।। मढे झाकुनी पेरती शेत। ऐसी कुणबीयाची रीत ।।

पुणे ः येथे मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे रविवारी (ता. ८) दर्शन घेतना भाविक.
पुणे ः येथे मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे रविवारी (ता. ८) दर्शन घेतना भाविक.

पुणे : शेतकऱ्याच्या विश्वात देवाधिकांची कमी नाही. मात्र, ‘‘मढे झाकुनी पेरती शेत। ऐसी कुणबीयाची रीत’’ असा महान संदेश देणारे तुकोबा आणि ''जो जे वांछील, तो ते लाहो’ अशी आराधना करणारे ज्ञानोबा हेच आम्हा बळिराजाचे खरे देव आहेत. त्यांचे नामस्मरण करीत चंद्रभागेच्या विठूरायाचे दर्शन घेतले की आम्हाला शेतीतील हजार तोंडाच्या रावणाशी झुंज देण्याचे बळ मिळते. शेतशिवारातील आमच्या दुःखी संसाराला सुखाची झालर चढविणारी ही वारी शेतकऱ्याच्या जीवनाची ऊर्मी असून, नैराश्य हटविणारा स्फूर्तीचा अखंड झरा आहे...मराठवाड्यातील वारकरी शेतकरी पंढरीनाथ महाराज पळसगावकर आपले मनोगत व्यक्त करीत होते. अखिल विश्वाची 'माउली' आणि बहुजनांसाठी निर्भीड संघर्ष करणारे बंडखोर ''तुकोबाराय'' यांच्या अतुलनीय द्वैताची शेकडो वर्षाची साक्षीदार असलेल्या पंढरपूर वारीला पवित्र वरुणधारांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. परोपकार आणि परमार्थ साधत साधा आहार आणि सुशील आचारणातून पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी निघालेल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या हजारो दिंड्या म्हणजे राज्यातील बळिराजांचा महामेळावा समजला जातो.  पुण्यात मुक्काम करून हजारो दिंड्या आता वारकऱ्यांचा स्वर्ग असलेल्या पंढरपूरच्या दिशेने चालू लागल्या आहेत. दिंडीतील बहुतेक वारकरी, भाविक हे शेतकरीच आहेत. दिंडीत फेरफेटका मारल्यानंतर पंढरीनाथ महाराजांसारख्या तत्त्वज्ञ शेतकरी भेटतात आणि आपण थक्क होतो.  एका बीजा केला नास तवा भोगिले कणीस वारी करून शेतकऱ्यांना काय मिळते, असा सहज प्रश्न विचारल्यावर तत्त्वज्ञ शेतकरी पंढरीनाथ महाराज पळसगावकर म्हणाले, या राज्यातील हजारो गावांमधील लाखो शेतकरी तुकोबारायांच्या अभंगावर जगतात. एका बीजा केला नास...तवा भोगिले कणीस असे आम्हाला तुकोबा रायांनी सांगितले आहे. एक बी टाकल्यावर कणीस मिळते. मग, असे हजारो बी असले तर तुम्ही जगाचा उदरनिर्वाह करू शकता. तुमचे आधुनिक जग आमचं महत्त्व जाणत नाही. पण, आम्हीच जगाचे पोशिंदे आहोत. आमचे संत आम्हाला कर्म शिकवतात. जगाचं पोट भरणं हे आमचं कर्म आहे. ते कर्म पार पाडण्यासाठी रानाच्या मातीसाठी लागणाऱ्या हजार बिया तयार करण्याचं बळ आम्हाला या वारीतून मिळतं..! 

