माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळात

माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळात
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळात

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील वाटचाल सुरू केली आहे. माॅन्सूनने शुक्रवारी दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटांपर्यंत धडक दिली आहे. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने रविवारपर्यंत (ता. २७) अंदमान बेटांचा आणखी काही भाग आणि अरबी समुद्राच्या कोमारीन भागापर्यंत दाखल होण्याचे संकेत अाहेत, तर मंगळवारपर्यंत (ता. २९) मॉन्सून दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडूमध्ये धडक देणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विषुववृत्ताकडून येणारे जोरदार वाऱ्याचे प्रवाह, ढगांचे दाट अच्छादन आणि पाऊस या घटकांची स्थिती पाहता मॉन्सून अग्नेय बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारपर्यंतच्या (ता. २७) ४८ तासांमध्ये दक्षिण अंदमान समुद्र, कोमारीन - मालदीव परिसराचा काही भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान, निकोबार बेटांच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. २९) दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडू, लक्षद्वीप बेटे, अंदमान निकोबार बेटांच्या संपूर्ण भागात माॅन्सून पोचण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  मॉन्सून सर्वसाधारणपणे २० मे रोजी अंदमान बेटांवर दाखल होत असतो. मात्र, यंदा तो तीन दिवस उशिराने २३ मे राेजी अंदमानात तर नियमित वेळेच्या (१ जून) तीन दिवस आधी २९ मे रोजी केरळात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अंदाजापेक्षाही दोन दिवस उशिराने म्हणजेच २५ मे रोजी मॉन्सून अंदमानात डेरेदाखल झाला आहे. तर २९ मे राेजी माॅन्सून केरळात पोचण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.  ‘मेकुणू’ घालतेय धुमाकूळ अरबी समुद्रात आलेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ सध्या धुमाकूळ घालत आहेत. या वादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. सोकोट्रापासून उत्तरेकडे ३१० किलोमीटर, तर सलालाहपासून १८० किलोमीटर समुद्रात असलेले वादळ ताशी सात किलोमीटर वेगाने ओमानकडे झेपावत आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत हे वादळ सलालाहच्या किनाऱ्याला धडकणार आहे. ताशी १६० ते १७० किलोमीटर वेगाने चक्राकार फिरत असलेल्या वादळामुळे सलालाहच्या किनाऱ्याजवळ १९० किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झोत येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत अंदमानात माॅन्सून दाखल झाला असतानाच, अंदमान समुद्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. सोमवारी (ता. २८) पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मॉन्सून मंगळवारी (ता. २९) मे रोजी केरळात दाखल होण्याची अंदाज असून,  हे कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक ठरण्याची शक्यता आहे. अंदमानातील हजेरी 

वर्ष  आगमन
२०११ २९ मे
२०१२   २३ मे
२०१३   १७ मे
२०१४    १८ मे 
२०१५ १६ मे
२०१६   १८ मे
२०१७ १४ मे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com