कुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत परसबागा

 पोखर्णी नृसिंह, जि. परभणी ः येथील अंगणवाडीतील परसबाग
पोखर्णी नृसिंह, जि. परभणी ः येथील अंगणवाडीतील परसबाग

परभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील ११३ अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात जागा उपलब्ध असेलल्या ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये मॅाडेल परसबागा विकसित करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी (बा.क.) डॉ. कैलास घोडके यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये १ हजार ५८० अंगणवाड्या आणि १४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ७२४ अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्यांतील मुला, मुलींना तसेच गरोदर मातांना पोषणमूल्ययुक्त सकस आहार मिळावा, कुपोषणमुक्ती व्हावी या उद्देशाने एकात्मिक महिला व बालविकास कार्यक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ पोषण मिशनअंतर्गत रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये परसबागा तयार करण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षांत ११४ अंगणवाड्यामध्ये परसबागा तयार करण्यात आल्या. परसबागांमध्ये केळी, पपई ही फळझाडे, बीट रूट, पालक, चुका, शेवगा, वांगी, टोमॅटो, फ्लॅावर, कोबी आदी भाजीपाल्यांची लागवड प्राधान्याने केली जात आहे. २०१६ मध्ये पोखर्णी नृसिंह (ता. परभणी) येथील अंगणवाडीमध्ये परसबाग निर्मितीसाठी देवस्थान तसेच ग्रामस्थांनी मदत केली.अंगणवाडीताई अश्विनी वाघ, मदतनीस भाग्यश्री वाघ या सेंद्रिय पध्दतीने परसबागेचे व्यवस्थापन करत आहेत.या अंगणवाडीमध्ये आधी कुपोषित श्रेणीतील तीव्र १४ लहान मुले होती. परसबागेतील भाजीपाला, फळांचा आहारामध्ये समावेश करण्यात आल्यामुळे ही मुले सामान्य श्रेणीत आली आहेत. याबद्दल पर्यवेक्षिका बी. बी. यादव यांचा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राधाताई विठ्ठलराव सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, विस्तार अधिकारी डी. आर. कदम आदींसह ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील अंगवाड्यामध्ये परसबागा विकसित होत आहेत. यामुळे माता आणि बालकांच्या कुपोषमुक्तीसाठी मोठा हातभार लागणार आहे.

परसबागा तयार केलेल्या तालुकानिहाय अंगणवाड्या

तालुका अंगणवाडी
परभणी १८
जिंतूर १९
सेलू १०
मानवत
पाथरी १०
सोनपेठ
गंगाखेड १३
पालम १४
पूर्णा १३

प्रतिक्रिया प्रत्येक अंगणवाडीत परसबाग... येत्या वर्षात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे पोषणमूल्ययुक्त आहार मिळेल. कुषोषणमुक्तीसाठी मदत होईल. - डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) जिल्हा परिषद, परभणी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com