माॅन्सूनपूर्व पावसाने दाणादाण

बुधवारी नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे माहूर शहराजवळील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.
बुधवारी नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे माहूर शहराजवळील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

पुणे : राज्यात मेघगर्जना, विजा, वादळी वाऱ्यासह माॅन्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला अाहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी बंधारे भरून, ओढे-नाल्यांना पाणी आले. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही वेग येणार आहे. यवतमाळ तालुक्यातील ब्रह्मी येथील शिवारात झाडाखाली बसलेल्या मेंढपाळांवर वीज कोसळून तिघे गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतजमिनींची माती वाहून गेली. हिमायनगर येथे ३७ मेंढ्या दगावल्या. गुरुवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह कोकणात दमदार पाऊस सुरू आहे.  कोकणातील सिंधुदुर्ग, रात्नागिरी, रायगड जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत असून, गुरुवारी पहाटेपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पेरणीपूर्व तयारीला वेग येणार असून, जिल्ह्यात धुळवाफेवर भात, उडीद, सोयाबीन, भुईमुगाची पेरणी झाली आहे. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. द्राक्ष बाग आणि हळद लागवडीला हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती, मुळशी तालुक्यांमध्ये वादळी वारे, जोरदार पावसाने चारापिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. ओढे-नाल्यांना पूर अाल्याने बंधारे भरले आहेत. पावसामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाने पुसेगाव येथील येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली. विसापूरमधील ओढ्याला पूर आल्याने सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पोषक वातावरणामुळे काही ठिकाणी खरिपाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे.  मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, नांदेडमध्ये जोरदार पावसाने जमिनीची माती वाहून गेली आहे. यात लागवड केलेले हळद बेणे, सोयाबीन बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हिमायतनगर येथे ३७ मेंढ्या दगावल्या. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने शेती व नाल्यांमधून पाणी वाहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश भागांत दमदार ते जोरदार बरसलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाच जोर आला असून, काही भागांत कपाशीची लागवड करण्यालाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडला. पावसाचा फटका

  •      कोकणात पावसाने जोर धरला
  •      राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस
  •      यवतमाळमध्ये वीज पडून मेंढपाळ जखमी
  •      नांदेड जिल्ह्यात शेतातील माती वाहून गेली
  •      ओढे-नाले वाहू लागले, बंधारे भरले 
  •      भाजीपाला, फळे, चारापिकांचे नुकसान
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com