अकोला ः निर्यातीचा करार झाला त्या वेळी उपस्थित शेतकरी व कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी.
अकोला ः निर्यातीचा करार झाला त्या वेळी उपस्थित शेतकरी व कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी.

अकोल्यातील शेतमाल निर्यातीचा करार

अकोला ः गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील फळे, भाजीपाला निर्यातीच्या क्षेत्रात ठोस पाऊले पडू लागली आहेत. शनिवारी (ता. ७) प्रशासन व संबंधित कंपन्यांमध्ये करार झाला. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी, डाळिंब, मिरची व भेंडी या भाजीपालावर्गीय पिकांच्या निर्यातीची मोठी संधी मिळाली आहे. जिल्ह्यातून मागील वर्षापासून केळी ही आखाती व पूर्वेतर आशिया खंडात निर्यात होऊ लागली आहे. त्यापाठोपाठ आता डाळिंबासोबत दर्जेदार मिरची व भेंडीसुद्धा निर्यात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील निर्यातक्षम भाजीपाला व फळपिके उत्पादक शेतकरी आणि आयएनआय फॉर्म, नागपूर येथील ईवा एक्स्पोर्ट कंपनी यांच्यामध्ये निर्यात करार झाला. या वेळी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, अपेडा दिल्लीचे विभागीय संचालक प्रमोद वाघमारे, निर्यात पणन मंडळा (मुंबई)चे संचालक डी. एम. साबळे, आयएनआय फॉर्मचे पंकज खंडेलवाल, पाैर्णिमा खंडेलवाल, ईवा ॲग्रो एक्सपोर्टच्या प्रतिनिधी रितेश अल्लडवार, सोनल त्योहारिका, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्यासह उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यात उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांनी आपसात समन्वय ठेवून काम केले, तर येत्या पाच वर्षांत याचा मोठा फायदा दिसून येणार आहे. शासनाच्या विविध येाजनांचा लाभ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी घ्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी पांडेय पुढे महणाले, की वृक्ष लागवड, गटशेती यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेती उत्पादक कंपन्यांनी आपला उत्पादन खर्च कमी करावा. यापूर्वी केळीची निर्यात सुरू झाली आहे. आता भाजीपाला निर्यातीच्या दृष्टीने मोठे पाऊल पडले आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात जिल्ह्यातील शेतकरी मागे राहू नये. त्यांचा माल परदेशात निर्यात होऊन त्यांनी भरघोस नफा मिळवावा. यासाठी जिल्हा प्रशासन व अपेडा यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. भविष्यात आपल्या जिल्ह्यातूनही युवा निर्यातदार शेतकरी तयार व्हावेत, असे अपेक्षाही या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांशिवाय फळ पिकांच्या शेतीकडे वळावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. निर्यातदार करार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ सर्वोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. या वेळी ज्ञानेश्वरी पाटील या शेतकरी महिलेने डाळिंब या फळपिकाचा तर गजानन बोचे यांनी केळी पिकाचा करार केला. आता जिल्ह्यात २०० एकर केळी पिकाचा निर्यातीसाठी करार झाला आहे. भेंडी आणि मिरची या भाजीपाला पिकांचा करार संदीप चव्हाण या शेतकऱ्याने केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोटचे मंडळ अधिकारी राजेश बोडके यांनी केले. प्रास्तविक उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी मानले. इवाचे संदीप चव्हाण यांनी कराराबाबत माहिती दिली. तर ॲग्रोस्टारचे अजय क्षीरसागर यांनी निर्यातक्षम मालाबाबत मार्गदर्शन केले. ईवाचे संचालक संदेश धुमाळ आणि उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या नात्याने संदीप इंगळे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तरुण शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगणाऱ्या जिल्ह्यातील ५०० तरुण शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असून त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, उत्तम मार्केट मिळावे व मालाचे ब्रॅण्डींग व्हावे तसेच शेतमाल वाहतुकीसाठी वाहनाकरिता आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी त्यांना ‘वावर’ नावाच्या उपक्रमाच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले. अकोला जिल्ह्यातून उत्तम गुणवत्ता असलेला शेतमाल हा निर्यात होईल व उरलेला शेतमाल वावरच्या माध्यमातून जिल्हातंर्गत विकल्या जाईल. तरी या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com