चीनची भिस्त भारतीय कापसावरच

रुईच्या तुडवड्याचे संकट सूत गिरण्यांसमोर आहे. सूताचे दर वाढले आहेत. सोबतच रुईदेखील महागली आहे. निर्यात व आयात खुली आहे. पुढे चीनला गाठींची मोठ्या प्रमाणात गरज भासेल. कारण, चीनमध्ये उत्पादन ३५० लाख गाठी येईल. त्यांची गरज किमान ५०० लाख गाठींची आहे. भारतीय रुई जगात सर्वांत स्वस्त आहे. तिची निर्यात पुढील हंगामातही जोमातच होईल. - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा, जि. नंदुरबार
कापूस
कापूस

जळगाव ः डॉरलचे वधारते दर, चीनमधील गाठींच्या बफर स्टॉक (संरक्षित साठा) मध्ये झालेली मोठी घट आदी कारणांमुळे भारतीय कापसाची निर्यात आगामी हंगामात मोठ्या प्रमाणात वाढून मागील सर्व विक्रम मोडील. देशातून चीनसह इतर देशांमध्ये सुमारे एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक गाठींची निर्यात होईल. याच वेळी भारतात आगामी हंगामात कापूस उत्पादन सरत्या हंगामाच्या तुलनेत घटून ते ३४८ लाख गाठींपर्यंत खाली येणार आहे.  उत्पादनातील घटीचा प्रश्‍न आगामी हंगामातही कायम राहणार असतानाच रुपयाचे अवमूल्यन व वधारता डॉलर यांमुळे भारतीय कापूस आयातदारांना परवडणारा ठरत आहे. भारतात कापूस आयात महागडी ठरत असून, भारतीय खंडी (३५६ किलो रुई) परदेशी आयातदारांना सद्यःस्थितीत ४६००० ते ४६५०० दरात पडत आहे. तर भारतीय व इतर आयातदारांना ऑस्ट्रेलिया, अमेरिकेची खंडी ५८००० ते ५९००० रुपयांना पडत आहे. चीन व अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे चीनला आपला संरक्षित साठा (बफर) वाढविण्यासाठी भारताच्या दाराशी पुढेही यावे लागेल. चीन आगामी हंगामात ११७ लाख गाठींची आयात करणार आहे.  चीनने सूत आयातीवर मध्यंतरी भर दिला. परंतु, भारतीय व बांगलादेशी सूतगिरण्यांसमोर रुईच्या तुटवड्याचे संकट पुढील काही महिन्यांत उभे ठाकणार आहे. सूताचे दरही दणकले आहेत. चीनने आपल्या कापूस व्यापार धोरणात आयातीसंबंधीची भूमिका स्पष्ट केली आहे. चीनकडे ४०० लाख गाठींचा साठा होता. तो आजघडीला फक्त २० टक्केच शिल्लक आहे. चीनमध्ये सूताचे उत्पादन कमी होऊन कापड व्यापारावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेता चीनने आतापासूनच गाठींची आयात वाढविली आहे. पण पुरेसा कापूस किंवा गाठींची समस्या चीनला सतावू लागली आहे. याच वेळी चीनचा सूत निर्मितीचा व्यवसाय बांगलादेशातही आहे.  सोबतच बांगलादेश सूत उत्पादनात अग्रेसर ठरत असून, बांगलादेशलाही आगामी हंगामात किमान ६० लाख गाठींची गरज भासणार आहे. बांगलादेशला भारतातून कापूस आयात टॅक्‍स फ्री असल्याने बांगलादेशने भारतातून सुमारे ५५ लाख गाठींची आयात सरत्या हंगामात केली आहे. पुढे चीनसह बांगलादेशकडून भारतीय कापसाला मोठी मागणी राहणार असून, यामुळे कापूस निर्यात किमान एक कोटी गाठींपर्यंत जाईल व मागील सर्व विक्रम मोडीत काढेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी म्हणाले.  आगामी हंगामातील ताळेबंद (एक गाठ 170 किलो रुई) देशातील कापूस लागवड 110 ते 113 लाख हेक्‍टर आगामी हंगामासंबंधी गाठींचा शिलकी साठा 15 ते 18 लाख गाठी देशांतर्गत उत्पादन 346 ते 348 लाख गाठी देशांगर्तत सूतगिरण्यांची गरज 320 लाख गाठी देशातील लघू वस्त्रोद्योगांची गरज (एसएसआय) किमान 30 लाख गाठी देशातील मिलांव्यतिरिक्त असलेली गाठींची गरज 15 लाख गाठी आगामी हंगामातील अपेक्षित निर्यात एक कोटी गाठी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com