नोकरी करणाऱ्या विभाताई झाल्या उद्योजक

प्रदर्शनात ग्राहकांना उत्पादनांची माहिती देताना विभा तळोकार.
प्रदर्शनात ग्राहकांना उत्पादनांची माहिती देताना विभा तळोकार.

कधीकाळी कुटुंब चालविण्यासाठी तुटपुंज्या पगारावर नोकरी करणाऱ्या उमरी (जि. अमरावती) येथील विभा रमेश तळोकार यांनी दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या बळावर पापड, शेवया निर्मिती उद्योगाची उभारणी केली. हाच छोटासा प्रयत्न त्यांच्यासाठी आज आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरला आहे.

अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील उमरी (इत बारपूर) येथील विभा रमेश तळोकार या दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणीत नोकरीला होत्या. परंतु १९९६-९७ मध्ये सुतगिरणी बंद पडल्यानंतर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. प्रति महिना अवघे ६०० रुपये मेहताना त्यांना मिळत होता. त्यातील १५० रुपये दर्यापूरातील खोली भाड्यावर खर्च होत होता. याचबरोबरीने दोन मुलांच्या शिक्षणाचा भारही त्यांना उचलावा लागत असल्याने आर्थिक ओढाताण होत होती. कुटुंबाचा आर्थिक गाडा व्यवस्थित चालावा याकरिता त्यांचे पती रमेशदेखील शेतमजुरी करत होते. 

स्थापन केला महिला बचत गट  

सूतगिरणी बंद पडल्याने विभाताईंच्या समोर रोजगाराचा प्रश्न तयार झाला. या दरम्यानच्या काळात त्यांना महिला बचत गटाची संकल्पना सुचली. विविध लोकांचा सल्ला घेत विभाताईंनी २००५ मध्ये उमरी (इत बारपूर) गावामध्ये योगीराज महिला बचत गटाची सुरवात केली. विभाताई या समूहाच्या सचिव तर वंदना गणेशराव फालके या अध्यक्ष आहे. या गटामध्ये अकरा महिला सदस्या आहेत. गटातील महिला पहिल्यांदा दर महिना ५० रुपये बचत करत होत्या. त्यानंतर आता या महिला दर महा १०० रुपये बचत करतात. येवदा येथील राष्टीयकृत बॅंकेच्या शाखेत गटाचे बचत खाते    आहे.

कर्जाची केली परतफेड  

विभा तळोकार यांनी पापड निर्मिती उद्योग उभारणीसाठी सुरवातीला महिला गटाच्या माध्यमातून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. चार वर्षांत त्यांनी कर्जाची परतफेड केली. कर्जाची परतफेड केल्यानंतर त्यांनी पापड तयार करण्याचे यंत्र घेतले. २०१६ मध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी ३५ हजार रुपयांचे शेवया निर्मिती यंत्र आणि २५ हजार रुपयांची पिठगिरणी घेतली. याचबरोबरीने स्वयंचलीत डबल रोल असलेले पापड निर्मिती यंत्र घेतले. सध्या विभाताई दर महिन्याला अडीच ते तीन क्‍विंटल पापडाची निर्मिती करतात. बाजारपेठेच्या मागणीनुसार मूग, उडीद, लसूण, हिरवी मिरची या चवीचे पापड त्या तयार करतात. विविध चवीचे पापड २५० रुपये किलो, शेवया ८० रुपये किलो दराने त्या विकतात. याचबरोबरीने बाजारपेठेच्या मागणीनुसार कुरड्या, सांगडेदेखील त्या बनवितात. यासाठी त्यांनी गावातील पंधरा महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.  दरमहा प्रक्रिया उद्योगातून खर्च वजा जाता बारा हजाराचा नफा त्यांना मिळतो.        राज्यभरात विविध ठिकाणी भरणारी कृषी प्रदर्शने आणि बचतगट उत्पादन विक्री महोत्सवात विभा तळोकार सहभागी होतात. विभा तळोकार यांना प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी दर्यापूर पंचायत समितीचे राहूल रायबोले, महिला आर्थिक विकास मंडळाचे प्रफुल्ल डहाने, श्री. राठोड यांचे सहकार्य मिळाले आहे. समूहातील वंदना फलके यांनीदेखील शेवया व मिरची पावडर उद्योग उभारला आहे.

