पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्य

पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्य
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्य

पुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी खात्यातील तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एका उपसंचालकाचीदेखील विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला या प्रकरणात माफीच्या साक्षीदाराने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.  पाणलोट घोटाळ्यातील चार जणांच्या निलंबनाची शिफारस करणारा अहवाल काही महिन्यांपूर्वीच कृषी आयुक्तालयाकडे सादर झालेला होता. तथापि यावर कोणताही निर्णय न होता पाणलोट घोटाळा दडपण्यात आला. यात एका सहसंचालकाने अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यमान आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे निलंबन अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  सातारा जिल्ह्यात पाणलोटाची कामे करताना शेतकऱ्यांकडून २३ लाख रुपयांचा लोकवाटा जमा करण्यात आलेला आहे. नियमानुसार लोकवाट्याची रक्कम बॅंक खात्यात जमा करावी लागते. मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी १७ लाख ८४ हजार रुपयांचा निधी मध्येच हडप केला आहे.  “विभागीय कृषी सहसंचालकांनी राज्याच्या कृषी आयुक्तांना पाठविण्यात आलेल्या गोपनीय अहवालात तालुका कृषी अधिकारी आर. बी. माने यांच्यासह तीन जणांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. एस. माईनकर यांनी हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस सहसंचालकांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  पाणलोटाचा पैसा जिरवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनातील मृदसंधारणाची लाखो रुपयांचे धनादेश बेधडक ठेकेदारांच्या हवाली केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. पाणलोट समितीने कामे केल्याचे सांगून ४० लाख रुपयांची बिले राज्य शासनाच्या निधी वितरण प्रणालीतून मंजूर न करता थेट धनादेश तयार करून वाटले गेले, असा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे.  पाणलोटाची कामे करताना शासकीय आदेशाचे उल्लंघन झाले आहे. या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामाचा कालावधी व तांत्रिक मान्यतेच्या तारखा बदलून अनुदान लाटले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.  दरम्यान, कृषी खात्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून माफीचा साक्षीदार झालेल्या कृषी पर्यवेक्षकाला खुनाच्या धमक्या आल्यामुळे आता त्याने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. कृषी खात्यातील भ्रष्ट लॉबीने या पर्यवेक्षकाला कामावरून काढून टाकण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. पुढील चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी या पर्यवेक्षकाला कामावरून काढून टाका, अशी मागणी वरिष्ठांकडे केली जात आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com