समृद्ध फळबागशेतीसह ग्रामविकासातील ‘शिवाजी’

छाटणी केलेल्या सीताफळेच्या बागेत ठिबक संचाने पाणी पुरविले जाते.
छाटणी केलेल्या सीताफळेच्या बागेत ठिबक संचाने पाणी पुरविले जाते.

मजूरटंचाई व शेतमाल दरांमधील चढउतार या समस्यांनी त्रस्त झालेल्या वेळू (ता. भोर, जि. पुणे) येथील शिवाजीराव वाडकर यांनी फळपिकांद्वारे पीकपद्धती बदलली. त्यातही जोखीम कमी करताना विविध फळपिकांवर भर दिला. शेतीचा व्याप सांभाळून समाजकारणाचीही आवड त्यांनी जोपासली आहे. त्यामुळेच आपल्यासोबत गावकऱ्यांचीही प्रगती व्हावी, या हेतूने शेतीकेंद्रित ग्रामविकासावरही त्यांनी भर दिला आहे. 

फळपिकांत पैसा दिसत असला तरी ही दीर्घ मुदतीची ही पिकं असल्यानं त्यांची निगा राखणं एवढी सोपी बाब नसते. त्यात मजूरटंचाई अलिकडे गंभीर समस्या झाली आहे. मात्र, सर्व समस्यांवर मात करून पुढे जाण्याची सवय वेळू (ता. भोर. जि. पुणे) येथील शिवाजीराव लक्ष्मण वाडकर यांनी आत्मसात केली आहे. आपल्या सात एकरांत चार फळबागा उभ्या केल्या आहेत. याशिवाय हंगामी पिकेही असतात. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी आपण फळबागांकडे वळलो. वर्षभर कोणतेही एक फळपीक बाजारात विकायचेच असा त्यांचा प्रयत्न असतो.  

शेतीची वैशिष्ट्ये 

 एकाहून अधिक फळबागां उभारल्याने शेतीतील जोखीम कमी. नैसर्गिक आपत्तीत एका पिकाला फटका बसल्यास दुसऱ्या पिकातून उत्पन्न.   भाजीपाला पिकांमध्ये दरांत सतत चढउतार होते. त्या तुलनेत फळपिकात ती कमी.  फळांची संख्या व चालू दराचा अंदाज घेत उत्पन्नाचा अंदाज घेता येतो.   मजुरांची कमतरता असल्यामुळे घरातील सदस्यांच्या जोडीने कामांचा ताण हलका करता येतो.  

फळबागा बारमाही उत्पन्नाचे साधन 

जून ते ऑक्टोबर या कालावधीत सीताफळ उत्पन्न देते. ऑक्टोबरपासून डाळिंब काढणीचा हंगाम सुरू होतो. पेरू नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर जानेवारीपर्यंत सुरू असतो. जानेवारी ते अगदी मेपर्यंत अंजीराचे उत्पन्न सुरू असते.    घरातील सदस्यांकडे शेतीचे नियोजन   शिवाजीरावांच्या घरातील सर्व सदस्यांकडे शेतीचे नियोजन असते. शिवाजीराव सकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत शेतीकामांत व्यस्त असतात. पत्नी सौ. शैला त्यांना पूर्णवेळ शेतीत साथ देतात. एक भाऊ नोकरीत तर दुसरा शेतीत हे तत्त्व शिवाजीरावांनी ठेवले आहे. बंधू संभाजीदेखील सकाळी सात ते दुपारी चार अशी कंपनीमधील ‘ड्युटी’ करून शेताला वेळ देतात. त्यांची पत्नी सौ. सुमन देखील घरातील सर्व कामे सांभाळून शेती व्यवस्थापन सांभाळतात. विशेष म्हणजे वयोवृद्ध आई सुभद्राबाई देखील आजही शरीराला पेलेल एवढे श्रम करण्यास चुकत नाहीत. 