पापड निर्मिती उद्योगाला सुरवात

गावामध्ये महिला गटाची सुरवात झाल्यानंतर विभा तळोकार यांनी गृहउद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. इतरांकडे मजुरीच्या कामाला जाण्याऐवजी स्वतःचाच काही उत्पन्नाचा स्रोत असावा, अशी त्यांची भावना या गृहउद्योगाच्या उभारण्यामागे होती. प्रक्रिया उद्योगाची काहीच माहिती नसल्याने त्यांनी सुरवातीला अमरावती, दर्यापूर येथील एका पापड उद्योगात पर्यवेक्षक म्हणून काम केले. दोन वर्षे या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांना पापड निर्मितीसाठी लागणारे घटक, खरेदी कोठे करायची, बाजारपेठेतील विक्री याची माहिती मिळाली.  सन २००९ साली विभा तळोकार यांनी स्वतःचा पापड निर्मिती उद्योग सुरू केला. सुरवातीला हातानेच पापड लाटले जायचे. पापडासाठी गावातील महिलांना पिठाचे गोळे दिले जात होते. या महिला पापड तयार करून देऊ लागल्या. पापड निर्मितीसाठी गावातील पंधरा महिलांना ४० रुपये प्रतिकिलो असा मजुरी दर दिला जातो. या माध्यमातून दररोज १५ ते २० किलो पापड तयार होऊ लागले.  पापड विक्रीसाठी विभा तळोकार यांनी दर्यापूर, धामणगाव, चांदूररेल्वे, चांदूर बाजार येथील शाळा, महाविद्यालयांत काम करणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयांतही त्या जात होत्या. सुरवातीला पापड विक्रीसाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी टीका सहन करावी लागली. परंतु या टीकेची काळजी न करता त्यांनी पापड विक्री सुरूच ठेवली. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे ग्राहकांच्याकडून पापडाची मागणी वाढू लागली. सुरवातीला महिन्याला दोन-चार किलो पापडीची विक्री होत होती. पुढे टप्याटप्याने पापडाची विक्री वाढत जाऊन दररोज १५ ते २० किलोवर पोचली. तालुकास्तरावरून मागणी वाढल्यानंतर अमरावती व नागपूर अशा मोठ्या शहरांत त्यांनी पापडाची विक्री सुरू केली. आता महिन्याला सरासरी दोन क्‍विंटलपेक्षा जास्त पापडाची विक्री होते.

घराचे स्वप्न साकार   विभा तळोकार यांची आर्थिक परिस्थिती फार नाजूक होती. त्यांच्यासमोर राहण्यासाठी घराचा प्रश्‍न होता. ग्रामपंचायतमार्फत त्यांना घरकुल मंजूर झाले. यामध्ये त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले. त्यानंतर उद्योगाच्या मिळकतीतून स्वयंपूर्ण होत त्यांनी अमरावतीत स्वतः प्लॉट खरेदी केला. दोन्ही मुलांचे शिक्षणदेखील त्यांनी उद्योगातून मिळणाऱ्या पैशातूनच केले. सध्या त्यांची मुलगी अकरावीमध्ये तर मुलगा एम.ए. शिकत आहे. 

कुटुंबातील सदस्यांची साथ  विभा तळोकार पापड तयार करण्यासाठी चार महिलांची मदत घेतात. महिलांना २०० रुपये मजुरी दिली जाते. त्यासोबतच त्यांचा मुलगा श्‍याम, मुलगी गायत्री तसेच त्यांचे पती रमेश यांची पापड निर्मिती आणि विक्रीसाठी मदत मिळते. परिणामी मजुरीवरील खर्च वाचतो.   

संपर्क ः  विभा तळोकार - ९०९६१२३६१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com