आंदोलन होणारच

दर परवडत नसल्याने दूध न विकण्याचा निर्णय दूध उत्पादकांनी घेतला आहे. सर्व बाजूने कोंडी झाली असताना, कोणीच मदत करत नसेल, तर शेतकऱ्यांनी विद्रोह केला, तर त्यात काय चुकले. हा आमचा सत्याचा प्रयोगच आहे. - राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
राजू शेट्टी
राजू शेट्टी

कोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या दूध दराला कमी दर देत आहेत. सर्वसमावेशक कोणताही निर्णय न होता काही दूध संघांनी केवळ तीन रुपये लिटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये वाढवून मिळावेत, ही आमची मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीतून आजपासून (ता. १६) मुंबईला जाणारे दूध बंद केले जाईल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर, अनेक दूध संघांनी स्वयंस्फूर्तीने संकलन बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  दूध विकणार नाही, असा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला नसून, राज्यभरातील दूध उत्पादकांना विचारून निर्णय घेतला आहे. शेतकरी स्वत: दूध विकणार नसतील, तर त्यांच्यावर विक्री करण्याची सक्ती कोणी करू शकत नाही. एखाद्या शेतकऱ्याने उचल घेतल्याने त्याच्यावर दूध देण्याची सक्ती केली जात असेल, तर कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांना संरक्षण देऊ, असेही खासदार शेट्टी म्हणाले.  आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. शेट्टी यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले, की काही पावडर कंपन्यांच्या भल्यासाठी सरकार किरकोळ अनुदानाचे गाजर दाखवत आहेत. यामुळे यात त्यांचेच हित साधले जाणार आहे. सरकार देत असलेल्या अनुदानाचा सगळा फायदा पावडर करणाऱ्यांनाच होणार आहे. उत्पादक, दूध संघ याचा काडीमात्र उपयोग होणार नाही. यामुळेच आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. अनेक दूध संघांचा दर मुुळातच कमी आहे. विशेष करून पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांच्या गायीच्या दूध खरेदी दरात खूप मोठी तफावत आहे. जे दूध संघ अतिशय कमी दरात दूध खरेदी करत होते. त्याच दूध संघांनी तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याचा फायदा उत्पादकांना होइल, ही अपेक्षा व्यर्थ आहे.  

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील ३३ कार्यकर्त्यांना रविवारी सकाळी ताब्यात घेऊन दुपारी उशिरा सोडून देण्यात आले. कार्यकर्त्यांना अटक केल्यास जनावरे घेऊन ठाण मांडू, असा इशारा स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिला. पावडर कंपन्यांचा स्वाभिमानीशी संपर्क  काही पावडर कंपन्यांनी आम्हाला किलोला ७५ रुपये अनुदान द्या, आम्ही जादा होणारे वीस लाख लिटर दूध २५ रुपयांनी खरेदी करतो, अशी तयारी दाखविली आहे. २० लाख लिटर दुधापासून सुमारे १ लाख ७० हजार किलो पावडर तयार होते. प्रतिकिलोस ७५ रुपये अनुदान दिल्यास दररोज १ कोटी ३० लाख रुपये सरकारला द्यावे लागतील. म्हणजेच महिन्याला ४० कोटी रुपये शासनाला अनुदानापोटी द्यावे लागतील. आम्ही या कंपन्यांकडून लेखी प्रस्ताव मागविला आहे. दूध उत्पादकांच्या हितासाठी सरकारला इतके अनुदान देणे सहज शक्‍य आहे. तीन महिने जरी अनुदान दिले, तर तेथून पुढे दुधाचे प्रमाण कमी झाल्यास परिस्थिती समाधानकारक स्तरावर येऊ शकेल. पण, याबाबतची चर्चा करण्यास सरकारमधील कोणीही प्रतिनिधी तयार नाही, असे श्री. शेट्टी म्हणाले. आंदोलनामुळे आज दूध संघाचे वेळापत्रक बिघडण्याची शक्‍यता   दूध संघांनी दुग्ध संस्थांना लेखीबरोबरच तोंडी सूचना देऊन सोमवारी (ता. १६) दूध संकलन बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. काही दूध संस्थांनीही दूध संकलन बंदच्या सूचना आपल्या सभासदांना दिल्या आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तरी दूध संघांचे संकलन बंद राहील, अशी शक्‍यता आहे. रविवारी दिवसभर प्रत्येक गावोगावी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून  दूध दराच्या आंदोलनाची कल्पना दिली जात होती. आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न झाल्यास गनिमी काव्याने जशास तसे उत्तर देण्याची तयारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून रविवारी दिवसभर सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com