पीक बदलातून शेती केली किफायतशीर

गादीवाफ्यावर कांदा रोपांची लागवड.
गादीवाफ्यावर कांदा रोपांची लागवड.

कोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा लागवडीचे नियोजन करीत चांगले उत्पादनदेखील घेतले. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी यंदा त्यांनी कांदा बीजोत्पादनावर भर दिला आहे.  

मानोली (जि. वाशीम) येथील शेखर नारायणराव महाकाळ यांचे कुटुंब पाच भावांचे. काळानुरुप  मानोली येथील वडिलोपार्जित शेतीची वाटणी झाली. शेखर महाकाळ नोकरीला असल्याने त्यांच्या वाट्याला हलकी व मध्यम प्रतीची जमीन मिळाली. या हलक्या जमिनीत पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्यांनी शेती नियोजनात बदल करायचे ठरविले. सुपीकता वाढविण्यासाठी धरणातील गाळ जमिनीत मिसळला. वर्षभर पीक लागवडीच्या दृष्टीने महाकाळ यांनी सिंचनासाठी विहीर खोदली. वीजपुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन विहिरीवर सौरपंप बसविला. त्यामुळे त्यांना आता पीक गरजेनुसार पुरेसे पाणी देणे शक्य होते. शेखर महाकाळ यांची वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पंधरा एकर शेती अाहे. या दोन्ही शेतीत त्यांनी पारंपरिक सोयाबीन, तूर पिकाबरोबरच भाजीपालावर्गीय पिकांवर लक्ष केंद्रित केले. शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी सालगडी आहे, तसेच गरजेवेळी भाऊ आणि पुतण्यांचीही मदत त्यांना शेतीच्या नियोजनात मिळते. 

पीक बदल ठरला फायद्याचा...

महाकाळ यांचे कुटुंब खरिपात कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांची लागवड करत होते. परंतू शेखर यांनी या पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय केला. शेखर हे ॲग्रोवनचे नियमित वाचक. ॲग्रोवनमध्ये राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील तज्ज्ञ डॉ. विजय महाजन आणि डॉ. शैलेंद्र घाडगे यांचा कांदा पीक सल्ला वाचनात अाला. त्यात सांगितलेल्या पद्धती, फायदे वाचून शेखर यांनी तीन वर्षापूर्वी सुधारित पद्धतीने खरीप कांदा लागवडीचे नियोजन केले.  पीक बदलाबाबत शेखर महाकाळ म्हणाले की, मी पारंपरिक पिकांच्या एेवजी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पीक बदल केला. मी तज्ज्ञांशी संपर्क करीत खरिपातील कांदा लागवडीला तीन वर्षांपासून सुरवात केली. लागवडीसाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या पांढऱ्या कांद्याच्या भीमा शुभ्रा, भीमा श्वेता आणि लाल कांद्याच्या भीमा सुपर, भीमा रेड या जातींचे बियाणे खरेदी केले.

गेल्या तीन वर्षांपासून मी प्रत्येकी एक एकरावर एका जातीची लागवड करतो. गादी वाफा पद्धतीने रोपवाटिका तयार करून ४५ ते ५० दिवसांची रोपे झाल्यावर गादीवाफा पद्धतीनेच रोपांची लागवड जुलैचा शेवटचा आठवडा किंवा आॅगस्टमधील पहिल्या आठवड्यात केली जाते. चार फूट रुंदीचा गादीवाफा ठेवला जातो. लागवडीपूर्वी रोेपे बुरशीनाशकात बुडवून गादीवाफ्यावर लावली जातात. माती परीक्षणाचा अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने खतमात्रा, पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोग नियंत्रणाचे काटेकोर नियोजन केले. साधारणपणे १०० ते ११० दिवसांत म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मला एकरी ८० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या हंगामात प्रति क्विंटल तीन हजाराचा दर मिळाला. हा कांदा बीजोत्पादन कंपनीने खरेदी केला. मी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेले बियाणे वापरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वास तयार झाला. त्यामुळे शेतकरी माझ्याकडून कांदा खरेदी करतात. यंदाच्या वर्षी मी तीन एकरांवर भीमा शुभ्रा, भीमा सुपर आणि भीमा रेड या जातींची लागवड केली आहे. 

इतर पिकांकडेही लक्ष  गेल्या काही हंगामापासून कांदा पिकात महाकाळ यांनी जम बसविला अाहे. अाता त्यांनी इतर पिकांकडेही लक्ष दिले आहे. यावर्षी जूनमध्ये त्यांनी एक एकर क्षेत्रावर हिरव्या मिरचीची लागवड केली. सध्या काही प्रमाणात मिरचीची  विक्री सुरू झाली. सुरुवातीला ४० ते ५० रुपयांचा दर मिळाला. आता २० ते २५ रुपये प्रति किलोला दर मिळत अाहेत. मिरचीची दररोज विक्री होत असल्याने शेतीला लागणारा खर्च त्यातून भागवला जातो. याचबरोबरीने सोयाबीन आणि तूर अडीच एकर, कापूस पाच एकर आणि हळद अडीच एकरावर लागवड असते. सोयाबीनचे एकरी ९ क्विंटल, कापसाचे १२ क्विंटल असे उत्पादन त्यांना मिळते. सर्व पिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी चार एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. कांद्याला मिनी स्प्रिंकलरने पाणी दिले जाते. हलक्या जमिनीत धरणातील गाळ मिसळल्याने सोयाबीन, तूर, कापूस या पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.   

नोकरीचा ताळमेळ बसवून शेती नियोजन  शेखर महाकाळ हे १९९६ पासून वाशीम जिल्ह्यातील कोठारी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत अाहेत. शनिवार, रविवारी जो वेळ मिळतो त्यातून ते या शेतीचे व्यवस्थापन करतात. वेळ मिळाला की शेतात जाऊन पीक पाहणी करतात. कुठलीही अडचण अाली की कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील डॉ. विजय महाजन, डॉ. घाडगे यांच्याशी चर्चा करतात. त्यानंतर भाऊ उत्तमराव महाकाळ, पुतण्या विकास महाकाळ आणि शेती नियोजन पाहणारे दशरथ कणसे यांच्या मदतीने पिकाचे व्यवस्थापन केले जाते. इतर पिकांबाबतही शेखर हे डोळसपणे व्यवस्थापन करतात. भाऊ, पुतण्या तसेच मजुरांच्या मदतीने शेती नियोजन शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.  कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या कांद्याच्या जातीचे बियाणे आणून कांदा तयार करणे अाणि पुढे रब्बी हंगामात हाच कांदा बीजोत्पादनाकरीता लागवड करण्याचा शेखर यांचा मानस आहे. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या जातींचा शेतकऱ्यांत प्रसार करून दर्जेदार बियाणे तयार करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने त्यांचा गौरवदेखील केला आहे. 

- शेखर महाकाळ, ९९२२३९२७९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com