कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार

कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार

पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम बंद केल्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार असेल, तर राज्य शासन याबाबत गंभीर आहे. कृषी तंत्रनिकेतन हा २०१२ पासून सुरू असणारा अभ्यासक्रम बंद करण्यात येणार नाही, असे आश्वासन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांना दिले.  दीड महिन्यापूर्वी राज्यातील (२०१८-१९) कृषी तंत्रनिकेतन विद्यालयांना तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्यापीठांनी कळविले आहे. कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात आलेल्या या समस्येबाबत कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची बैठक बुधवारी (ता. २३) सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, कृषी सचिव विजय कुमार, उपसचिव श्री. गावडे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार दिगंबर विसे, ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत घोगरे आदी उपस्थित होते. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले "हा अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनीही या प्रश्नाबाबत माझ्याबरोबर फोनवरून सविस्तर चर्चा केली आहे. या निर्णयामुळे तसेच विद्यापीठांनी अभ्यासक्रम बंद करण्याबाबत दिलेल्या पत्रानुसार कोणतेही संमतीपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. येत्या वर्षापासून हा अभ्यासक्रम व प्रवेश सुरू करण्याबाबतसुद्धा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल.     कृषी सचिव विजय कुमार यांनी या प्रश्र्नांच्या सोडवणुकीसाठी इतर राज्यात सुरू असलेल्या कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे मान्य केले. ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी विद्यापीठाच्या पातळीवरून कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करण्यासाठी केलेली शिफारस ही विद्यार्थी विरोधी आणि राज्याच्या कृषी विकासासाठी कशी घातक आहे. याबाबतची माहिती देत पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम बदल करून तो जास्तीत जास्त व्यावसायिक करण्याबाबत समितीने सुधारित अभ्यासक्रमाची शिफारस केली आहे. त्याच आधारे कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम व्यावसायिक आणि सुधारित करावा, अशी मागणी श्री. मेहेर यांनी केली.  विद्यापीठांकडून हा अभ्यासक्रम बंद करण्यात आल्याचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा १९८३ च्या कलम ४ (ड) अंतर्गत कृषिमंत्री तथा प्र. कुलगुरू यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून स्थगित करावा. पुढील अभ्यासक्रम तयार होईपर्यंत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुदतवाढ द्यावी. याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय करून विद्यापीठांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या वेळी केली. या प्रश्र्नांबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या संदर्भात निवेदन दिले असून, हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे, अशी माहिती कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या सूत्रांनी दिली.  कृषिमंत्र्यांच्या कुलगुरूंना सूचना या बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित नव्हते. विद्यापीठ व शिक्षण परिषदेचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर उपस्थित होते. मात्र कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्यासाठी चारही विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी श्री. कौसाडीकर यांच्या मार्फत दिल्या. तसेच पुढील कारवाई पूर्ण करावी, असेही म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com