कापसाला यंदा चांगल्या उठावाची शक्यता

कापसाला यंदा चांगल्या उठावाची शक्यता
कापसाला यंदा चांगल्या उठावाची शक्यता

जळगाव ः सरत्या कापूस हंगामातील अपेक्षेपेक्षा कमी आलेले उत्पादन आणि वाढत्या मागणीमुळे सूतगिरण्यांसमोर दर्जेदार रुईच्या तुटवड्याचे संकट कायम आहे. यातच आगामी हंगामात जागतिक स्तरावर कापूस साठा ५० ते ६० लाख गाठींपर्यंच राहण्याची स्थिती आहे. परिणामी, बारमाही सूतनिर्मिती करणाऱ्या गिरण्या सप्टेंबरमध्येच बंद करण्याची वेळ देशांतर्गत क्षेत्रात येईल की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढील हंगामात चांगला उठाव मिळेल. ५२०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळतील, असा विश्‍वास कापूस उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.  प्रमुख कापूस उत्पादक देश आपल्याकडील मागणी, गरज आदी बाबी लक्षात घेता गाठींचा (एक गाठ १७० किलो रुई) साठा (कॅरी फॉरवर्ड) करतात. जागतिक कापूस बाजारात शिलकी साठा किती आहे, यानुसार दरांचे गणित असते. सरत्या हंगामात भारतात बोंड अळीमुळे उत्पादन ३६० लाख गाठींपर्यंतच आले. याचवेळी सूतगिरण्यांसमोर दर्जेदार रुईचा प्रश्‍न उभा ठाकला. आयात वाढली, पण मध्येच डॉलरने उच्चांकी ६७.४७ रुपये दर गाठल्याने आयात महागडी ठरली. देशातील २४०० सूतगिरण्यांना प्रतिमहिना २८ लाख गाठींची गरज असते. हंगामात किमान ३६० लाख गाठींची गरज देशांतर्गत गिरण्यांना आहे. ही गरज देशातील जिनिंग उद्योग पूर्ण करू शकत नाही. अर्थातच, उत्पादनच जेमतेम आहे, तसेच निर्यात गतीने सुरू असून, मागील चार वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक निर्यात या वर्षी होईल. ती ७८ लाख गाठींपर्यंत जाईल, अशी माहिती आहे. आजघडीला सुमारे ६८ लाख गाठींची निर्यात झाली आहे.  भारतीय कापूस स्वस्त पडत असल्याने आशियाई, आखाती देश भारतीय कापसाला पसंती देत आहेत. मागणी अधिक व जिनर्सना चांगले दर मिळत असल्याने शिलकी साठा फक्त १५ ते १६ लाख गाठींपर्यंत राहू शकतो. जगात मागील हंगामात १८५ लाख गाठींचा साठा चीन, भारत, इजिप्त, टांझानिया, पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांमध्ये मिळून होता. हा साठा आगामी हंगामात ५० ते ६० लाख गाठींपर्यंतच राहण्याचे संकेत असल्याने बाजार वधारला आहे. अशा स्थितीत देशांतर्गत सूतगिरण्यांना हवी तेवढी रुई मिळणार नाही, पुढे नवा हंगाम सुरू होईपर्यंत सप्टेंबरमध्येच गिरण्या बंद करण्याची वेळ अनेक भागात निर्माण होईल. विशेषतः तमिळनाडू, कर्नाटक व उत्तर भारतातील गिरण्यांना अधिकची अडचण येईल, अशी माहिती शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी दिली.  गाठींची ओढाताण होणारच, ताळेबंद असा... देशातील वस्त्रोद्योगाची गरज ३६० लाख गाठी देशातील सरत्या हंगामातील उत्पादन ३६० लाख गाठी आतापर्यंतची निर्यात ६८ लाख गाठी आगामी हंगामासंबंधीचा शिलकी साठा (शक्‍य) १५ ते १८ लाख गाठी  

जागतिक कापूस गाठींच्या शिलकी साठ्याची माहिती (लाख गाठींमध्ये)

वर्ष साठा
२०१२-१३ १५७
२०१३-१४ १९४
२०१४-१५ २१३
२०१५-१६ २२९
२०१६-१७ २०२
२०१७-१८ १८५
२०१८-१९ ६० पर्यंत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com