खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविले; सोयाबीन उत्पादकांना दिलासा

सोयाबीन तेल
सोयाबीन तेल

नवी दिल्ली/पुणे : देशातील सोयाबीनसह तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने भरीव वाढ केली आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि मोहरीवर्गीय कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क आता ३५ टक्के झाले आहे, तर रिफाईंड खाद्यतेलाच्या आयात शुल्क ४५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.  तेलबियांचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने वर्षाच्या कालावधीत चार वेळेस खाद्यतेलाच्या कच्च्या व रिफाईंड प्रकारावर आयात शुल्क वाढविले. मात्र, यापूर्वी दरवाढीवर फारसा परिणाम दिसून आला नसला, तरी घसरणारे दर काही प्रमाणात या निर्णयांनी स्थिरावले होते. गेल्या वर्षीच्या कापसावरील बोंड अळीच्या समस्येमुळे यंदा सोयाबीन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर हंगामपूर्वच सोयाबीनसह तेलबियांवरील आयात शुल्क वाढविणे महत्त्वपूर्ण पाऊल ठरण्याची शक्यता आहे. या आधी कच्च्या सोयाबीन तेल आयातीवरील शुल्क हे ३० टक्के होते. कच्च्या सूर्यफूल तेलावरील आणि कॅनोला तेल आयातीवरील शुल्क हे २५ टक्के होते. तसेच या तीनही प्रकारच्या रिफाईंड खाद्यतेलाचे आयात शुल्क हे ३५ टक्के होते. मात्र कच्चे आणि रिफाईंड पामतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली नाही. कच्चे पामतेल आणि कच्चे पामोलीन तेल आयातीवर शुल्क हे ४४ टक्के तर रिफाईंड आणि शुद्ध पामोलीन तेलावरील आयात शुल्क हे ५४ टक्के आहे. देशात २०१७-१८ च्या हंगामात तेलबिया उत्पादन वाढले होते. त्यामुळे बाजारात तेलबिया पिकाचे दर हे हमीभावाच्याही खाली गेले होते. त्यामुळे दर सुधारावे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकार खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करणार असल्याचे वृत्त मार्च महिन्यातच देण्यात आले होते. मार्च महिन्यात केंद्राने आयातीवर लगाम लावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी कच्चे आणि रिफाईंड पामतेलाच्या आयात शुल्कात १४ टक्क्यांनी वाढ केली होती. आयात शुल्कातील ही वाढ दशकातील सर्वात मोठी ठरली.   भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. आॅक्टोबर महिन्यात संपलेल्या तेल वर्षात भारताने विक्रमी १४६ लाख टन खाद्यतेल आयात केले आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच सॉप्ट खाद्यतेलाची आयात ही पामतेल आयातीपेक्षा जास्त झाली. मे महिन्यातल्या पूर्ण आयातीमध्ये सॉफ्ट खाद्यतेल आयातीचा वाटा ६० टक्के होता. ही आयात वाढ शुल्क वाढीच्या भीतीने करण्यात आली होती, असे सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर असोसिएशन आॅफ इंडियाने म्हटले आहे.    शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय एकाच वर्षात चार वेळा सर्व प्रकारच्या खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविणे हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झाले आहे. आयात शुल्क वाढीत शक्यतो एवढे निर्णय कधीच होत नाहीत, मात्र मोदी सरकार धोरणात्मक बदलांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या पाठिशी अाहे, याचे हेच मोठे उदाहरण आहे आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. वर्षभरात आपण चारदा सरकारपुढे याकरिता गेलो, चारही वेळेस सरकारने आपले एेकले अन्‌ चारही वेळेस खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार सोयाबीनवर ४५ टक्क्यांची मर्यादा आहे. आपण या मर्यादेपर्यंत शुल्क वाढविले आहे. यासंदर्भात मी केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाज बांधणी आणि जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना भेटलो, त्यांच्या सूचनांनुसार मी केंद्रीय सचिवांच्या गटासमोर २४ मे २०१८ रोजी आयात शुल्क वाढविणे का आवश्‍यक आहे, असा विषय मांडला. या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आणि केंद्र सरकारने गुरुवारी (ता. १४) खाद्यतेलाचे आयात शुल्क वाढवून यंदा खरीप हंगामापूर्वीच देशातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. बाजार दरावरही याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा करू या. आज आमच्या लातूरच्या मार्केटमध्ये कीर्ती गोल्डने ३७०० रुपये प्रति क्विंटल सोयाबीन खरेदीची घोषणा केली आहे, हे चांगले संकेत आहेत. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग. अशी झाली खाद्यतेल आयात शुल्कात वाढ (टक्क्यात)

तेलाचा प्रकार  १० अॉगस्ट २०१८पर्यंतचे शुल्क  ११ आॅगस्ट २०१७   १७ नोव्हेंबर २०१८  १ मार्च २०१८  १४ जून २०१८
कच्चे पामतेल  ७.५     १५     ३०   ४४     ४४
रिफाईंड पामोलीन  १५   २५      ४०    ५४    ५४
कच्चे सूर्यफूल तेल  १२.५     १२.५   २५      २५    ३५
रिफाईंड सूर्यफूल तेल  २०    २०     ३५   ३५      ४५
कच्चे सोयाबीन तेल  १२.५    १७.५   ३०    ३०    ३५
रिफाईंड सोयाबीन तेल   २०  २०  ३५    ३५    ४५
मोहरीवर्गीय तेल  १२.५  १२.५  २५    २५    ३५
रिफाईंड मोहरीवर्गीय तेल  २०    २०    ३५    ३५  ४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com