियंत्रण आहे. शेतकरी आज बाजार व्यवस्थेशी संलग्न नाही. उत्पादनपश्चात तो बाजाराचा विचार करू लागतो. तथापि पूर्वनियोजनाने शेतीतील अंदाज अधिक सफाईदार होऊन शेतीत व्यावसायिकता येऊ लागेल आणि निर्वाहापलीकडील उद्योगधंद्यासम शेती असे स्वरूप त्याला प्राप्त होईल. कार्यक्षमता हाती असताना नफ्यासाठीच शेती हा निश्चय अस्तित्वावर गदा येऊ देणार नाही. उत्पादन वाढलेच तर उत्पन्न वाढेलच असे नाही, हे चित्र आता बदलायला हवे. शेतकऱ्याचे अस्तित्व टिकवून नियोजनाने शेतीत सुधारणा आणि नफ्याची शेती हे शक्य आहे.

आज उत्पादन कमी झाले तर बाजारात माल महाग होऊन ग्राहकांचे नुकसान होते. उत्पादन जास्त झाले तर किमान आधारभूत किंमतही प्राप्त न होता पडेल किमतीला माल विकावा लागतो. तिथे शेतकरी मातीमोल होतो. मध्यस्थ आणि दलाल यांची चांदी होते. ही परिस्थिती बदलणार केव्हा आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार केव्हा? याकरिता प्रश्नांच्या मुळाला हात घालावा लागेल. आज त्यादृष्टीने पावले पडायला सुरवात झाली आहे, हेही नसे थोडके. आयातीवर नियंत्रण आणि निर्यातीला प्रोत्साहन हे त्यातील महत्त्वाचे पाऊल आहे. तेलबिया गाळपाला महत्त्व देणे, कडधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होणे आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना आणि जनतेला मिळवून देणे आता घडत आहे. प्रथिनेयुक्त कडधान्यांचे साठे पडून असताना कुपोषणाने मृत्यू होताहेत, हे टाळता येण्यासारखे आहे. त्यासाठी गरज आहे इच्छशक्ती आणि नियोजनाची.        

SURESH KODITKAR : ९५४५५२५३७५
(लेखक मुक्त पत्रकार आहेत)

इतर अॅग्रो विशेष
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...