तत्त्वज्ञ शेतकरी मी नांदेडहून आलो आहे. पतिव्रता जशी पतीला दैवत मानून सर्व दुःख सहन करीत वाटचाल करते. तसे आम्ही सर्व पायात रुतलेल्या दुःखाच्या काट्यांकडे दुर्लक्ष करून तुकोबा-माउली-विठूरायाच्या दर्शनासाठी वारीत सहभागी होतो. आमच्या गावातून २५० शेतकरी वारीला आलेले आहेत. आता आम्ही ३०० किलोमीटर पायी चालणार आहोत. २२ जुलैला चंद्रभागेच्या किनारी पोहाेचू. तोपर्यंत टाळ-मृदंग-वीणा आणि अभंगाच्या भक्तिमय प्रभेत आमची दिंडी चालत राहील. ज्ञानेश्वर माउलींचे जन्मगाव आपेगाव असले तरी ते आळंदीला आजोळी स्थायिक झाले होते. देहूचे तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माउलीने जगाच्या कल्याणासाठी साहित्य विचार मांडले. त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी केली होती. ते ज्या वाटेने वारीला गेली ती धूळ आपल्याही चरणाला लागावी अशी भावना आमची आहे. त्यामुळेच आम्ही वर्षभर शेतीवाडीचे व्यवहार करून वारीला येतो,’’ श्री. पंढरीनाथ महाराज लाघवी भाषेत बोलत होते. ते शेतकरी असून नांदेडच्या पळसगावमध्ये तीन एकर शेती करतात.  तुळशीवाली बाई वारीमुळे आम्ही आणखी जवळ येतो. शेतीमधील सुखदुःखाच्या गप्पा होतात. एकमेकांमधील वैरभाव विसरतो. समूहाची भावना तयार होते. काही जण पेरण्या करून वारीत येतात. काही जण वारी करून पेरण्या करतात. मात्र, वारी चुकवित नाहीत. वारीच्या ३०० किलोमीटर अंतरात आम्ही अखंड चालत असतो. शेतात कुठेही झोपतो. मात्र, कधी मुंगीही चावत नाही, असे शेतमजूर असलेल्या कौशल्याबाई शिंदे सांगतात. तुळशी वृंदावन डोक्यावर घेत त्या दहा वर्षांपासून वारी करीत असून, त्यांना सर्व जण तुळशीवाली बाई म्हणतात. 

दुर्दम्य इच्छाशक्ती ५३ वर्षांचे शेतकरी भगवानराव बैस आपला मोडलेला पाय दाखवत म्हणाले, की शेतीची बहुतेक कामे आटोपली आहेत. पायात लोखंडी रॉड टाकलेला असला तरी मी चालणार आहे. यातून जो आनंद मिळतो तो मला कोणीही देऊ शकत नाही. 

विद्यार्थी वारकरी दिंडीत आबालवृद्धही सहभागी होतात. नांदेडच्या खेडेगावात दुसरी शिकणारा ज्ञानेश्वर नारायण जाधव हा सात वर्षांचा मुलगा त्याच्या आजोबांबरोबर दिंडीत आलेला आहे. ‘‘माझ्या नातवावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला पायी वारीसाठी आणले आहे,’’ असे त्याचे आजोबा महादेव पिराजी जाधव यांनी सांगितले. 

भक्ती थकली नाही वर्षानुवर्षे वारी करणारे शेतकरी थकले तरी वारी चुकवित नाहीत. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोंडाबाई व्यंकटराव शिंदे या ७५ वर्षांच्या शेतकरी आजी शेतात काम करून दिंडीला आलेल्या आहेत. ‘‘आमची दहा एकर शेती आहे. मी ३० वर्षांपासून वारी करते. वर्षभर अनेक समस्यांना आम्ही तोंड देतो. मात्र, विठूरायाचे दर्शन घेऊन गेल्यानंतर लढण्याचे बळ मिळते,’’ असे कोंडाबाई सांगतात. 

वारीची दुसरी पिढी शेतकरी गोविंद मठपती म्हणाले, की मी पहिल्यांदाच वारीला आलो आहे आणि ते केवळ आईच्या आग्रहामुळे. १५ वर्षे सलग वारी करून थकली आहे. तीची इच्छा आहे की मी ही परंपरा पुढे चालवावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com