माॅन्सून ६ ते ८ जून दरम्यान महाराष्ट्रात !

महाराष्ट्रात माॅन्सून ६ ते ८ जून दरम्यान
महाराष्ट्रात माॅन्सून ६ ते ८ जून दरम्यान

पुणे : अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांनी चाल दिल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १ जून) मॉन्सून बंगालच्या उपसागरासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर गोव्यासह महाराष्ट्रात माॅन्सून ६ ते ८ जून या कालावधीत पोचणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  मॉन्सून यंदा तीन दिवस आगोदर मंगळवारी (ता.२९) केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे माॅन्सूनने कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांत वेगाने प्रगती केली. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार ५ जूनपर्यंत पोचणारा मॉन्सूनने यंदा ३० जून रोजी या भागात दाखल झाला आहे. कर्नाटकमधील शिरोली, हस्सन, मैसूरपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे.  अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, देशाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. ३) प्रगती करण्याची शक्यता आहे. त्यानंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ६ जूननंतर महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊस जोर धरणार असून, ६ ते ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात माॅन्सून पोचणे होणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राचे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले होते. मध्य रात्री ही प्रणाली ‘क्याकप्यू’जवळ म्यानमारच्या किनाऱ्याला धडकल्यानंतर तिची तीव्रता कमी झाली. ईशान्येकडे सरकरत असलेल्या या कमी दाब क्षेत्रामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १) ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.  विदर्भात उष्णतेची लाट राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण होत असून, तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. राज्यात शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, शनिवारपासून (ता. २) पाऊस वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी व वर्धा येथे ४७ तर नागपूर येथे ४६.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या खाली आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com