शेतातील जीवसृष्टी सांभाळल्यास मातीतून पुन्हा मिळेल सोने

‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित ‘जपाल माती, तर पिकतील मोती’ या जमीन सुपीकता चर्चासत्राचे उद्‌घाटन प्रताप चिपळूणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. हरिहर कौसडीकर, सुभाष शर्मा.
‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित ‘जपाल माती, तर पिकतील मोती’ या जमीन सुपीकता चर्चासत्राचे उद्‌घाटन प्रताप चिपळूणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. हरिहर कौसडीकर, सुभाष शर्मा.

नाशिक : शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी ‘जमीन सुपीकता’ हाच मंत्र जपावा लागेल. कमी खर्चात जमिनीचे आरोग्य सुधारण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवसृष्टी तयार झाल्यास शेतकऱ्याला मातीतून पुन्हा सोने मिळेल, असा सूर ‘ॲग्रोवन’च्या चर्चासत्रातून निघाला.   ‘ॲग्रोवन’ यंदा जमीन सुपीकता वर्ष साजरे करीत असून, त्यानिमित्ताने राज्यभर सुरू असलेल्या विविधांगी उपक्रमाच्या मालिकेत बुधवारी नाशिक येथे आयोजित केलेल्या चर्चासत्राला उत्तम प्रतिसाद मिळाला. यारा फर्टिलायझर्स हे या चर्चासत्राचे प्रयोजक, तर कॅन बायोसिस हे सहप्रायोजक होते.  ‘जपाल माती तर पिकतील मोती’ या विषयावर आयोजित केलेल्या या चर्चासत्रात व्यासपीठावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, फुकुओका परंपरेतील निसर्गशेतीचे अभ्यासक शेतकरी सुभाष शर्मा, भू-सूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक शेतकरी प्रताप चिपळूणकर, यारा फर्टिलायझर्सचे शास्त्रज्ञ डॉ. गौरवकुमार सिंग, कॅन बायोसिसचे तांत्रिक सल्लागार डॉ. एस. एस. नाकट, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने होते.  ‘‘हरितक्रांतीनंतर आता शेतीमधील उत्पादकता चांगली खते, बियाणे व आधुनिक तंत्राचा वापर करूनदेखील वाढलेली नाही. याला मुख्य म्हणजे जमीन सुपीकतेकडे झालेले दुर्लक्ष, हेच आहे. पिकांना संतुलितपणे १७ अन्नघटक मिळत नसल्यास कोणतेही खर्चिक प्रयोग केले, तरी उत्पादकता वाढणार नाही,’’ असे डॉ. हरिहर कौसडीकर यांनी नमूद केले.  शेतीतील जीवसृष्टीची जपणूक केल्याशिवाय समृद्धी शक्य नाही, असा आग्रह धरीत सुभाष शर्मा म्हणाले, की १९७५ ते १९९४ या दरम्यान मी रासायनिक शेती केली. मात्र, त्यानंतर निसर्गशेतीकडे वळाल्यानंतर मला समृद्धी आणि समाधानही मिळाले. मातीमधील ओलावा, हाच सर्वांत महत्त्वाचा धागा आहे. शेताला मी कृषी विद्यापीठ मानले असून, निसर्गाला कुलगुरू मानले. शेतीमधील जीवजंतू, पशुपक्षी, झाडे, वेली, पाणी, हवा हेच माझे प्राध्यापक आहेत.     श्री. प्रताप चिपळूणकर म्हणाले, की जमिनीची सुपीकता घटण्यामागे कमी झालेला सेंद्रिय कर्ब जबाबदार आहे. शेणखत, कंपोस्ट खत टाकून कर्ब वाढविण्यास मर्यादा आहे. माझ्या प्रयोगातून असे आढळले आहे, की शेतातील तण कर्ब वाढविणारे सर्वांत चांगले साधन निसर्गाने आपल्याच शेतात निर्माण केलेले आहे. तणनाशक फवारून या तणाला शेतात गाडून पुढे पिके घेतल्यास उत्पादकता कमी खर्चात वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘तण देई धन’ या मंत्राची जपणूक करावी. डॉ. गौरवकुमार सिंग म्हणाले, की जमीन सुपीकतेकडे दुर्लक्ष झाल्यास देशाची अन्नधान्याची उत्पादकता अजून घटू शकते. रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर झाल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले असून, त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीच्या नव्या तंत्रांचा वापर करण्याची गरज आहे.  डॉ. एस. एस. नाकट यांनी शेतामधील हानीकारक बुरशी व सुत्रकृमी, तसेच रोगकीडीचा नायनाट करण्यासाठी रसायनांपेक्षा विविध जैविक उपाय करण्याचा आग्रह धरला.  ‘‘शेतीमधील जैविक परिसंस्थेवर आघात झाल्यामुळे संपूर्ण शेती संकटात सापडली आहे. देशाच्या शेतीमधील तंट्यांचे मूळ मातीच्या बिघडलेल्या आरोग्यात आहे, असे श्रीमंत माने यांनी नमूद केले. प्रास्ताविकात आदिनाथ चव्हाण यांनी, “माध्यम म्हणून ‘ॲग्रोवन’ केवळ जमीन सुपीकतेवर माहिती देत थांबलेला नाही, तर विविध उपक्रमांतून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शनदेखील करतो आहे,’’ असे सांगितले.  या वेळी विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, तसेच कृिषक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते आणि प्रयोजकांचे स्वागत श्रीमंत माने आणि ‘ सकाळ’चे युनिट मॅनेजर राजेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ‘अॅग्रोवन’चे प्रतिनिधी ज्ञानेश उगले यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com