पुणे ः जैवविविधता प्रदर्शनात लुप्त हाेणारे विविध वाण सादर करण्यात आले हाेते.
पुणे ः जैवविविधता प्रदर्शनात लुप्त हाेणारे विविध वाण सादर करण्यात आले हाेते.

नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन, संशोधन गरजेचे

पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या हव्यासापायी देशी आणि पारंपरिक वाण नष्ट हाेत असून, संकरित वाणांमधील पाैष्टिकतेच्या अभावामुळे पाेषण आणि अन्नसुरक्षा धाेक्यात आली आहे. पाेषण आणि अन्नसुरक्षिततेसाठी देशी वाणांचे संवर्धन, संशाेधन, विकास आणि प्रसार हाेण्यासाठी प्रयत्न हाेणे गरजेचे आहे, असे मत देशी वाण संवर्धन व संशाेधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांच्या परिसंवादात व्यक्त केले. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त महाराष्ट्र जनुक काेष कार्यक्रमांतर्गत आयाेजित परिसंवाद व जैवविविधता प्रदर्शनाचे आयाेजन मंगळवारी (ता. २२) करण्यात आले हाेते. या वेळी शेती आणि जैवविविधता परिसंवादात बाएफचे संजय पाटील, नांदेडच्या संस्कृती संवर्धन मंडळाचे माधव ताटे, सांगलीचे प्रसाद देशपांडे, भंडाऱ्याचे अनिल बाेरकर, लाेकपंचायतचे विजय सांबरे, आयआरडीचे विलास पाटील आदी उपस्थित हाेते.  माधव ताटे म्हणाले, मराठवाड्यात लुप्त हाेणाऱ्या ज्वारी, तेलबिया आणि शेवाळी मिरचीच्या वाणांचे संवर्धन करण्यात यश आले आहे. तीन जिल्ह्यांमधील ६० गावांमध्ये ३ बियाणे बॅंका उभारल्या आहेत. ज्वारीचे पाच वाणांच्या संवर्धनाबराेबर लुप्त हाेत असलेल्या आणि कमी पाण्यावर पिकणाऱ्या शेवाळी मिरचीची ३०-३० गुठ्यांवर शेतकरी शेती करू लागले आहेत. या मिरचीबराेबर सामूहिक शेती करण्याची गरज आहे. प्रसाद देशपांडे म्हणाले, की पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, काेल्हापूरमध्ये ज्वारी, गहू आणि भाताच्या लुप्त हाेणाऱ्या वाणांच्या संवर्धनात यश आले आहे. यामध्ये ज्वारीच्या कावळी, गुळभेंडीसारख्या वाणांचा समावेश आहे. शेतकरी श्रद्धेपाेटी, चवीसाठी आणि धार्मिकतेसाठी अजूनही पांरपरिक वाणांचे संवर्धन करत आहे. त्यामुळे पांरपरिक पद्धतीने पिकवले जाणारे आणि कमी पाण्यावर येणाऱ्या तामसाळ आणि हातसाळ वाणांचे संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. अनिल बाेरकर म्हणाले, देशी वाणांच्या संवर्धन प्रकल्पामध्ये पूर्व विदर्भात भाताच्या १४० वाणांचे नमुने मिळविण्यात यश आले आहे. तर लाकाेडी या तुरीच्या वाणांची शास्त्रीय लढाई जिंकलाे आहे. हा वाण पिकवला म्हणून अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. संवर्धन प्रकल्पांतर्गत लाकाेडीचे ३ वाण, भाताचे लुचई, दुब्राड, हिरानक्की आणि जवसाच्या पांढऱ्या आणि करड्या वाणांचे सवर्धन करण्यात यश आले आहे. विजय सांबरे म्हणाले, की पुणे आणि नगर जिल्ह्यांतील पश्‍चिम घाट परिसरातील तालुक्यांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर अनेक वृद्धांच्या बाेलण्यातुन स्थानिक वाणांचे महत्त्व जाणले. ते म्हणत वंश बुडाला तरी चालेल; पण बी बुडालं नाही पाहिजे. असा विचार हाेता. या विचारातून वृद्ध महिलांनी सांभाळेल्या ८० पिके आणि १५० वाणांचे डॉक्युमेंटशन करण्यात यश आले आहे. संजय पाटील म्हणाले, की बाएफला विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विविध पिकांचे सुमारे ५४५ वाणांचे संवर्धन करण्यात यश आले आहे. यामाध्यमातून ५ बियाणे बॅंका उभारण्यात आल्या असून, जमिनीच्या फक्त आेलीवर हे वाण पिकत आहे. अतिशय कमी पाण्यावर तग धरणारे हे वाण असून, या वाणांवर संशाेधन विकास आणि प्रसारावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी ५० वाण केंद्रांकडे नाेंदणीसाठी पाठवले आहेत. विकास पाटील म्हणाले, की मराठवाडा आणि विदर्भातील ६ जिल्ह्यातील नष्ट हाेण्याच्या मार्गावर असणाऱ्या आैषधी गुणधर्म असलेल्या पांरपरिक वाण संवर्धन करण्यात यश आले आहे. यासाठी २२ शाळांमधील विद्यार्थ्यांमध्येदेखील जागृती करण्यात आली. त्यामाध्यमातून ६ बियाणे बॅंक स्थापन करण्यात यश आले आहे. यामध्ये ज्वारी, तूर, आणि तिळाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com