भांडवली कृषी कर्जाची खर्चरचना ‘जैसे थे’च

भांडवली कृषी कर्जाची खर्चरचना ‘जैसे थे’च
भांडवली कृषी कर्जाची खर्चरचना ‘जैसे थे’च

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना भांडवली कृषी कामाच्या विविध कर्जांसाठी गृहीत धरल्या जाणाऱ्या खर्चरचनेत गेल्या दोन वर्षांत वाढ करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीने चालू वर्षात शेतकऱ्यांना शेतीच्या भांडवली कामांसाठी कोणत्या आधारावर कर्ज द्यायचे याची याविषयी मार्गदर्शनपर पत्रे पाठविली आहेत. ‘‘शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जविषयक बाबींची कोणतीही माहिती आम्हाला देण्याचे अधिकार नाहीत. त्यासाठी तुम्ही नाबार्डकडून माहिती घ्या,’’ असे सांगत समितीने कानावर हात ठेवले आहेत.  खर्चपातळी म्हणजेच युनिट कॉस्टचा आधार घेऊन शेतकऱ्याला कर्ज देण्याची पद्धत बॅंकांची आहे. त्यामुळे या खर्चपातळीला विशेष महत्त्व असते. ‘‘बॅंकर्स समितीने खर्चपातळीत वाढ केलेली नसली तरी सुचविलेल्या पातळीत १० ते २० टक्के वाढ किंवा घट गृहीत धरून कर्ज देण्याचे अधिकार संबंधित बॅंकांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे खर्चपातळीत वाढ केलेली नसली तरी बॅंकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात नाही,’’ असे बॅंकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीयकृत बॅंकेच्या सूत्रानुसार, यंदा आम्हाला राज्यस्तरीय बॅंकर्स समितीने पाठविलेल्या पत्राचा अभ्यास केल्यास भांडवली कर्जाच्या खर्चरचनेत दोन वर्षांच्या तुलनेत कोणताही बदल केला नसल्याचे दिसून येते. ही दररचना ठरविणे किंवा त्याचा आढावा घेण्यासाठी बॅंकर्स समितीने स्वतः काहीही केलेले नसून, नाबार्डने तयार केलेली कर्जदर रचना जशीच्या तशी आमच्याकडे पाठविली.  दख्खन क्षेत्रात विहीर खोदाईसाठी शेतकऱ्याला विविध जिल्ह्यानुसार एक लाख ते एक लाख तीस हजार रुपये अशी खर्च पातळी ठेवण्यात आलेली आहे. ही पातळी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसाठी सर्वांत जास्त ठेवली गेली आहे.  विदर्भ तसेच पुर्णा, तापीच्या खोऱ्यातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यांत बोअरवेलसाठी एक लाख ९५ हजार रुपये खर्चपातळी ठेवली गेली आहे. शेतकऱ्याला सबमर्सिबल पंपासाठी पाच एचपीला ५५ हजार रुपये तर तीन एचपीसाठी ४० हजार रुपये खर्चपातळी आहे. ७.५ एचपीच्या इलेक्ट्रिक मोटारसाठी ३५ हजार रुपये, ७.५ एचपीच्या डिझेल पंपसेटसाठी ४० हजार रुपये तर ३.५ एचपीच्या केरोसिन पंपासाठी २० हजार रुपये खर्चपातळी ठेवण्यात आलेली आहे.  या खर्चपातळीच्या रचनेत सोलरपंपाला का स्थान देण्यात आलेले नाही याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फळबागेसाठी ठिबककरिता अंतरानुसार विविध पिकांसाठी खर्च पातळी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यात द्राक्ष, केळी, कापूस, भाजीपाला, गुलाब, आले, स्ट्रॉबेरी, फुलशेतीसाठी सर्वांत जास्त म्हणजे एक लाखापर्यंत पातळी ठेवण्यात आलेली आहे.  कारणे देण्याची गरज ‘‘राज्यस्तरीय बॅंकर्स समितीने असे सरधोपट पत्र न पाठवता गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ-घट दर्शविणारा तक्ता शेतकऱ्यांच्या माहितीसाठी जाहीर करण्याची आवश्यकता आहे. तसेच, भांडवली कृषिकर्जाच्या कोणत्या कर्जपातळीत वाढ किंवा घट का करण्यात आली नाही, याची कारणे देखील देण्याची नमूद करण्याची गरज आहे. ही माहिती बॅंकांच्या कामाची असली, तरी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी जाहीर करायला हवी,’’ असे मत जिल्हा बॅंकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com