मजूरटंचाईवर मात करणारी पीकपद्धती 

फळबागांव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात हंगामी म्हणजेच जुलैत भात, ऑगस्टमध्ये ज्वारी, नोव्हेंबरमध्ये गहू आणि कांद्याची पिके घेतली जातात. मजुरांची गरज क्वचितच भासत असते. तथापी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, आधुनिक फवारणी यंत्रे आदींचा भाडेतत्त्वावर वापर करून अत्यावश्यक कामे केली जातात. शिवाजीराव सांगतात की पूर्वी टोमॅटो, वांगी, घेवडा, वाटाणा, भाजीपाला अशी पिके घ्यायचो. पुढे मजुरांची टंचाई अतिशय जाणवू लागली. सध्या मजुरांना दररोज प्रत्येकी २०० ते ४०० रुपये द्यावे लागतात.  या समस्येवर सतत उपाय शोधत बसण्यापेक्षा पीकपद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. फळपिके निवडताना आमच्याकडील भौगोलिक स्थिती, बाजार व्यवस्था, बारमाही चलन सुरू राहील या बाबींना प्राधान्य देण्यात आले. त्यातून फळपिकांतही विविधता ठेवण्याचा प्रयत्न केला. 

शेतीत राबणे हेच खरे भूषण 

आपल्या बागेत स्वतः राबून मगच शिवाजीराव गावच्या राजकारणाला किती वेळ द्यायचा ते ठरवतात. मजुरांकडून कामे करून घेत स्टार्चचा पांढरा शुभ्र कपडे घालून गावात मिरवणे म्हणजे भूषण नव्हे. जे गावच्या हिताचे तेच करण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. त्यातच खरा आनंद मिळतो असे ते सांगतात. दररोज पहाटे पाच वाजता उठून सकाळी सहा वाजता मी शेतात हजर असतो. भाजी भाकरीची न्याहारी करून दुपारी दोन वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे करतो. दुपारी दोन वाजता जेवण आटोपल्यानंतर पुन्हा संध्याकाळी सात वाजेपर्यंत कामांचा पसारा काही संपत नाही असेही शिवाजीरावांनी सांगितले. 

आपला- परका भेदच नाही ठेवला 

शेती सांभाळून शिवाजीराव १९८६ पासून गावगाडा हाकत आहेत. पारदर्शी व्यवहार ठेवल्यानेच गावाने दोन वेळा ग्रामपंचायतीचे सदस्यपद दिले होते. गावात आपला व परका (विरोधी गट) असा भेदच ठेवला नाही. गावातील विकासकामे करण्याबरोबरच शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्याचाही माझा प्रयत्न असतो. हिवरेबाजार गाव आणि पोपटराव पवार आमचे आदर्श आहेत. आता आमच्या गावाला आदर्श म्हणून पुढे आणण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे असे शिवाजीरावांनी सांगितले. शेतीतील त्यांची धडपड अनुभवण्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख देखील येथे येऊन गेले. पुणे जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने शिवाजीरावांचा गौरव केला. आता जैविक शेती, कमी खर्चाची फळबाग या संकल्पनेवर त्यांचा अभ्यास सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक उपक्रम सुरू करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

गावविकास हेच सूत्र वेळू गावाच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी एकजुटीने काम करतात. आम्ही गावात समाजकारण आणि तालुक्याच्या ठिकाणी राजकारण हे सूत्र ठेवले आहे. भानुदान घुले, अमोल पांगरे, ज्ञानेश्वर पांगारे, शिवाजी पांगारे, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाडकर, उपाध्यक्ष विठ्ठल पांगारे, ज्ञानेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष सर्जेराव वाडकर, शारदा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पांगारे असे सर्व राजकीय पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा ‘आदर्श’ म्हणून नावारूपाला आणली. दफ्तराचा कमी बोजा, सुसज्ज इमारत, संगणक ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. गावात जलयुक्त शिवार अभियानातून सात बंधारे, शेततळीही उभारण्यात आली आहेत. गावातील सुमारे साडेतीनशे महिलांना हिवरेबाजार येथे नेऊन तेथील ग्रामविकासाचा प्रत्यक्ष अनुभव दिला. गावकऱ्यांची मनोवृत्ती बदलल्याशिवाय गाव बदलणार नाही हे सांगण्याचा हेतू त्यामागे असल्याचे शिवाजीरावांनी सांगितले.  शिवाजीरावांची आदर्श एकात्मिक फळशेती 

फळबाग वाण  झाडांची             संख्या (सुमारे)  
सीताफळ बाळानगर     २००
डाळिंब  भगवा २२५
अंजीर   पुणे  ६० 
पेरू सरदार १००    

 - शिवाजीराव वाडकर, ९८८१२५१४४२  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com